अनिल परब  (मंत्री- परिवहन आणि विधानकार्य, महाराष्ट्र राज्य.)
करोनाकाळात अनेकांसाठी सुखरूप घरी परतण्याचे एकमेव साधन ठरलेली एसटी तोटा सोसूनही कार्यरत आहे..

देशाच्या पंतप्रधानांनी २४ मार्च, २०२० रोजी २१ दिवसांच्या कडकडीत ‘लॉकडाऊन’ची घोषणा  केली. करोनाचा प्रभाव रोखून धरण्याकरिता ही उपाययोजना योग्य होती; पण कामधंद्यानिमित्त, नोकरी-शिक्षणाकरिता परगावात गेलेली जनता आहे तिथेच अडकली. परप्रांतीय मजूर जे पोटाची खळगी भरायला मुंबईसह महाराष्ट्रात होते, त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न उपस्थित झाला. वैयक्तिक/ शासकीय कामानिमित्त मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांमध्ये आलेली गावोगावची जनता अक्षरश: रडकुंडीला आली, कारण येणारे २१ दिवस व त्यानंरही घरी जाण्याचा मार्ग पूर्णत: बंद झाला. महाराष्ट्रातील जे विद्यार्थी परप्रांतात होते त्यांचे पालक व्यथित झाले, तसेच विद्यार्थीसुद्धा कासावीस झाले. येणारे दिवस कठीण असणार याची कल्पना येऊ लागली होती. शासकीय मदत सुरू होती. पण घरी जाण्याची वाट अंधूक झाली होती. तसेच करोना संसर्गाचे भय सर्व जनतेमध्ये अशा प्रकारे होते की उद्याचा दिवस बघू की नाही अशी अवस्था झाली होती. समाजमाध्यमे आणि चित्रवाणी वृत्तवाहिन्यांनी यात अधिकच भर घातली.

अशा काळात, खऱ्या अर्थाने एसटीने मायमाऊलीची भूमिका बजावत महाराष्ट्राची अहोरात्र सेवा केली. सर्व प्रकारची वाहतूक बंद होती आणि जणू एसटी हा एकच आशेचा किरण होता. कोटा (राजस्थान) येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर होत चालला होता. महाराष्ट्रात परत आणण्यासाठी व महाराष्ट्रातील त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या धुळे विभागामार्फत ४ एप्रिल रोजी ७२ बसगाडय़ा कोटा (राजस्थान) येथे पाठविण्यात आल्या व एकूण १५८४ विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली.

महाराष्ट्रातील येणाऱ्या काळातील रुग्णसंख्या लक्षात घेऊन एसटी महामंडळातर्फे आणखीही पावले उचलण्यात आली. मुंबई महानगरपालिकेस पुणे विभागाकडून एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत १५ मिडी बसेस रुग्णवाहिका म्हणून उपलब्ध करून दिल्या गेल्या. तसेच मुंबई, ठाणे व पालघर विभागांडून मुंबई शहर परिसरातील अत्यावश्यक सेवेतील मुंबई महानगरपालिका, रुग्णालय कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचारी, पोलीस व इतर शासकीय कर्मचाऱ्यांकरिता दररोज जवळपास ४०० फेऱ्यांद्वारे जानेवारी २०२१ पर्यंत मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटीकडून जणू ही मानवंदना होती.

संकट गहिरे होत होते, रोजचा दिवस भीषण वास्तवाचा सामना करायला लावत होता; पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीत एक वेगळी ऊर्जा आहे. ममत्व आणि विषम परिस्थितीत कठोरपणा घेण्याची ताकद आहे. कोल्हापूर येथे अडकलेल्या ऊसतोड कामगारांच्या घरी जाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आणि क्षणाचाही विलंब न करता एप्रिल महिन्यात आठवडय़ाभरात ५२ बसगाडय़ांद्वारे सुमारे २०८० ऊसतोड कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले.

करोनाच्या पहिला लाटेचा विळखा घट्ट होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे जणू पालकत्व स्वीकारले होते. समाजमाध्यमांतून त्यांचे परिस्थिती व उपाययोजनांचे विवेचन आबालवृद्धांना आपलेसे वाटत होते. सर्वसामान्य जनतेविषयी त्यांची कणव कधीच पोकळ वाटली नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच विभागांनी अनेक उपाययोजना पद्धतशीरपणे राबविल्या आणि जनतेच्या परिवहनाच्या बाबतीत ते जातीने लक्ष घालत होते.

मुंबईच्या रस्तोरस्ती..

मुंबईची जीवनवाहिनी- उपनगरीय ‘लोकल’सेवा तसेच बेस्ट बसगाडय़ा- बंद असल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी- जे मुंबईबाहेरच्या दूरच्या ठिकाणांहून कामावर येत असत त्यांची गैरसोय लक्षात घेऊन एसटी महामंडळाने बेस्ट उपक्रमास सप्टेंबर २०२० ते जून २०२१पर्यंत दैनंदिन चालनासाठी एक हजार बसगाडय़ा – वाहक व चालकांसह- टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या होत्या. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता एसटीचे कर्मचारी अक्षरश: देवदूतासारखे धावून आले. मुंबईत राहण्याची, खाण्यापिण्याची कशी व्यवस्था असेल याचा विचारही न करता मिळालेल्या आदेशाला शिरसावंद्य मानून लढवय्या सैनिकाप्रमाणे एसटीचे कर्मचारी मुंबईत दाखल झाले. स्वत:चे कुटुंब, वृद्ध आईवडील, यांना गावी सोडून सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षतेकरिता एसटी कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून हे शिवधनुष्य पेलले. बाहेरगावातून येऊनसुद्धा या चालक वाहकांनी मुंबईच्या रस्त्यारस्त्यांवर एसटीची सेवा देऊन सर्वसामान्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडले. या जवळपास ४५०० कर्मचाऱ्यांच्या (२००० चालक, २००० वाहक, ५०० यांत्रिकी व प्रशासकीय कर्मचारी) सेवेचा एसटी महामंडळाला निश्चितच अभिमान राहील.

जसे देशभरात अडकल्याने लोक त्रस्त व भयभीत होते तसे विदेशातून भारतात येणारेही अस्वस्थ होते. मुंबईत तर आलो पण घरी कसे जायचे? पण याचेही उत्तर एसटीकडे होते. ‘वंदे मातरम्’ योजनेअंतर्गत विमानतळावरून नागरिकांना त्यांच्या मूळ घरी जाण्यासाठी मे, २०२० ते सप्टेंबर, २०२० या कालावधीमध्ये बसगाडय़ांची व्यवस्था करण्यात आली.

‘महाकागरे’ची सुरुवात!

सद्य:स्थितीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा संचित तोटा ६५०० कोटी रु.पेक्षा अधिक असून करोनाकाळात तो २५०० कोटींपेक्षा अधिक होता. इंधन दरवाढीमुळे दररोज दोन कोटी रुपयांची भर पडत आहे. पण तरीही एसटी महामंडळाने शस्त्र म्यान न करता ‘महाकार्गो’ या मालवाहतूक सेवेच्या निमित्ताने महसूल वाढविण्याचा धाडसी निर्णय करोनाच्या काळात घेतला आणि बघता बघता त्याला यशही आले. खासगी वाहतूक कंपन्यांच्या तुलनेत किफायतीशीर दर आणि सुरक्षित सेवा देणाऱ्या ‘महाकार्गो’ने गेल्या वर्षभरात मालवाहतुकीसाठी १ कोटी ४० लाख किलोमीटरचा टप्पा पार करत महामंडळाच्या तिजोरीत ५६ कोटींचा महसूल जमा केला आहे. मालवाहतुकीसाठी एसटीच्या ताफ्यात ‘महाकार्गो’चे १,५०० ट्रक आहेत. ‘महाकार्गो’ने आतापर्यंत लाखभर फेऱ्यांच्या माध्यमातून ७ लाख मेट्रिक टन मालाची वाहतूक केली आहे. या विषम स्थितीतही महाराष्ट्राच्या जनतेला आवडणारा कोकणचा आंबा जनतेच्या दारापर्यत ‘महाकागरे’च्या माध्यमातून एसटीने पोहोचवला, याशिवाय अन्नधान्य तसेच गरजेच्या वस्तूंचे वाटपही ‘महाकागरे’द्वारे करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या मदतीने माल वाहतूकदारांकडून मालाची जी वाहतूक करण्यात येते त्यापैकी सध्याच्या काळात २५ टक्के मालवाहतुकीचे काम राज्य परिवहन मंडळास देण्यास आले आहे.

महापुरातही मदत

करोनाचे भीषण संकट झेलत असताना महाराष्ट्रावर वादळ आणि महापुराचे महासंकट आदळले. एसटीचे कोटय़वधींचे नुकसान झाले पण याही परिस्थितीत एसटीने कर्तव्याची कास सोडली नाही. मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली, त्या वेळी कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या व नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांच्या समोर पुढे काय होणार या भीतीने अक्षरश: जीव मेटाकुटीला आला. पहाटे तीन-साडेतीनच्या दरम्यान निरोप येताच एसटीचे कर्मचारी तात्काळ दाखल झाले आणि मदतकार्यात स्वत:ला झोकून दिले. सुमारे ५८०० प्रवाशांना आपल्या घरीसुखरूप  सोडण्याचे काम एसटीने केले आहे.

महाराष्ट्रात जवळपास हजारो गावखेडी आहेत आणि जिथे वाहतुकीचे कुठलेही साधन नाही तेथे एसटी आजही आपली सेवा देत आहे. आबालवृद्ध, महिला, विद्यार्थी एसटीवर अवलंबून असतात; एसटी त्यांना आपल्या जिवाभावाची वाटते, दुर्गम भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा शहरात औषधोपचाराकरिता येणाऱ्यांसाठी एसटी देवदूताचे काम करते. ‘चांदा ते बांद्यापर्यंत’ जाणारे एकमेव वाहतुकीचे साधन म्हणजे एसटी! ऊन, पाऊस, वारा कोणत्याही परिस्थितीत एसटी आपले महत्त्व अधोरेखित करते. ऐन लॉकडाऊनमध्ये- एप्रिल २०२० ते सप्टेंबर २०२० दरम्यान जवळपास ३ कोटी किलोमीटरचा प्रवास ६ लाख फेऱ्यांमार्फत एसटीने महाराष्ट्रातल्या लोकांसाठी- विशेषत: करोना योद्धय़ांसाठी केला, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

कर्तव्याच्या भावनेतून झपाटलेल्या ३०४ शिलेदारांना एसटीने करोनाकाळात गमावले आहे. शासनाच्या वतीने त्यांच्या कुटुंबींयांना आर्थिक मदत झाली; पण कुटुंबातील कर्ता पुरुष जाण्याचे दु:ख न भरून निघणारे असते याची जाणीवही आहे.

Story img Loader