डॉ. हर्षवर्धन
केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री
पोलिओचे उच्चाटन भारताने गेल्या दशकामध्ये केले, तसेच आता ‘हत्तीपाय रोग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘लिंफॅटिक फिलॅरिसिस’चे उन्मूलन करण्याचे आव्हान सरकारने स्वीकारले आहे. चार जिल्ह्य़ांत पार पडलेल्या पथदर्शक प्रकल्पानंतर या कामाचा आवाका वाढणार आहे..
उष्णकटिबंधीय रोग हे बराच काळ दुर्लक्षित राहिले आहेत, पण आमच्या सरकारने त्या रोगांकडे पुरेसे लक्ष दिले आहे. लसिका पेशी यंत्रणा पोखरणारा लिंफॅटिक फिलॅरिसिस (लसिका हत्तीपाय रोग) व व्हिसेरल लेशमनियासिस म्हणजे ‘काला आजार’ हे दोन रोग भारतातून नष्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी तंत्रज्ञान, संशोधन, मनुष्यबळ यांचा वापर, नवप्रवर्तन, धोरणात्मक भागीदारी, आर्थिक वचनबद्धता यांच्या मदतीने र्सवकष नियोजन करण्याचा आमचा इरादा आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटल्यानुसार मानसिक आजारानंतर लिंफॅटिक फिलॅरिसिस हा रोग हा दुसरा असा घातक रोग आहे, ज्यात शारीरिक व मानसिक असे दोन्ही प्रकारचे दुष्परिणाम अटळ असतात. भारतात सध्या हा रोग हे मोठे आव्हान आहे. हत्तीपाय रोगात डासांच्या मार्फत परोपजीवी जंतू पसरतात व ते शरीरात जाऊन हातपाय सुजतात. जर त्यावर उपचार केले नाहीत तर संबंधित व्यक्ती कायमची जायबंदी होते व तिचे आयुष्यच निर्थक बनते. आजही समाजात या रोगाबाबत फारशी जागृती नाही. त्यावर प्रतिबंधात्मक उपायांचा विचार केला जात नाही.
हत्तीपाय रोगाचे उच्चाटन करण्यासाठी अत्यंत परिणामकारक औषधे वापरणारा भारत हा पहिला देश आहे. या रोगात ज्या तीन औषधांचा वापर केला जातो, त्यांत इव्हरमेकटिन, डायइथिलकार्बामाझाइन, अल्बेन्डॅझोल (आयडीए) यांचा समावेश आहे. हत्तीपाय रोगाचा प्रतिबंध करण्यात या औषधांचा वाटा मोठा आहे. आपल्या देशात ३७ पैकी २१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत या रोगाचे प्रमाण जास्त असून तेथे या रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा आमचा इरादा आहे. प्रतिबंधात्मक उपायांची आरोग्य सेवा सर्वाना मिळाली पाहिजे. ज्या भागात या रोगाचे प्रमाण जास्त आहे तिथे ती प्रामुख्याने उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
सरकारची इच्छा व दूरदृष्टी यांचा संगम या रोगाच्या उच्चाटनासाठी गरजेचा आहे, फेब्रुवारी २०१९ च्या अखेरीस ‘आयडीए’ म्हणजे वर सांगितलेल्या तीन औषधांची प्रतिबंधात्मक योजना चार जिल्ह्य़ांत पथदर्शक पातळीवर राबवण्यात आली. बिहारमधील अरवाल, झारखंडमधील सिमडेगा, महाराष्ट्रातील नागपूर, उत्तर प्रदेशातील वाराणसी हे ते चार जिल्हे आहेत. यात सुमारे ९० लाख लोकांना औषधोपचारांचा लाभ झाला. २०१९च्या अखेरीस आणखी ४.५ कोटी लोकांना या औषधांचा लाभ मिळणार आहे.
शाश्वत विकास उद्दिष्टांचा विचार करता दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजारांवर प्रभावी उपाय यंत्रणा शक्य आहे. या शाश्वत उपायांमध्ये आरोग्य स्वरूप, विकास, बहुउद्देशी दृष्टिकोन यांची गरज आहे. त्यांच्या मदतीने दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगांचा ठोसपणे मुकाबला करणे शक्य आहे. समाजातील वंचित, गरीब लोकांपासून कुणीही या रोगाच्या उपाययोजनेतून दूर राहू नये अशी आमची मनोधारणा आहे.
डास निर्मूलनावरही भर
आपण जर उष्णकटिबंधीय रोग संपवू शकलो तर गरीब व वंचित लोकांसाठीही खूप काही केल्यासारखे होईल. सामाजिक, आर्थिक व आरोग्य असमानता दूर करण्यात त्यातून हातभार लागेल यात शंका नाही. हत्तीपाय रोगास प्रतिबंध करणे हा यातील एक भाग व दुसरा म्हणजे त्या रोगाचे व्यवस्थापन व काळजी. या रोगाने कुठलीही व्यक्ती मन व शरीराने खचून जाते. त्यामुळे त्याबाबत जनजागृतीची गरज आहे. हत्तीपाय रोग टाळता येण्यासारखा आहे. ज्यांना तो झालेला आहे त्यांचेही जीवन सुसह्य़ करता येऊ शकते. हत्तीपाय निर्मूलन योजना आम्ही सुरू केली आहे, त्यात या रोगाचे मोफत उपचार केले जातात. अपंगत्व टाळण्यासाठी सेवा दिल्या जातात. त्यासाठी काही आरोग्यसंच दिले जातात, काही वेळा शस्त्रक्रिया केल्या जातात. आमच्या सरकारने स्वच्छ भारत अभियान योजना हाती घेतली आहे. त्यात डास किंवा कीटकांमार्फत पसरणाऱ्या रोगांच्या प्रतिबंधावर भर दिला आहे.
उष्णकटिबंधीय रोगांचा प्रतिबंध करताना आपण भागीदारी किंवा सहकार्याची व्याख्या अधिक व्यापक करण्याची गरज आहे. दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग निर्मूलन कार्यक्रमाच्या निमित्ताने आपली आरोग्य प्रणाली कशी सुधारता येईल, त्याचा फायदा इतर रोगांमध्येही कसा वाढवता येईल याचा विचार करण्याची गरज आहे. आपल्या देशात जे लोक सामाजिक पातळीवर काम करतात किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना माझे असे आवाहन आहे की, त्यांनी त्यांच्या भागात सामुदायिक आरोग्य अनुपालन वाढवावे, प्रतिबंधात्मक औषधे मोफत दिली जातात, ती लोकांपर्यंत पोहोचवावीत. लोक ती घेतात की नाही याचा पाठपुरावा करावा. सरकारने यासाठी अनेक साधने उपलब्ध करून दिली असून त्यासाठी आर्थिक तरतूदही केली आहे. राज्य सरकारांच्या समवेत आम्ही काम करीत आहोत. आम्ही आखलेले आरोग्य कार्यक्रम प्रभावी असून ते लोक स्वीकारत आहेत. आम्ही आता अतिशय दूरदृष्टीने काम करीत आहोत. ज्या कुणाला रोग होण्याची शक्यता आहे किंवा ते तशा परिस्थितीत राहतात त्यांच्यापर्यंत पोहोचणे यात महत्त्वाचे आहे.
उष्णकटिबंधीय रोगांच्या उच्चाटनाचा आम्ही निर्धार केला आहे, त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. भारतातून पोलिओचे केलेले उच्चाटन हा सरकार व समाजाच्या इच्छाशक्तीचा एक आदर्श होता. आता विज्ञान व समाज यांनी पुन्हा समन्वयाने काम करून हत्तीपाय रोगाला निरोप देण्याची हीच वेळ आहे.
आरोग्यसंपन्न देश ही खरी मोठी संपत्ती असते; ती मिळवण्यासाठी रोगमुक्त भारत निर्माण करण्याची आमची जिद्द तर आहेच, पण आरोग्याच्या क्षेत्रात आपल्या देशास नाव मिळवून देण्याचीही सरकारची इच्छा आहे.