आलोक मेहता

लेखक ‘एडिटर्स गिल्ड’चे माजी अध्यक्ष आहेत.

सत्ता, संपन्नता, यश या साऱ्यांपेक्षा अधिक महत्त्वाचे असते ती संघर्ष करण्याची क्षमता आणि ठाम जीवनमूल्ये! नरेंद्र मोदी यांच्या राजकीय यशाची चर्चा करताना त्यांची आजवरची संघर्षयात्रा आणि त्यातील प्रत्येक टप्प्यावर त्यांनी यश स्वत:कडे कसे खेचून आणले, हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरेल..

सत्ता, संपन्नता, यश या साऱ्यांपेक्षा अधिक महत्त्वाचे असते ती संघर्ष करण्याची क्षमता आणि ठाम जीवनमूल्ये! नरेंद्र मोदी यांच्या राजकीय यशाची चर्चा करताना त्यांची आजवरची संघर्षयात्रा आणि त्यातील प्रत्येक टप्प्यावर त्यांनी यश स्वत:कडे कसे खेचून आणले, हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरेल. १९७२ ते १९७६ या काळात गुजरातमध्ये पत्रकार म्हणून काम केलेले आता फारच कमी लोक राहिले आहेत. आपण तिथूनच सुरुवात करू या. त्या काळात- म्हणजे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्याविरोधात झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुढे आणीबाणी अशा काळात तिथे राहून वार्ताकन करण्याची संधी मला मिळाली होती. आणीबाणीच्या काळात नरेंद्र मोदी भूमिगत राहून संघ-जनसंघ व विरोधी पक्षांतले नेते यांच्यातील दुवा बनले होते. सरकारने आरंभलेल्या दमनसत्राबद्दलच्या वार्ता आणि इतर साहित्य गुप्तपणे आणीबाणीविरोधातील नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचे धाडसी काम ते करत होते.

त्या काळात त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही; पण त्यांचे लहान बंधू पंकज मोदी हे माझे सहकारी होते. त्यांच्याकडून नरेंद्र मोदींविषयी, रा. स्व. संघ आणि समाजसेवेबद्दलच्या त्यांच्या निष्ठेविषयी तसेच त्यांच्या लेखनक्षमतांविषयी माहिती मिळाली. आणीबाणीत तर नरेंद्र मोदी यांनी सरकारविरुद्ध चाललेल्या चळवळीत महत्त्वाची भूमिका निभावली होती. अटकेपूर्वी जॉर्ज फर्नाडिस वेश बदलून गुजरातमध्ये पोहोचले होते, तेव्हा त्यांनी मोदींची मदत घेतली होती. मूळचे काँग्रेसी; पण तरीही आणीबाणीविरोधी असलेले रवींद्र वर्मा यांच्यासारखे अन्य पक्षांचे नेतेही त्यांच्या संपर्कात असत. इतकेच नव्हे, पुढे आणीबाणीविषयी गुजराती भाषेत मोदी यांनी एक पुस्तकही लिहिले होते. आणीबाणीच्या काळातील या संघर्षांनेच त्यांना राष्ट्रीय राजकारणातील अवघड मार्ग पार करण्याचे बळ पुरविले होते. अगदी सुरुवातीच्या काळात त्यांचे ध्येय सत्तासोपानाचे नसले, तरी कठीणातील कठीण काळातही समाज आणि राष्ट्राप्रतीच कार्यरत राहण्याचा त्यांचा संकल्प मात्र दिसून येतो.

या संकल्पाचा प्रत्यय अलीकडेच जम्मू-काश्मीरबद्दल मोदी यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयातून आला. अनुच्छेद-३७० चा अडथळा दूर करून त्यांनी भारतीय लोकशाहीच्या इतिहासाचा नवा अध्यायच रचला आहे. सामान्यत: लोकांचा असा समज आहे की, जम्मू-काश्मीरबद्दलचा निर्णय त्यांनी तात्कालिक राजकीय-आर्थिक कारणांनी घेतला आहे. परंतु माझ्यासारख्या पत्रकारांना माहीत आहे, की १९९५-९६ पासूनच भाजपचे महासचिव म्हणून हरयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश या राज्यांबरोबरच जम्मू-काश्मीरमध्येही पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी ते प्रयत्नरत होते. आम्हा पत्रकारांबरोबरच्या चर्चामध्येही त्यांच्या बोलण्यात काश्मीरचा मुद्दा सातत्याने येत असे. भाजपला तेथे राजकीय जनाधार मिळवायचा होता. त्यामुळे मोदी हे रा. स्व. संघात असूनही सातत्याने जम्मू-काश्मीरचे दौरे करत असत. नव्वदच्या दशकात दहशतवाद टोकाला गेला होता. अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या भारत दौऱ्याच्या वेळी दहशतवाद्यांनी काश्मीरच्या छत्तीसिंगपुरा भागात ३६ शिखांची नृशंस हत्या केली होती. ही घटना समजताच, मोदी हे प्रदेश प्रभारी या नात्याने तात्काळ काश्मीरला रवाना झाले होते. कुठल्याही सुरक्षेविना, पोलिसी साह्य़ाविना रस्तेमार्गे ते दहशतवादाने प्रभावित असलेल्या त्या भागात पोहोचले होते. त्यावेळी फारुख अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते. त्यांना हे कळताच त्यांनी मोदींशी संपर्क केला. मोदींना ते म्हणाले, ‘‘तुम्ही तिथे पोहोचलात तरी कसे? तुम्ही अशाप्रकारे धाडस करून स्वत:चा जीव धोक्यात तर घालता आहातच, पण अशाने मलाही अडचणीत आणाल!’’ इतकेच नाही, तर अब्दुल्ला यांनी लालकृष्ण आडवाणी यांच्याकडेही मोदींची तक्रार केली की, आपले हे सहकारी कोणत्याही सुरक्षेविना काश्मीरमध्ये फिरताहेत, असे करणे चूकीचे आहे वगैरे. मग आडवाणींनीही मोदींना फोन केला. परंतु मोदींनी त्यांना ठामपणे सांगितले की, मृतांच्या अंत्यसंस्कारांनंतरच ते तिथून परततील. त्यांचे म्हणणे असे होते की, ‘आपल्या कर्तव्याचे पालन करताना मला जीवन-मृत्यूची पर्वा नसते.’

जम्मू-काश्मीरमधील दुर्गम गावांमध्ये निर्भयपणे फिरताना त्यांना तिथल्या समस्यांची जाणीव झाली. तेव्हाच या प्रदेशाला भारतातील इतर प्रदेशांप्रमाणे सुखी-संपन्न आणि विकसित करण्याचा संकल्प त्यांनी मनोमन केला होता. हिमालयातील पर्वतराजीचे तरुणपणापासूनच त्यांना आकर्षण होते. लेह-लडाखमध्ये पर्यटक प्राणवायूच्या कमतरतेमुळे अस्वस्थ होऊन जायचे, तेव्हा मोदींना मात्र फारसा त्रास होत नसे. २००१ च्या आधी त्यांनी लडाखबरोबरच तिबेट, कैलास-मानससरोवरची यात्रा केलेली होती. आता आशा करायला हरकत नाही, की येत्या काळात लडाख आणि काश्मीरचा प्रदेश स्वित्र्झलडप्रमाणे आकर्षक आणि सुविधांनी युक्त होईल.

हिमालयाप्रमाणेच नर्मदेनेही त्यांच्या मनाचा ठाव घेतला आहे. मागे मी नर्मदेचे महत्त्व, पाणीवाटप आदी मुद्दय़ांवर लिहित होतो. त्यासंदर्भात तेव्हा मुख्यमंत्री बनलेल्या नरेंद्र मोदींशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर, दोन वर्षांपूर्वी एका प्रकाशकांनी मला नर्मदेशी संबंधीत राजकीय वादविवादांपेक्षा तिच्या माहात्म्यावर भर देणारे इंग्रजी पुस्तक लिहिण्याचा आग्रह केला. तो मी मान्य केला. पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाबद्दल लिहिण्याची विनंती मी मोदींना केली. त्याची प्रत त्यांना पाठवली. आता पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींनी प्रचंड व्यग्र असूनही त्या पुस्तकाबद्दल सुंदर टिपण लिहून पाठवले. पुस्तक प्रकाशनानंतर त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. तेव्हा चर्चेमध्ये ते नर्मदा-हिमालय यांच्याविषयीच्या आठवणींत तल्लीन झाले होते.

मोदी हे आता जगातील मान्यवर नेत्यांमध्ये गणले जाऊ लागले आहेत. मला खात्री आहे की, मंगळयान, चांद्रयान यांच्यापेक्षाही पाणी, वीज, शिक्षण, गरिबांसाठी घरे आदी प्रश्न मार्गी लावताना त्यांना अधिक धन्यता वाटत असेल. त्यामुळे ‘सुट-बुट की सरकार’ हा त्यांच्यावर होणारा आरोप मला मान्य नाही. लहानपणापासून वयाच्या पन्नाशीपर्यंत जो माणूस गरीब वस्त्यांमध्ये राहिला, त्याचे सरकार गरिबांकडे पाठ फिरवेल काय?

शेवटी नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा आधार ज्ञानशक्ती, जलशक्ती, ऊर्जाशक्ती, जनशक्ती आणि सुरक्षाशक्ती हे आहेत. दिवस-रात्र ते याचाच विचार करत असतात, असे वाटते. त्यामुळे योग, स्वच्छ भारत, प्लास्टिक मुक्ती, स्वस्थ भारत यांसारख्या मोहिमा ते यशस्वी करू शकतात. दहशतवादाशी लढण्याचा रचनात्मक मार्ग म्हणजे सामाजिक आणि आर्थिक विकास, तो करण्यासाठी जननेता झालेले नरेंद्र मोदी यांच्या संकल्पांना आपण हातभार लावला पाहिजे.

Story img Loader