टॉम वडक्कन (भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची घेतलेली भेट हे दोन सभ्यतांचे संमीलन तर होतेच, परंतु संकटकाळाला धीराने तोंड देण्याची मोदी यांची धडाडी, त्यांनी अल्पसंख्याकांसाठी आखलेल्या तसेच सर्व भारतीयांसाठी राबवलेल्या योजनांमधून दिसणारी त्यांची सर्वसमावेशकता आणि पोप फ्रान्सिस यांचे विचार-चिंतन व कृती यांचा आढावा घेऊन पाहिल्यास, त्या पार्श्वभूमीवर ही भेट आणखीच आश्वासक ठरते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० ऑक्टोबर रोजी व्हॅटिकन येथे जाऊन पोप फ्रान्सिस यांची भेट घेण्याची घटना ही एक नवी सुरुवात आहेच, शिवाय एकापरीने तो काहीएक घटनाक्रमाचा शेवटही आहे. एका तपाच्या खंडानंतर, आपल्या देशातील अब्जाधिक लोकसंख्येचे लोकनियुक्त प्रतिनिधी आणि ख्रिस्ती धर्माचे दीपस्तंभ एकत्र दिसले. आजघडीला निम्मे जग ख्रिस्ती धर्मीय आहे, त्यामुळे या भेटीचा प्रभाव हा जाती, लिंग, धर्मपंथ वा राष्ट्रांच्याही सीमा ओलांडून अगदी तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचणारा आणि साऱ्या मानवतेला कवेत घेणारा आहे. पोप आणि भारताचे पंतप्रधान यांचे हे मनोमीलन मानवतावादाचे आणि सहानुभावाचे मूल्य जोपासणारे आहे आणि जगाने सोसलेल्या संकटांच्या, शोकमय आपत्तींच्या जखमा आजही भळभळत असताना, अशा मूल्यांच्याच जोपासनेची गरज आहे. आपल्याला केवळ संकटांशीच सामना करून चालणार नाही, तर लोकांच्या मनात त्यांच्या हाताबाहेरच्या कारणांमुळे जी तिरस्काराची भावना पेरली गेली आहे, तिच्याशीही मुकाबला करावा लागेल.
एक भारतीय नागरिक आणि एक ख्रिस्ती धर्मीय म्हणून मला असे वाटते की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे याच करुणेचे प्रतिनिधित्व करतात. ही भेट म्हणजे ‘वसुधैव कुटुंबकम्’ मानणारे भारतीय मानस आणि बायबलमधील ‘‘जो प्रीति करीत नाही, त्याची देवाशी ओळख झालेलीच नाही. कारण देव प्रीति आहे.’’ (१- योहान ४: ८) या वचनातून प्रतीत होणारे ख्रिस्ती मानस यांचे संमीलन होते. ख्रिस्ती धर्मातील पोपसारख्या अधिकारी अशा धर्मगुरूंना ‘पॉन्टिफ’ म्हटले जाते, त्या संज्ञेचा मूळ अर्थ ‘पूल उभारणारा’ असाही आहे. त्या अर्थाने, ही लक्षणीय भेट अनेकानेक पूल बांधणारी, म्हणून अगणित लोकांच्या मनांत आशेचा किरण जागवणारी आहे.
जगभर गेल्या काही महिन्यांत महासाथीमुळे झालेला गोंधळ आणि या ‘कोविड-१९’च्या साथीचे शोकात्म परिणाम दिसून आले, हे सारे भोग संपूर्ण मानवजातीला भोगावे लागले. या महासाथीच्या काळात पुन्हा जाती, वंश, धर्म आणि देश यांच्यातील दऱ्यासुद्धा रुंदावल्या. ही दरी लंघून जाण्याची हिंमत फार थोडय़ा लोकांनी दाखवली. मी अभिमानाने सांगू इच्छितो की, पंतप्रधान मोदीजींनी या महासाथीच्या काळात दिवसरात्र जे काम केले ते केवळ देशामधील या साथीचा परिणाम कमी व्हावा म्हणून नव्हे; तर देशाच्या सीमांचे बंधन न मानता, जगभरच्या लोकांसाठी आपण उपयोगी पडावे यादृष्टीने केले. मोदीजींना मानवजातीबद्दल करुणा असल्यामुळेच त्यांच्याकडून हे कार्य घडले. बंधू लक्ष्मणासाठी पवनसुत हनुमानांनी आणलेल्या संजीवनीचे कौतुक प्रभू रामचंद्रांना जितके होते, तितकेच कौतुक ज्या देशांमध्ये ‘व्हॅक्सिन मैत्री’ योजनेअंतर्गत भारताकडून लसमात्रा पोहोचल्या, त्या देशांमधील लोकांना या भारतीय मदतीचे होते. हीच भावना, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष याइर बोल्सोनारो यांनी एका ट्वीटमध्ये (२१ जानेवारी २०२१ रोजी) व्यक्त केली होती. बोल्सोनारो यांनी ट्विटरवरून भारताला ‘साहसी आणि करुणामय पाऊल उचलल्याबद्दल’ जाहीरपणे धन्यवाद दिले, त्यांच्या त्या ट्वीटसोबत द्रोणागिरी पर्वतासोबत लशीचे इंजेक्शन आणणाऱ्या हनुमानजींचेही चित्र होते.
हवामान बदल आणि परिसंस्थांतील असमतोल ही पर्यावरणसंबंधित आव्हाने किती भयावह झालेली आहेत, हे ओळखण्यातदेखील जगभरचे नेते कमी पडत असताना मोदीजींनी या आव्हानांशी मुकाबला सुरू केलेला आहे. गंगा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी मोदीजींनी घेतलेला पुढाकार तर अद्वितीय म्हणावा असा आहे. विकासाच्या, मानवकल्याणाच्या सर्वसमावेशकतेचे सूत्र ‘सब का साथ, सब का विकास’ या घोषणेतूनही दिसून येते. हा विकास व्यापक आहे, त्यातून कोणीही वगळले जाणार नाही, अशी ग्वाही अनेक योजनांतूनही मिळते. या दृष्टीने पाहाता, मोदी यांचा प्रभाव खरोखरच जागतिक पातळीचा आहे.
धर्माधर्मामधील सलोखा तसेच अल्पसंख्याकांना सामावून घेणारे विकासकेंद्री उपक्रम यांना मोदी सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असते, हे निराळे सांगायला नको. आज अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी कित्येक शिष्यवृत्ती योजना कार्यरत आहेत, अल्पसंख्याक महिला- मुले अथवा अन्य गरजूंसाठी सरकारने कैक उपक्रम आखलेले आहेत. भारतीय समाज हा विविधतेने नटलेला आहे, हे लक्षात घेता येथे सर्वासाठी एका छापाची, एका मापाची योजना चालत नाही हे खरेच. पण यापलीकडे जाऊन सर्वासाठी विमा- आरोग्य विमा योजना, एक अब्जाहून अधिक कोविड लसमात्रा, महासाथीच्या काळात आणि नंतरसुद्धा मोफत अन्नधान्य, अशा मोठमोठय़ा योजना मोदी सरकारने लीलया यशस्वी केल्या. आणखी एक उदाहरण म्हणजे गरिबांना पक्की घरे देणारी प्रधानमंत्री आवास योजना. या कल्याणकारी योजना मोठय़ा प्रमाणावर राबवल्या गेल्यामुळे आपला प्रवास मानवमुक्तीच्या दिशेने सुरू झालेला आहे. ‘महिला सबलीकरण’ ही बाकीच्या राजकीय पक्षांसाठी केवळ जाहीरनाम्यात छापण्यापुरती पोकळ घोषणा असते. याउलट आज, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही देशव्यापी मोहीम कार्यरत झाली आहे, मोफत गॅस आणि वीजजोडण्या मिळालेल्या आहेत, एकूणच खेडय़ापाडय़ांमधील जीवन सुधारणाऱ्या योजना आखून मोदी सरकारने त्या यशस्वी केलेल्या आहेत आणि त्यामुळे समाजातील महिला या घटकाच्या सबलीकरणाची ठोस पावले म्हणजे काय असतात हेही दिसून आलेले आहे.
पोप फ्रान्सिस हे अर्जेटिनात जन्मले. धार्मिक किंवा चर्चसंबंधित मुद्दय़ांवर त्यांनी पारंपरिक विश्वासांना पाठिंबा दिला आहे, परंतु वर्तमानकालीन जागतिक घडामोडींवर त्यांनी घेतलेल्या भूमिका पडताळल्या असता ते समाजवादी आहेत असे कुणाला वाटू शकते. आपल्या पूर्वसुरींपेक्षा कमी वैभवाची जीवनशैली त्यांनी निर्णयपूर्वक स्वीकारलेली आहे. क्युबा आणि अमेरिका यांचे संबंध हे वर्षांनुवर्षे ‘विळय़ाभोपळय़ासारखे’च ताणलेले राहिले होते, ते संबंध सुधारून उभय देशांमध्ये राजनैतिक संवाद सुरू करविण्यात पोप फ्रान्सिस यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. ‘एलजीबीटी’ (समलैंगिक) समूहांतील लोकांनाही विद्यमान पोप हे अधिक समजून घेणारे आणि अधिक स्वागतार्ह वाटतात. हवामान बदलाच्या समस्येवर आता ठोस कृती हवी, अशीच पोप फ्रान्सिस यांचीही भूमिका आहे. पोप फ्रान्सिस यांच्यामुळे काहीएक बदलांचे वारे जरूर सुरू झाले आणि जगभरातील ख्रिस्ती धर्मीय तरुणांनी या नवविचारांना पाठिंबाच दिला आहे. धार्मिक सलोखा हा पोप फ्रान्सिस यांना अग्रक्रमाचा विषय वाटतो. या मुद्दय़ावर, पॅलेस्टाइन अथवा संयुक्त अरब अमिराती यांसारख्या इस्लामी देशांच्याही नेत्यांशी आपले संबंध मैत्रीपूर्ण असावेत, असा पोप फ्रान्सिस यांचा कटाक्ष असतो. इस्रायल-पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्ष संपून तेथे शांतता नांदावी, यासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांत पोप फ्रान्सिसदेखील आहेत. आयसिस, तालिबान यांच्यामुळे जगाच्या काही भागांमधील लोकांचे जीवन आज कष्टमयच नव्हे तर संकटग्रस्त आणि कमालीचे अस्थिर झाले आहे, ते अस्थैर्य संपवून तेथील लोकांना चांगले जगण्याची संधी देणे ही जगाची जबाबदारी ठरते, असे पोप यांचे मत आहे. मानवकल्याणाचा विचार करताना सर्वसमावेशकतेला प्राधान्य देणारी मने थोरच म्हटली पाहिजेत. अशा थोर मनांचे मनोमीलन होणे, हे जगासाठी स्वागतार्हच ठरते. प्रेम आणि करुणा यांतून अशी थोर मने पृथ्वीवर स्वर्ग अवतरवू शकतात.