फेब्रुवारीपासून सुरू झालेली दुसरी कोविड-१९ लाट मुंबईत आता ओसरत असल्याचे आशादायक चित्र आहे. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईतला मृत्यूदरही कमी आहे. दैनंदिन रुग्णसंख्या जास्तीत जास्त ११ हजारापर्यंतच थोपवण्यात आम्हाला यश आले आहे. पण हे काही जादूची कांडी फिरवल्यामुळे आलेले यश नाही. एका रात्रीत हे यश मिळत नाही आणि एका रात्रीत यंत्रणाही उभी करता येत नाही. हे गेल्या वर्षभरात मुंबई महापालिकेने घेतलेल्या मेहनतीतून घडले आहे. पहिल्या लाटेत आम्ही खूप शिकलो आणि ती लाट ओसरली तेव्हापासूनच आम्ही कामाला लागलो होतो. त्यामुळेच हे शक्य झाले आहे. सगळ्या पातळ्यांवर केलेल्या प्रयत्नांचे हे फळ आहे, असे मी मानतो.
मला आठवते की, मुंबईत साधारण १० फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली. त्या वेळी मुंबईतील बाधितांची एकूण संख्या ३ लाख १३ हजार होती. त्यानंतरच्या ७६ दिवसांत ही संख्या ६ लाख २२ हजारावर गेली. म्हणजे या दुसऱ्या लाटेत ३ लाख ९ हजार नव्या रुग्णांची भर पडली. या काळातील मृतांच्या संख्येचा आपण विचार केला तर १० फेब्रुवारीला एकूण मृत्यू ११,४०० होते. तर २५ एप्रिल रोजी हाच आकडा १२,७१९ इतका होता. म्हणजे या काळात १,३१९ रुग्ण दगावले. ३ लाख ९ हजार बाधितांच्या तुलनेत विचार केला, तर मृत्यूदर ०.४ टक्के आहे. हा जगातील सगळ्यात कमी मृत्यूदर आहे. दिल्लीच्या तुलनेत मुंबईचा मृत्यूदर खूपच कमी आहे. दिल्लीत गेल्या चार दिवसांत करोनामुळे १५०० मृत्यू झाले, असे त्यांचाच अहवाल सांगतो. मुंबईत ७६ दिवसांत करोनाने जेवढे बळी गेले त्यापेक्षा जास्त बळी दिल्लीत चार दिवसांत गेले. यातूनच मुंबई आणि दिल्लीतील फरकाचे चित्र स्पष्ट होते.
दिल्लीमध्ये मुंबईपेक्षा जास्त चाचण्या केल्या जातात, असा दावा केला जातो. मात्र, आपण फरक लक्षात घ्या की, दिल्लीत जर दिवसाला लाखभर चाचण्या होत असतील, तर त्यापैकी ८० हजार प्रतिजन चाचण्या असतात आणि केवळ २० हजार आरटीपीसीआर चाचण्या आहेत. आरटीपीसीआर चाचणी ही खात्रीलायक मानली जाते. मुंबईत ४० ते ५० हजार चाचण्या केल्या जातात; त्यापैकी त्यापैकी ३० ते ३५ हजार चाचण्या आरटीपीसीआर असतात. आपल्याकडे एखाद्या संशयित रुग्णांची प्रतिजन चाचणी नकारार्थी आली, तर आपण त्याची पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करतो. दिल्लीत प्रतिजन चाचण्यांचे प्रमाण जर जास्त असेल तर त्यापैकी २० ते २५ टक्के रुग्णांचे खरे अहवाल समोर येतच नसतील. त्यामुळे जगाला दाखवण्यासाठी खूप चाचण्या करून काहीच उपयोग नाही. त्या चाचण्यांची अचूकता महत्त्वाची. हेच धोरण ठेवून आम्ही चाचण्या करतो. त्यामुळे पहिली लाट ओसरल्यानंतर दिल्लीतील पॉझिटिव्हिटीचा दर १ टक्क्यांच्या खाली गेला होता. जो मुंबईत कधीही तीन टक्क्यांच्या खाली गेला नाही.
करोना काळजी केंद्रांचे यश मोठे
पहिली लाट आली, तेव्हा मुंबईत मोकळ्या मैदानांवर जम्बो कोविड सेंटर उभारण्याची संकल्पना प्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली. मोठय़ा मैदानांवर अशी केंद्रे उभी करता येतील, याची कल्पनाही तेव्हा कोणी केली नव्हती. २०२० मध्ये ८ मे रोजी मी पालिका आयुक्तपदी आल्यानंतर १५ मे रोजी झालेल्या बैठकीत मी सूचना केली की, या जम्बो कोविड सेंटरमध्ये आपण ‘करोना काळजी केंद्रे’ म्हणजेच अद्ययावत रुग्णालयेच सुरू केली पाहिजेत. अन्यथा या केंद्रांमध्ये नुसत्याच खाटा असतील त्या रुग्णशय्या नसतील. मुख्यमंत्र्यांना माझी सूचना पटली. त्यानंतर आम्ही या जम्बो केंद्रांमध्ये अतिदक्षता विभागाच्या खाटा, प्राणवायूसह खाटांची निर्मिती केली. डायलिसिस रुग्णांच्या खाटाही तयार केल्या. आता पालिकेच्या सात जम्बो करोना काळजी केंद्रांमधील ९००० खाटांपैकी ६० टक्के खाटांना प्राणवायूची जोडणी दिली आहे. तर तब्बल ६१२ खाटा या अतिदक्षता खाटा आहेत. मुंबईतील हिंदूजा, नानावटी, ब्रीच कॅण्डी, जसलोक अशा ३५ मोठय़ा रुग्णालयांत मिळून केवळ ४९० अतिदक्षता खाटा आहेत. पण पालिकेच्या करोना काळजी केंद्रातील अतिदक्षता खाटांची संख्या या सगळ्यांपेक्षा जास्त आहे, हे मी अभिमानाने सांगेन. एवढी परिपूर्ण करोना केंद्र फक्त आणि फक्त मुंबईत आहेत.
पहिली लाट ओसरल्यापासूनच..
सप्टेंबरमध्ये पहिली लाट ओसरली तेव्हापासूनच आम्ही कामाला लागलो. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत मुंबईतील ३५ लाख १० हजार घरांना आमच्या आरोग्यसेविका व आरोग्यदूतांनी भेटी दिल्या. त्यांनी गोळा केलेल्या माहितीतून सहव्याधी असलेल्या ५१ हजार लोकांना शोधण्यात यश आले. तसेच मोठय़ा प्रमाणावर जनजागृती होऊ शकली.
करोनाला प्रतिबंध करण्यासाठी मुखपट्टी हे महत्त्वाचे शस्त्र आहे. या काळात आम्ही मुखपट्टय़ा न लावता फिरणाऱ्यांविरोधातली मोहीम तीव्र केली. मुखपट्टी लावण्याचे महत्व समजावे म्हणून मुंबईत ठिकठिकाणी ‘नो मास्क नो एण्ट्री’ लिहिलेले ४५ लाख स्टिकर लावले. त्यामुळे वातावरण निर्मिती झाली. मुखपट्टी न लावता फिरणाऱ्या २७ लाख लोकांवर दंडात्मक कारवाई केली आणि त्यांना मुखपट्टय़ाही दिल्या. मुखपट्टय़ांबाबत कारवाई कडक केल्यामुळे मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या ११ हजारावरून २५ हजारापर्यंत वाढली नाही, हे मी सांगू इच्छितो.
खासगी रुग्णालयांवर वचक
करोनाचा संसर्ग वाढला तेव्हा आम्ही मुंबईतील सर्व खासगी रुग्णालये ताब्यात घेतली. ३५ मोठी रुग्णालये व १०० लहान रुग्णालयांमधील ८० टक्के खाटांवर पालिकेचे नियंत्रण आहे. हे कोणत्याही मोठय़ा शहराला शक्य झालेले नाही. त्यांना आरोग्यसेवेचे दर ठरवून दिले. रुग्णालयांनी दिलेल्या देयकावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने लेखा परिक्षक नेमले. या सर्व रुग्णशय्यांचे वितरण पालिकेच्या विभाग स्तरावरील नियंत्रण कक्षातून (वॉर्ड वॉर रूम) करण्यात येते. नियंत्रण कक्षाची ही संकल्पना माझी होती. २४ विभागांत प्रत्येकी १० डॅशबोर्डच्या माध्यमातून एका दिवसात १० हजारापर्यंत रुग्ण हाताळण्याचे आम्ही नियोजन केले. रुग्णाचा अहवाल आला की, या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून खाटा उपलब्ध करून दिल्या जातात. ६ जून २०२० पासून आतापर्यंत ६ लाख रुग्णांची या माध्यमातून व्यवस्था केली आहे.
औषधांची व रुग्णशय्यांची उपलब्धता
संपूर्ण देशात औषधांचा तुटवडा असताना आम्ही २ लाख रेमडेसिविर औषधे मिळवली. पहिल्यांदा असे घडले की, जी औषधे खासगी रुग्णालयांकडे उपलब्ध नाहीत ती पालिकेच्या रुग्णालयाकडे आहेत. टास्क फोर्सचे डॉक्टर शशांक जोशी यांनीही याकरिता पालिकेचे कौतुक केले आहे.
पहिल्या लाटेच्यावेळी आमच्याकडे जेवढय़ा रुग्णशय्या होत्या, त्यात आम्ही भर घालून रुग्णशय्यांची संख्या वाढवली. अतिदक्षता विभागाच्या खाटा १५०० वरून २८०० केल्या. तर अन्य खाटा १२ हजारावरून २२ हजारावर गेल्या.
संशयित रुग्णांसाठी आम्ही वेगळे विभाग तयार केले. म्हणजे ज्यांनी चाचणी केली नाही पण ते अत्यवस्थ झाले आहेत किंवा ज्यांच्या चाचण्यांचे अहवाल यायचे आहेत, अशा रुग्णांना जम्बो सेंटरमधील सीसीसी—टू मध्ये थेट भरती करून प्राणवायू देण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे अहवालाअभावी होणारे मृत्यू वाचले.
करोनाचा विषाणू हा अदृश्य आहे. तो कपाटात बंद करून ठेवू शकत नाही. त्याचे परिणाम हे दिसणारच आहेत. त्यामुळे एखाद्या शहराने कितीही मोठे दावे केले, तरी त्यांचे फसलेले नियोजन हे त्या शहरातील लोकांच्या हतबलतेवरून दिसते. करोनाशी लढाई ही अशीच पारदर्शकपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीनेच लढायला हवी. मुंबईतली रुग्णसंख्या कमी होणे हा चमत्कार नव्हता. तर त्यामागे खरे तर आमचे ‘मुंबई मॉडेल’ (मुंबईतील करोनालढय़ाचे प्रतिरूप या अर्थाने- पण मराठीत ‘मुंबईचा आदर्श’ अशाही अर्थाने) आहे!