राम माधव

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व‘इंडिया फाऊंडेशन’चे संचालक

रामराज्याच्या वर्णनासाठी महात्मा गांधींनी ज्या मूल्यांचे दाखले दिले होते त्यांची पुर्नस्थापना अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीतून होईल. रामासाठी भौतिक संपत्ती हे जीवनाचे ध्येय नव्हते. रामाने आदर, प्रेम व सभ्यता या मूल्यांचा पुरस्कार केला होता. ही मूल्ये शत्रूसह सर्वाना लागू आहेत..

सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबरला (शनिवारी) अयोध्येतील राम मंदिराच्या प्रदीर्घ काळ रेंगाळलेल्या प्रश्नावर निकाल देऊन तो सोडवला. वादग्रस्त जागा राम मंदिरासाठी देऊन मशिदीसाठी वेगळी पाच एकर जागा देण्याच्या त्या निकालाने या वादावर कायमचा पडदा पडला. त्यातील कायदेशीर अडथळे दूर झाले. आता अयोध्येत भव्य असे राम मंदिर प्रत्यक्षात येईल यात शंका नाही. अयोध्येतील हा सगळा मुद्दा केवळ ‘मंदिर की मशीद’ एवढाच मर्यादित नव्हता. पूर्वीच्या काळातील मुस्लिमांनी हिंदूंच्या पवित्र स्थळांची जी नासधूस केली होती त्यामागील आक्रमकता, पुंडगिरी व मूर्तिभंजनाच्या प्रवृत्तींचे एक प्रतीक अयोध्येत होते. हिंदूंच्या अशा अनेक आराध्य ठिकाणी हल्ले करून मंदिरांची मोडतोड करण्यात आली होती. या वास्तूंशी हिंदूंच्या धार्मिक भावना निगडित होत्या व आजही आहेत. देशात अनेक मशिदी आहेत. अयोध्येतही शेकडय़ांच्या संख्येने मशिदी आहेत, त्यापैकी अनेक मशिदी व्यवस्थित राखलेल्याही नाहीत. आताच्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर देशात एक आत्मविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.

इतिहासकार अर्नोल्ड टॉयन्बी यांनी वेगळ्या संदर्भात जी निरीक्षणे मांडली होती ती येथे लागू पडणारी आहेत. टॉयन्बी यांनी वॉर्सा शहरातील चर्च पोलंडच्या सरकारने पाडल्याच्या घटनेबाबत म्हटले होते- ‘‘१९१४-१९१५ या काळात रशियाने वॉर्सा शहर बळकावले होते. त्या वेळी रशियनांनीच तेथे ईस्टर्न ऑर्थोडॉक्स कॅथ्रेडल शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बांधले होते. वॉर्सा हे शहर पोलंड या रोमन कॅथॉलिक ख्रिश्चन देशाची राजधानी होते. रशियनांनी हे कॅथ्रेडल तेथे बांधण्याचे औदार्य दाखवले, पण त्यामागे त्यांचा वेगळा हेतू होता. रशियन हेच आपले मालक आहेत हे दृश्यात्मक पातळीवर पोलंडच्या रहिवाशांवर सतत ठसवण्याचा कुटिल व नकारात्मक प्रयत्न यातून केला गेला. पहिल्या महायुद्धाअखेरीस, १९१८ मध्ये पोलंडने त्यांचे स्वातंत्र्य पुन्हा प्रस्थापित केले. त्यानंतर त्यांनी पहिली गोष्ट काही केली असेल तर रशियन वर्चस्वाचे प्रतीक असलेले ते ईस्टर्न ऑर्थोडॉक्स कॅथ्रेडल पाडून टाकले. पण पोलंड सरकारच्या त्या कृतीला मी दोष देणार नाही, कारण ते रशियन चर्च हे अधिसत्तेचा दर्प असलेले होते. ज्या हेतूने रशियनांनी ते बांधले होते तो धार्मिक नव्हता तर राजकीय होता. त्यांचा हेतू कुटिल व आक्षेपार्ह असाच होता यात शंका नाही. पोलंडने रशियनांच्या अधिसत्तेची बोच देणारे वॉर्सातील ते स्मारक (चर्च) पाडले असाच याचा अर्थ आहे. त्यामुळे त्यांनी केले ते योग्यच केले.’’

अयोध्येतील राम मंदिर-बाबरी मशिदीच्या प्रकरणाकडे याच दृष्टिकोनातून मुस्लिमांनी पाहावे. मुस्लीम आक्रमकांनी ज्याचे समर्थन करता येणार नाही असे ते कृत्य धर्माच्या नावाखाली केले होते. मंदिर पाडून मशीद बांधण्याच्या कृत्याचे समर्थन करण्याच्या अडचणीतून सर्वोच्च न्यायालयाने मुस्लीम समाजाची अंतिम निकाल देऊन मुक्तता केली आहे. इस्लाम धर्म हा गझनीचा महमद व बाबर या आक्रमकांच्या माध्यमातून भारतात आला, तसाच तेराव्या शतकातील हजरत ख्वाजा मोईउद्दीन चिश्ती यांच्यासारख्या सुफी संतांच्या माध्यमातूनही आला याची जाणीव मुस्लिमांना या निकालातून अप्रत्यक्षपणे करून दिली गेली असे म्हणता येईल.

सुफी संत हे प्रेम व सलोख्याचा संदेश घेऊन आले होते. अजमेर शरीफचा दर्गा हे भारतातील सर्वसमावेशकता, सर्व धर्म एकत्र नांदणारी विविधतेने नटलेली संस्कृती याचे प्रतीक आहे. भारतात सर्व धर्म गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत हे येथे विसरता कामा नये.

हिंदू लोकही जर अयोध्येच्या मुद्दय़ाकडे धार्मिक परिप्रेक्ष्यातून बघत असतील तर ते चुकीचे आहे. ‘ऐतिहासिक चुकांचा सूड घेणे’ अशी जर यात हिंदूंची मनोवृत्ती असेल तर ती चुकीची आहे. रामजन्मभूमी चळवळीचे नेते व हिंदू संघटना यांनी अयोध्येच्या निकालानंतर ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यातून असाच काहीसा भाव व्यक्त होतो.

अशीच एक ऐतिहासिक  घटना सत्तर वर्षांपूर्वी झाली होती. सोमनाथ मंदिर गझनीने मुघलांच्या आगमनाच्या अनेक शतके आधी पाडून टाकले होते. ते मंदिर १९५० मध्ये पुन्हा बांधण्यात आले. त्या वेळचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी असे म्हटले होते की, ‘ज्या ठिकाणावर लोकांची अपार श्रद्धा आहे ते (ठिकाण) कुठलीही व्यक्ती किंवा सत्ता संपवून टाकू शकत नाही. हाच संदेश या मंदिराच्या उभारणीतून जगाला देण्यात आला आहे. राखेतून उठून घेतलेली ही भरारी आहे.’

शतकानुशतके हिंदू धर्म जी मूल्ये, श्रद्धा यांवर फुलत आला त्याबाबतची बांधिलकी दाखवून देण्याचा आमचा हेतू यात आहे. रामजन्मभूमी हे ती मूल्ये-वारसा व श्रद्धेचे प्रतीक आहे. रामराज्याच्या वर्णनासाठी महात्मा गांधींनी ज्या मूल्यांचे दाखले दिले होते त्यांची पुनस्र्थापना अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीतून होईल.

रामाने आदर, प्रेम व सभ्यता या मूल्यांचा पुरस्कार केला होता. ही मूल्ये केवळ राम ज्या भूमीत जन्मला, ज्या देशात वावरला त्यांच्यासाठीच लागू आहेत असे नाही, तर शत्रूसह सर्वाना लागू आहेत. जेव्हा रामाने रणभूमीवर रावणाचा सामना केला तेव्हा लढण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो त्याच्यापुढे नतमस्तक झाला होता. रामासाठी भौतिक संपत्ती हे जीवनाचे ध्येय नव्हते. लंका जरी सोन्याची होती तरी माझी माता व मातृभूमीचे मोल व श्रेष्ठता ही सोन्याच्या लंकेपेक्षा खूप मोठी आहे असेच रामाने म्हटले होते.

१९९० च्या दशकात सुरू झालेली रामजन्मभूमी चळवळ वेगळी होती. त्यातील गर्भित व सखोल अर्थ फार थोडय़ा बुद्धिवंतांना समजला. जेव्हा ही चळवळ शिखरावर होती तेव्हा गिरीलाल जैन, अरुण शौरी यांच्यासह मोजक्या लोकांनाच त्यामागचा गर्भितार्थ उमगला होता. देशातील इतर मोठय़ा उदारमतवादी बुद्धिवंतांच्या गोतावळ्यास रामजन्मभूमी चळवळीचे मर्मच समजले नव्हते, त्यामुळे ते मंदिराच्या विरोधात होते. नोबेल विजेते लेखक व्ही. एस. नायपॉल यांनी एका मुलाखतीत असे म्हटले होते की, ‘या मंडळींना अपशब्द वापरून किंवा युरोपातील फॅसिझम हा शब्द वापरून त्यांची बोळवण काही जण करीत असतील, पण भारतात मोठी ऐतिहासिक घडामोड होत आहे. ती शहाण्या माणसांनी समजून घेतली पाहिजे किंबहुना त्याचा वापर भारताच्या बौद्धिक स्थित्यंतरासाठी करून घेतला पाहिजे.’

अयोध्येतील राम मंदिराचा लढा हा अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या योग्य व तर्कशुद्ध निर्णयाने संपला. आध्यात्मिक गुरू स्वामी चिन्मयानंद हे नेहमी म्हणत असत की, अयोध्येचा हा लढा खरे तर ‘अयुद्धा’साठी आहे. आता राम मंदिराच्या निर्माणानंतर देशात शाश्वत शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होईल अशी आशा आहे.

रशियनांनी पोलंडमध्ये वॉर्सा येथे बांधलेले हे ‘अलेक्सांद्रो नेवस्की (ऑथरेडॉक्स) कॅथ्रेडल’, पोलंड स्वतंत्र झाल्यावर तेथील सरकारने उद्ध्वस्त केले होते (१९१९ चे छायाचित्र, स्रोत: विकिपीडिया)

Story img Loader