रामदास आठवले:- केंद्रीय राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय
संविधान प्रत्येकाने वाचले पाहिजे, त्यातील मूल्ये ही याच देशात गेल्या अडीच हजार वर्षांपासून असलेली मूल्ये आहेत.. या संविधानातील आर्थिक व सामाजिक समतेसाठी आता प्रयत्न करायला हवेत..
भारत हे विविधतेने संपन्न राष्ट्र आहे. आपल्या देशात अनेक प्रांत आहेत त्या प्रत्येक प्रांतात वेगळी बोली भाषा; संस्कृती; पेहराव आणि रीतीरिवाज आहेत. अनेक जाती-धर्म आहेत. विविध भाषा, जाती, धर्म असूनही या राष्ट्रीय एकता साधण्याची किमया संविधानकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जगाने ज्ञानसूर्य म्हणून गौरव केला आहे. जपानपासून अमेरिकेपर्यंत सबंध जग महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवाधिकार आणि लोकशाही चळवळीचे द्रष्टे प्रेरणास्थान मानत आहेत. त्यामुळे लोकशाहीचे महान तत्त्वचिंतक ठरलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला जे संविधान दिले, ते अतुलनीय आणि जगातील सर्व श्रेष्ठ संविधान ठरले आहे. भारतीय संविधानाने जी मूल्ये दिली आहेत ती सांविधानिक मूल्ये केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला मार्गदर्शक आहेत. वैश्विक स्तरावर भारतीय संविधानाचे महत्त्व सिद्ध होत आहे.
भारतीय संविधानाच्या सारनाम्यातच या सांविधानिक मूल्यांचा उल्लेख आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता आणि न्याय या मूल्यांचा उल्लेख आहे तसेच प्रज्ञा, शील, करुणा, मत्री या मूल्यांचा तात्त्विक आधार संविधानातील तरतुदींना आहे. या सांविधानिक जीवनमूल्यांची जशी भारताला गरज आहे तशी संपूर्ण जगालासुद्धा आहे. संविधानात ‘बंधुत्व’ हा शब्द महत्त्वाचा आहे. भारत विश्वात श्रेष्ठ राष्ट्र होण्याचे उद्दिष्ट ठेवतो, पण त्याच वेळी संपूर्ण जगातील सर्व देशांशी बंधुत्व बाळगण्याचे मूल्यही सांगतो. निव्वळ ‘महासत्ता’च होण्याची लालसा ठेवणारे देश, बंधुत्वाचे महान तत्त्व पाळू शकतात. बंधुत्वाच्या शिकवणुकीतून जे राष्ट्र तयार होईल ते राष्ट्र भविष्यात महासत्ता झाले तरी केवळ भौतिक महासत्ता न होता बंधुत्वाचे महान तत्त्व पाळणारे राष्ट्र होईल. भारताला अडीच हजार वर्षांपूर्वीपासून बंधुत्वाची परंपरा आणि शिकवण आहे. भारतात अडीच हजार वर्षांपूर्वी बौद्ध धम्म स्थापन झाला. बौद्ध धम्म काळातच भारतात सोन्याचा धूर निघत होता. त्या काळात जगातील अत्यंत संपन्न राष्ट्र भारत होते. आज आपले लोक उच्च शिक्षणासाठी अमेरिका/युरोपला जातात, मात्र त्या काळात जगभरातील ज्ञानपिपासू विद्यार्थी भारतातील नालंदा, तक्षशिला या विद्यापीठांमध्ये येत असत. भारताला बौद्ध धम्माचा समृद्ध वारसा लाभला आहे. या धम्माचा जगभर प्रसार झाला. भारतातील धम्म जगातील प्रत्येक राष्ट्रात पोहोचला, याचे कारण त्या धम्मातील मानवतावादी वैज्ञानिक आणि समतावादी तत्त्व. बौद्ध धम्मानेच जगाला सर्वप्रथम ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा लोकशाहीचा विचार दिला. बौद्ध काळात जे सभेचे नियम होते; बौद्ध धम्मात भिक्खू संघात जे नियम होते, बौद्ध धम्माने जगाला जशी सत्य, अिहसा आणि बंधुत्वाची तत्त्वे शिकविली तसेच लोकशाहीचे, समतेचे व न्यायाचे तत्त्वही बौद्ध धम्मानेच जगाला शिकविले. भारताने आणि भारतीय संविधानाने लोकशाहीचा विचार जगातील अन्य कोणत्याही राष्ट्राकडून उसना घेतलेला नाही तर फ्रेंच राज्यक्रांतीच्याही कितीतरी आधी भारतात लोकशाहीचा, समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुत्वाचा स्पष्ट विचार जगात सर्वप्रथम महाकारुणी तथागत गौतम बुद्धांनी मांडला होता. भगवान बुद्धांच्या धम्मातूनच आपण लोकशाहीची तत्त्वे स्वीकारली असून ती मूल्ये भारतीय संविधानात समाविष्ट केली असल्याचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे.
भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीचे अत्यंत खडतर कार्य पूर्ण केले. त्यांची तब्येत ठीक नसतानाही, शारीरिक यातनांवर मात करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे ११ महिने बारा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केले. भारतीय संविधान हे जगातील मोठे लिखित संविधान आहे. मूळ संविधानामध्ये एक प्रस्ताविका, २५ भाग आणि ३९५ कलमे तसेच आठ अनुसूची आहेत. भारतीय संविधानाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे संविधानाच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता काळानुरूप संविधानातील काही कलमांमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार संविधानकारांनी संसदेला दिला आहे. त्यानुसार आतापर्यंत १०० हून अधिक वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली. मात्र भारतीय संविधान कोणीही कधीही पूर्णपणे बदलू शकत नाही. संविधानाचा मूळ ढाचा न बदलण्याचे बंधन प्रत्येक सरकारवर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने घातलेले आहे.
भारत भविष्यात विश्वातील प्रथम क्रमांकाचे राष्ट्र होईल; त्यासाठी भारताला संविधानाने दिलेली सांविधानिक मूल्ये पाळावी लागतील. प्रत्येक भारतीयाला ही सांविधानिक मूल्ये आत्मसात करून आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग करावी लागतील.
आपल्या देशाला परकीय गुलामीतून राजकीय स्वातंत्र्य मिळाले आहे. ‘एक व्यक्ती एक मत एक मूल्य’ या तत्त्वानुसार संविधानाने भारतात राजकीय समता आणली आहे पण आपल्या देशात अद्याप सामाजिक आणि आर्थिक समता स्थापित झालेली नाही. सामाजिक आणि आर्थिक समता स्थापन करून संविधानातील ‘समतावादी भारत’ साकार करणे हाच खरा संविधानाचा गौरव ठरेल.
२६ नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन म्हणून भारत सरकार देशभर संविधान गौरवाचे कार्यक्रम संविधान गौरव सप्ताह तसेच यंदा २६ नोव्हेंबर ते १४ एप्रिलपर्यंत भारत सरकारतर्फे संविधान गौरव अभियान साजरे केले जाणार आहे. प्रत्येक भारतीयाने संविधान वाचले पाहिजे. संविधान समजून घेतले पाहिजे. प्रत्येक भारतीयाच्या हक्काचे मूळ स्रोत संविधान आहे. त्यामुळे प्रत्येकाने संविधान समजून घेतले पाहिजे.
विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशाची लोकशाही अखंड मजबूत आणि वर्षोनुवर्षे अधिक प्रगल्भ होत आहे ते केवळ भारतीय संविधानामुळे. भारतीय संविधान हा आपल्या लोकशाहीचा मजबूत आधारस्तंभ असलेला पाया आहे. ७२ वर्षे भारतीय स्वातंत्र्याला झाली आहेत. संविधान आपण स्वत:ला प्रदत्त केले, त्यास यंदा ७० वर्षे होत आहेत. सर्व काळात भारताची विविधतेत एकता टिकून आहे. स्वातंत्र्य आणि लोकशाही मजबूत उभी आहे. ते केवळ भारतीय संविधान आणि संविधानकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा द्रष्टेपणामुळे! ‘सामाजिक समतेचा पाया अधिक मजबूत केला तरच राजकीय लोकशाही, राजकीय समता टिकेल. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तीन तत्त्वांतील एक तत्त्व जरी गळाले तरी सर्व लोकशाहीचा अंत झाल्यासारखे होईल. सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर केली पाहिजे; नाही तर सामाजिक आणि विषमतेची दाहकता भोगणारा वर्ग लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’ हा इशारा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. याचा आपण विचार करून सांविधानिक मार्गाने देशातील सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यातूनच संविधानातील खरा भारत साकारू शकेल.
जागतिकीकरणाच्या आजच्या युगात जगभरातील राष्ट्रे एकमेकांच्या जवळ आली आहेत. वेगवेगळ्या देशांत लोक उदरनिर्वाहासाठी स्थायिक झाले आहेत. अनेक देशांत विविधता वाढत आहेत. जगातील सर्वाधिक विविधता असणाऱ्या राष्ट्राचे, सर्वश्रेष्ठ मूल्यांचे भारतीय संविधान बदलत्या जागतिकीकरणाच्या युगात संपूर्ण विश्वाला मार्गदर्शक ठरणारे आहे. आजच्या ७० व्या संविधानदिनी, संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!