श्री एम* आध्यात्मिक विचारवंत आणि गुरू

भारतीय नागरिकांचे सामाजिक- सांस्कृतिक व आध्यात्मिक पुनरुत्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे झालेले आहे. भारत आज सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परिवर्तनातून जातो आहे. ‘सनातन धर्म’ जपण्याच्या, त्याचे संधारण आणि प्रसार करण्याच्या आणि त्यातून आपल्या आध्यात्मिक ऊर्जेच्या प्राचीन केंद्रांचे संरक्षण आणि जतन करण्याच्या कामी लक्ष घातले जाते आहे…

भारत ही ज्ञानाची, कलांची, संस्कृतीची, विज्ञानाची आणि अध्यात्माची भूमी आहे. शतकानुशतकांपासून भारताने जगाला मानवतेचा आणि विश्वशांतीचा मार्ग दाखवला असून ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेचा गाभा त्यामागे आहे.

वेदकाळापासून आपल्या या पवित्र भूमीने अनेक आक्रमणे सहन केली. पण आपल्या महान ऋ षी व संतांच्या छायेखाली आपल्या समृद्ध कला, आपली संस्कृती, आपला धर्म तसेच तत्त्वज्ञान, विज्ञान, वाङ्मय आदींचा ज्ञानरूपी खजिना शतकानुशतके टिकून राहिला आहे.

माझ्या अगदी तरुणपणापासून मी ‘सत्य’, ‘चिरंतन’ आणि अध्यात्माची शक्ती यांचा शोध घेतो आहे. मी मुस्लीम कुटुंबात जन्मलो, तरी काही एका दैवी हस्तक्षेपाने माझा पुनर्जन्म घडवला आणि मला अवघ्या १८ व्या वर्षी हिमालयात नेले. सत्य आणि आध्यात्मिक उन्नयनाच्या माझ्या शोधासाठी वसतिस्थान म्हणून मी हिमालयाची निवड केली. पवित्र केदारनाथ धाम क्षेत्राला मी अनेकदा भेट दिली आणि तेथेच मला इंदूरच्या महान राणी, देवी अहिल्याबाई होळकर यांच्याविषयीची विस्मयजनक माहिती मिळाली. गंगोत्रीपासून रामेश्वरपर्यंत आणि द्वारकेपासून गया या क्षेत्रापर्यंत हिंदूंच्या अनेक महत्त्वाच्या देवस्थानांचा, मंदिरांचा जीर्णाेद्धार अहिल्यादेवींनी कसा केला, हे मला समजले. देवी अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केलेल्या स्थानांपैकी केदारनाथ धाम, श्री ॐकारेश्वर, काशी विश्वनाथ, जगन्नाथपुरी आणि सोमनाथ ही क्षेत्रे सुपरिचित आहेत. 

माझ्या आध्यात्मिक शोधयात्रेत मी देशभरातील अनेक स्थळांना भेट दिली. यापैकी अनेक मंदिरे ही अर्थातच देवी अहिल्याबाई होळकर यांच्या देणगीतून फेरबांधणी होऊन पुनर्जीवित झालेली होती. मला आध्यात्मिकतेच्या विश्वात सखोल सूर मारण्याची तीव्र मनीषा होती, माझी स्वत:ला जाणण्याची आणि प्राचीन ज्ञान संपादन करण्याची आस घट्ट होती, म्हणून मी काशी विश्वनाथाच्या दाराशी पोहोचलो, जेथे आध्यात्मिक ऊर्जेचे नवेनवे आयाम मला उमगत गेले.

काशीमधील माझ्या वास्तव्यात मला नेहमी वाटे की, धर्म व अध्यात्माच्या या महान केंद्रांची- परकी आक्रमकांनी लुटलेल्या आपल्या मंदिरांची- फेरउभारणी करून त्यांना नवजीवन देण्याचा देवी अहिल्याबाई होळकर यांचा वारसा कुणी पुढे चालवेल की नाही? आपला महान धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा लयाला चालला, आपली प्राचीन कला- संस्कृती अध:पतित होऊ लागली आणि हिंदू धर्माच्या महान केंद्रांचाही ऱ्हास होऊ लागला ही भावना मला क्षोभित करत असे. 

आता मी काशी या चिरंतन नगरीतील पुनरुज्जीवित, पुनर्जीवित असे बाबा विश्वनाथ धाम विश्वार्पण केले जाताना पाहातो आहे, तेव्हा माझा अंतरात्मा शांतीची प्रचीती घेतो आहे, कारण मला आता माहीत झाले आहे की, महान ‘सनातन धर्म’ जपण्याच्या, त्याचे संधारण आणि प्रसार करण्याच्या आणि त्यातून आपल्या आध्यात्मिक ऊर्जेच्या प्राचीन केंद्रांचे संरक्षण आणि जतन करण्याच्या कामी लक्ष घालणारे या भूमीचे काही खरे सुपुत्र आहेत. असे एक नेते म्हणजे नरेंद्र मोदी. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करीत असताना आपला भारत, भौतिक आणि आध्यात्मिक उद्दिष्टांच्या पूर्तीकडे पुढली पावले टाकत आहे. व्यक्तिश: मला तर, श्री काशी विश्वनाथ धामामधून माँ गंगेचे दर्शन करता येईल हा विचारच रोमांचित करतो आहे.

भारतीय संस्कृती, आध्यात्मिकता आणि हिंदू धर्म यांचा पाया भक्कम करण्यासाठी मंदिरांचे पुनरुज्जीवन आणि संधारण करताना कितीही आव्हाने सामोरी आली तरी अहिल्यादेवी होळकर यांनी प्रयत्नांमध्ये क्षती राहू दिली नाही. नरेंद्र मोदी हेदेखील अहिल्यादेवींच्या पावलांवर पाऊल ठेवून आध्यात्मिकता व धर्म यांच्या महान केंद्रांचा कायापालट आणि त्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या मार्गावर चालत आहेत. मी हे सांगत असतानाच, मला केदारनाथ धाम क्षेत्राचा कायापालट आणि पुनरुज्जीवन प्रत्यक्ष दिसते आहे आणि महान ज्ञानवंत आणि गुरू आदिशंकराचार्य यांचे ‘समाधी स्थळ’ पुन्हा बांधले जाताना मी पाहातो आहे.

अयोध्येतील राम मंदिराचा जटिल मुद्दा इतक्या सद्भावपूर्ण आणि सरळ मार्गाने सोडविला जाईल, याची कुणाला कल्पनाही नव्हती. आज अयोध्येमध्ये राम मंदिराचे बांधकाम प्रगतिपथावर आहे, याचे श्रेय कोणाला जाते? नरेंद्र मोदी हेच परदेशांमध्येसुद्धा आध्यात्मिकता आणि धर्म यांची अनेक केंद्रे स्थापन करण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका महत्त्वाच्या पुढाकाराचा उल्लेख येथे करण्याजोगा आहे, तो म्हणजे आपल्या प्राचीन ‘योग’शास्त्राला जागतिक मान्यता मिळवून देणे. योग, जो आपल्या संस्कृतीचा आणि आध्यात्मिक जीवनशैलीचा अंगभूत भाग आहे, तो आज केवळ भारतातीलच नव्हे तर समुद्रांपारच्याही कोट्यवधी लोकांसाठी साह्यकारी आणि आरोग्यदायी ठरतो आहे. योग हा आता जगभरच्या लोकांसाठी जीवनाचे अंग ठरला आहे. ज्यांना आध्यात्मिकतेचा मार्ग अनुसरायचा नाही, त्यांच्यासाठी योग हा स्वत:च्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या उन्नतीचे एक साधन ठरला आहे. अगदी आधुनिक विज्ञानानेदेखील योगाचे फायदे स्वीकारलेले आहेत.

मी दहा वर्षांचा होतो, तेव्हापासूनच योग आणि प्राणायाम करण्यास सुरुवात केली. आज मी शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असण्यामागचे कारणही योग आणि प्राणायाम हेच आहे. लोकांनाही योग आणि प्राणायामाच्या खऱ्या शक्तीची प्रचीती येऊ लागलेली आहे कारण महासाथीच्या आव्हानात्मक काळात, या लोकांना बरे होण्यासाठी किंवा मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी योग आणि प्राणायाम साह्यकारी ठरले. भारत आणि जग नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऋ णात राहील, कारण योगामागील विज्ञानाचा पुन्हा परिचय करून देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ जाहीर करावा, यासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यातून, त्यांचे समुचित प्रयत्न दिसून आले.  

भारत आज सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परिवर्तनातून जातो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या मासिक नभोवाणी भाषणात एकदा ब्राझीलच्या जोनास मसेट्टी यांचा उल्लेख करून, रिओ दि जानिरोनजीक वेदान्त आणि भगवद्गीतेचे पाठ देण्यासाठी मसेट्टींनी केलेले प्रयत्न आणि त्यांना आलेले यश सांगितले होते. मोदी हे अनिवासी भारतीयांनाही विश्वशांतीसाठी स्वत:चा वाटा उचलण्याचे तसेच भारतीय भावनिष्ठा व मूल्ये यांचा प्रसार करण्याचे आवाहन नेहमी करतात. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर आव्हाने आणि कठीण परिस्थितीला सामोरे जाऊनसुद्धा विविध प्रकारे पुढाकार घेतल्यामुळे कोट्यवधी भारतीयांच्या आयुष्यांवर जो सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम झालेला आहे, तो इतिहासात सदैव कोरलेलाच राहील. गरिबांना योग्य स्वच्छतागृहे मिळवून देणे, स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला योजना, बेटी बचाओ- बेटी पढाओ, जलसंधारण, नमामि गंगे… असे अनेक पुढाकार सांगता येतील. या साऱ्या उपक्रमांचे जे महान यश आहे त्याचे वर्णन, ‘भारतीय नागरिकांचे सामाजिक- सांस्कृतिक व आध्यात्मिक पुनरुत्थान’ याच शब्दांत करावे लागेल.

(* रोमन लिपीतील ‘ट’ हे अक्षरच लेखक स्वत:चे नाव म्हणून लावतात; येथे ते देवनागरीत ‘एम’ असे लिप्यंतरित केले आहे.)

Story img Loader