२ मे २०११ रोजी पहाटे लादेनच्या तीन मजली घरावर अमेरिकन हेलिकॉप्टर्स घिरटय़ा घालायला लागली आणि अवघ्या ५२ मिनिटांच्या कारवाईनंतर अमेरिकन नेव्ही सील्सनी ओसामाचा मृतदेह घेऊन घटनास्थळावरून काढता पाय घेतला.. ‘अविश्वसनीय’ असलेली पाकिस्तानची विश्वासार्हता या घटनेमुळे आणखीनच रसातळाला गेली. त्यामुळेच ओसामापूर्वीचा आणि नंतरचा पाकिस्तान कसा होता, आहे हे जाणून घेणे गरजेचे ठरते.
ओसामाचा खात्मा झाला त्याच दिवशी सकाळी इस्लामाबादेतील अमेरिकन दूतावासाच्या आवारात दाढीधारी, इस्लामी पद्धतीची टोपी घातलेले, गबाळ्या वेशातले असे सुमारे २०० जण अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. एरवी रस्त्यावर या सर्वाना पाहिले असते तर ते कोणी धार्मिक मुस्लीम अथवा एखादा दर्गा वा मशिदीसमोर पुष्पगुच्छ विकणारे वगरे आहेत असेच कोणालाही वाटले असते. मात्र, ते प्रत्यक्षात होते सीआयएचे एजंट्स! त्यात अर्थातच काही पाकिस्तानी नागरिकांचाही समावेश होता. अबोटाबादमध्ये लादेन ज्या घरात राहत होता त्या परिसरात राहून छोटी-मोठी कामे करत असल्याचा भास निर्माण करत हे सर्व जण परिसरातील घटनांची बित्तंबातमी सीआयएकडे पोहोचवत होते. आता या सर्वाना पाकिस्तानातून बाहेर पडायचे होते.. कारण त्यांचे ‘मिशन’ पूर्ण झाले होते. तेव्हा सीआयएचे असे एकंदर सात हजार ‘मिशनरीज’ पाकिस्तानात होते आणि अजूनही काही कार्यरत आहेतच.
ओसामावरील ‘ऑपरेशन नेपच्यून स्पीअर’ ही अमेरिकेच्या दृष्टीने गेल्या दशकभरातील सर्वात मोठी कामगिरी. त्याच वेळी पाकच्या दृष्टीने बांगलादेशमुक्तीनंतरची सर्वात मोठी लाजिरवाणी घटना.
ओसामावरील कारवाईची तपशीलवार माहिती देणारी, किमान अर्धा डझन पुस्तके गेल्या दोन वर्षांत प्रकाशित झाली आहेत. मात्र, इम्तियाज गुल यांचे ‘पाकिस्तान- बिफोर अ‍ॅण्ड आफ्टर ओसामा’ हे पुस्तक ओसामापूर्वीच्या आणि आताच्या पाकिस्तानातील ‘ग्राऊंड रिअ‍ॅलिटीज’ विशद करते. यात कोणताही अभिनिवेश नाही की नाटय़मयता नाही. जे काही आहे ते उघड आहे. ओसामाच्या खात्म्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ जगभरातील वृत्तवाहिन्यांवर फ्लॅश होत होती, त्या वेळी अफगाणिस्तानच्या गुप्तचर विभागाचे तत्कालीन प्रमुख अमरुल्लाह सालेह यांनी वॉिशग्टनमध्ये २०१० मध्ये केलेल्या भाषणाची आठवण  गुल सांगतात, ‘लादेन, मुल्ला ओमर, गुलबुदिन हिकमतयार यांसारख्या नतद्रष्टांना पाकिस्तानातील त्यांच्या सुरक्षित गुहांमधून बाहेर काढले जात नाही तोपर्यंत पाकिस्तानात शांतता नांदणार नाही..’ असे सालेह म्हणाले होते. ओसामाचा ठावठिकाणा पाकिस्तानी लष्कर, आयएसआय, राज्यकत्रे यांना होता की नाही, होता तर त्यांनी त्याची माहिती अमेरिकेला का दिली नाही, की लादेनवरील कारवाई पाकिस्तानच्या संमतीनेच झाली या प्रश्नांची उत्तरे अद्यापही गुलदस्त्यात आहेत. दोन्हींकडून याचे नकारार्थीच उत्तर आजवर देण्यात आले आहे. मात्र, ओसामावर कारवाई झाली त्या वेळी अमेरिकन नेव्ही सील्सच्या हेलिकॉप्टर्सचे पायलट व पाकिस्तानी वायुदलाच्या तळावरील नियंत्रण कक्ष यांच्यात झालेला संवाद, घरावर हेलिकॉप्टर घिरटय़ा घालत असूनही फारशी हालचाल न करणारा ओसामा, त्याच्या घरात कोणताही आपत्कालीन मार्ग न सापडणे, हे सारे या घटनाचक्राभोवती संशयाचे वलय निर्माण करणारे आहे.
ओसामाच्या खात्म्यामुळे जागतिक पातळीवर पाकिस्तानची प्रतिमा कशीही झालेली असो, देशांतर्गत पातळीवर मात्र बरीच छी-थू झाल्याचे गुल स्पष्ट करतात. १९७१ मध्ये पाकिस्तानचे तुकडे पडून बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर जेवढी नाचक्की झाली होती तेवढीच किंबहुना त्याहूनही जास्त अशी नाचक्की या घटनेमुळे झाली आहे. लष्कर आणि आयएसआय यांच्यात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. ओसामाच्या हत्येनंतर काही दिवसांतच जेव्हा ब्रिगेडियर अली खान यांना अटक झाली त्या वेळी हा मुद्दा ऐरणीवर आला. अमेरिका, सीआयएच्या पगडय़ातून पाकिस्तानने मुक्त व्हावे यासाठी अली खान यांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. त्यांच्याकडे काणाडोळा झाल्याने ते अधिकच आक्रमक झाले आणि त्याचा स्फोट लष्करी अधिकाऱ्यांच्या बठकीत झाला. ओसामावरील कारवाईनंतर काही दिवसांतच याविषयी झालेल्या नाचक्कीतून सावरायचे कसे यावर विचारविनिमय करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराच्या काही अधिकाऱ्यांची बठक झाली. त्यात अली खान यांनी लष्कर आणि आयएसआय अमेरिकेच्या हातचे बाहुले झाले आहेत वगरे दुगाण्या झाडल्या. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. गुप्तचर यंत्रणेच्या या सर्वात मोठय़ा अपयशाचे धनी होण्यासाठी अखेरीस जनरल अशफाक कयानींनाच पुढे यावे लागले. मे २०११ मध्ये राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठात झालेल्या दीक्षान्त समारंभाच्या वेळी त्यांनी ही चूक मान्य केली. खरे तर या घटनेनंतर पाकिस्तानातील लोकनियुक्त सरकार उलथवून टाकत कारभार हाती घेण्याची लष्कराला सुवर्णसंधी होती. मात्र, कयानी यांनी हा प्रयत्न कटाक्षाने टाळला, हे विशेष.  
ओसामानंतर पाकिस्तानचे तालिबानीकरण आणि अल् कायदाचे पाकिस्तानीकरण कसे झाले आहे, याविषयी सविस्तर चर्चा गुल यांनी केली आहे. अमेरिकेवरील हल्ल्यानंतर अफगाणिस्तानात अमेरिकेने सुरू केलेले ‘ऑपरेशन एन्डय़ुिरग फ्रीडम’ आणि त्यासाठी घेतलेली पाकिस्तानची मदत या दशकभराच्या कालखंडात अमेरिका व सीआयएने पाकिस्तानात अतोनात हस्तक्षेप सुरू केल्याचे निरीक्षण सोदाहरण मांडले आहे. परिणामी १९९५ पर्यंत केवळ एकच दहशतवादी हल्ला अनुभवणाऱ्या पाकिस्तानात गेल्या दशकभरात तब्बल २११ दहशतवादी हल्ले झाल्याची आकडेवारी या पुस्तकात आहे. ओसामानंतर या हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढली आहे. त्यातही कराची, बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वाँ, पेशावर ही ठिकाणे जास्तच लक्ष्य बनली. लष्करातही तालिबान्यांचे प्राबल्य वाढले आहे. ओसामा हत्येनंतर काही दिवसांतच मिरानशाह या पाकिस्तानी नौदल तळावर झालेल्या तालिबानी हल्ल्यात नौदलातीलच काही कर्मचारी व अधिकाऱ्यांचा हात असल्याचे निष्पन्न झाल्याचे उदाहरण त्यासाठी पुरेसे आहे.  
एकूणच ओसामावरील कारवाईनंतर अमेरिका व पाकिस्तान यांच्यातील मधुचंद्र संपुष्टात आल्याचे मत गुल मांडतात. ओसामाच्या हत्येनंतर अफगाणिस्तान व पाकिस्तानातून काढता पाय घेण्याची तयारी अमेरिकेने चालवली आहे. त्याच वेळी पाकिस्तानला देण्यात येणारी आíथक मदतही कमी करण्याचा आग्रह अमेरिकन राज्यकर्त्यांनी ओबामा प्रशासनाकडे धरला आहे याचीही सविस्तर माहिती दिली आहे. शिवाय पाकिस्तानबद्दल वाटणारा अविश्वास, त्यातून अबोटाबादसह सर्वत्र सीआयए एजंटांचा झालेला सुळसुळाट, ओसामावरील कारवाईच्या वेळी पाकिस्तानला विश्वासात न घेणे या कारवायांवर गुल यांनी परखडपणे लिहिले आहे. मात्र, त्याच वेळी पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा लाळघोटेपणा, अमेरिकेची आíथक मदत सुरूच राहावी यासाठी त्यांनी केलेल्या दबावतंत्राचा वापर यांचाही ते समाचार घेतात.
अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत दोन्हीकडील प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या भूमिकेवरही प्रकाश टाकला आहे. अमेरिका सातत्याने आपल्याकडे संशयित नजरेने पाहते, असा समज तमाम पाकिस्तानी नागरिकांत आहे. ओसामावरील कारवाईनंतर तर तो अधिकच दृढ झाला आहे. प्रसारमाध्यमांनीही हा राष्ट्रीय आत्मसन्मानाचा विषय केला. हे आपले खूप मोठे अपयश असून हा आपल्या सार्वभौमत्वावरच घाला घातल्याचे चित्र प्रसारमाध्यमांनी रंगवले होते. मात्र, ओसामा गेल्या पाच-सहा वर्षांपासून बिनदिक्कतपणे अबोटाबादमध्ये राहत होता तेव्हा ते घाला घातल्यासारखे नव्हते काय, असा प्रश्न या माध्यमांनी स्वत:ला विचारावा, असे गुल नमूद करतात.
याव्यतिरिक्त ओसामाचा उदयास्त, त्याचा अफगाणिस्तान ते टोराबोरा ते अबोटाबादपर्यंतचा प्रवास, तालिबानी नेता मुल्ला ओमर याने अमेरिकेचा दबाव झुगारून ओसामाला दिलेला आसरा, वझिरिस्तानातील अमेरिकेच्या कारवाया, पाकिस्तानी लष्करातील धुसफूस वगरे माहिती अभ्यासपूर्ण आणि रोमांचक आहे. एकूणच ओसामापूर्वीच्या आणि नंतरच्या पाकिस्तानविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असलेल्यांसाठी हे पुस्तक वाचनीय आहे.
हत्येमागे बायकोच?
ओसामाच्या हत्येमागे नेमका कोणाचा हात असावा, याबाबत आजवर अनेक तर्कवितर्क लढवले गेले आहेत. मात्र, त्याच्या पत्नीनेच सीआयएला ओसामाची सुपारी दिल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट गुल यांनी केला आहे. ओसामाच्या हत्येची चौकशी करत असलेल्या अबोटाबाद आयोगाने खैरा आणि अमल या ओसामाच्या दोन्ही पत्नींची चौकशी केली असता त्यांच्यामध्ये प्रचंड द्वेष असल्याचे जाणवले. इस्लामाबाद तुरुंगातील वास्तव्यादरम्यान या दोघींमध्ये प्रचंड भांडण झाले. त्या वेळी खैरानेच ओसामाच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप अमलने केला. वृद्धत्वाकडे झुकलेल्या खैराला तरुण अमलविषयी प्रचंड असूया होती. तिचा काटा काढावा म्हणून खैरानेच सीआयएला टीप दिल्याचा आरोप अमलने या भांडणादरम्यान केला.

Story img Loader