पूर्वी चित्रकार शेतात बसून, आडवाटेला किंवा अगदी शहरातही रस्त्यावर बसून चित्र रेखाटताना नजरेस पडायचे. मग सामान्य रसिकांच्या कुतूहलपूर्ण नजरा त्या चित्रावरून फिरायच्या आणि समोरचे दृश्य त्या चित्रात किती छान पद्धतीने आले आहे, त्यावर तिथेच चर्चा रंगायची. आता अशा प्रकारे समाजात जाऊन, एखाद्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष चित्रण करणारे कलावंत कमी झाले आहेत. एक तर तेवढा सराव अलीकडच्या पिढीला नाही आणि त्यासाठी लागणारे धाडसही आता कमी झाले आहे. रसिक हे चित्रकार नसले तरी समोरच्या दृश्यातील सौंदर्यपूर्ण बाबी किती आणि कशा चित्रात उतरल्या आहेत ते त्यांना कळत असते. वयाच्या सत्तरीत अशा प्रकारे प्रत्यक्ष चित्रण करणाऱ्यांमध्ये शिवाजी तुपे अग्रणी होते. ते तमाम चित्रकार आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होते. वागायला अतिशय साधेपणा, हळुवार बोलणे, एखाद्या चित्रातली चूक दाखवताना समोरचा विद्यार्थी असला तरीही ते अतिशय आदरपूर्वकच त्याच्याशी बोलत ती दाखवून देत. तुपे सर संवाद साधत असताना सर आणि व्यक्ती या दोघांमधील वयाचे अंतर पूर्णपणे बाजूला व्हायचे. त्यांच्या या गुणांमुळे प्रत्येकाला ते केवळ जवळचेच नव्हे तर अगदी आपल्या घरातील व्यक्तीप्रमाणेच वाटत. त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये त्यांनी ३० हून अधिक प्रदर्शने केली, पण त्यांच्या कार्यशाळांची तर गणतीच नाही. महाराष्ट्रातील आजच्या आघाडीच्या चित्रकारांनी कधी ना कधी उमेदीच्या कालखंडात तुपे सरांच्या कार्यशाळेत सहभाग घेतलेलाच असतो. या कार्यशाळांमुळे ते राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. मग तुम्ही मध्य प्रदेशात असा किंवा मग बनारसच्या घाटावर, तुम्ही चित्रकार आहात व महाराष्ट्रातून आला आहात, असे कळले की, पलीकडची चित्रकलेशी संबंधित असलेली व्यक्ती तुपे सरांची वास्तपुस्त करते, असा अनुभव असलेली मंडळी महाराष्ट्रात अधिक संख्येने सापडतात. तुपे सरांचा एक महत्त्वाचा असा नित्यनेम होता तो म्हणजे दररोज न चुकता रेखाटने करण्याचा. ते कुठेही दिसले तरी त्यांच्या सोबत रेखाटनांची वही असायचीच. सहज त्यांना भेटायला गेलात काही लिहिण्यासाठी त्यांनी खिशात हात घातला तरी हाती येणाऱ्या कागदाच्या चिटोऱ्यावरही तुम्हाला रेखाटनच सापडावे.  तुपे सरांचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे ते कोणत्याही ठिकाणी चित्र काढण्यासाठी बसले की, मग सुरुवातीस ते इतर चित्रकारांप्रमाणे त्या समोरच्या दृश्याकडे पाहत. अनेकांना असे वाटायचे की, ते सौंदर्यस्थळाचा शोध घेत आहेत, पण ते तसे नसायचे, त्या दृश्याशी त्यांचा संवाद नजरेनेच सुरू व्हायचा आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर स्मित लकेर उमटली की समजायचे आता एक हात पेन्सिल किंवा मग ब्रशच्या दिशेने जाणार आणि मग चित्र सुरू.. व्हायचेही तसेच. ते निसर्गाशी संवाद साधणारे असे चित्रकार होते म्हणूनच तर ते तुम्हाला अगदी गिरीमित्र किंवा पक्षीमित्र संमेलनातही भेटायचे. चित्रकार हा समाजाचाच एक घटक असतो आणि चांगला चित्रकार व्हायचे तर आपल्याला चांगले संगीतही कळायला हवे. जगात जे जे चांगले आहे, ते कळायला हवे, असे ते नेहमीच म्हणायचे आणि प्रत्यक्षात करायचेही. नाशिकचा तर कोपरा न् कोपरा आज त्यांच्या ब्रशने पुण्यवान झाला आहे, म्हणूनच गोदाकाठ आज नि:शब्द झाला आहे!