वारीत सहभागी होणाऱ्यांत केवळ आध्यात्मिक अशा आनंदाची आस राहते असे नाही तर दुखाने गांजून गेलेलीही असंख्य माणसे असतात. आपल्याला पंढरीत वैष्णवांचा मेळा दाटलेला दिसतो, दिंडय़ा पताकांचे गर्जणारे भार दिसतात. नामाच्या गजरात दुमदुमणारे पंढरपूर दिसते. ही सगळी गर्दी केवळ भवसागर तरुण जाणारांची नाही, या भवसागरात गटांगळ्या खाणारे आणि नाकातोंडात पाणी गेल्याने गुदमरून जाणारेही खूप लोक आहेत..
आषाढात दाटून आलेले काळेभोर मेघ आणि पंढरीच्या दिशेने निघालेल्या िदडय़ा असे चित्र या दिवसात दिसते. दरवर्षी पेरणी झाल्यानंतर आभाळावर भरवसा ठेवत माणसे पंढरीची वाट चालू लागतात. गावोगावच्या िदडय़ा मजल दरमजल करीत पंढरपुरात विसावतात. फडफडणाऱ्या पताका आणि टाळमृदंगांच्या जयघोषात िदडीच्या वाटेवर पावले पडत राहतात. कोणाला हा भक्तीचा पूर वाटतो तर कोणाला विठ्ठलभक्तीचा उमाळा. कोणाला िदडी म्हणजे भावजागर वाटतो तर कोणाला अखंड प्रेमाचा कल्लोळ! कोणाच्या लेखी हे सुखाचे निधान तर कोणासाठी तो भवसागर तरून जाण्यासाठी वाळवंटी मांडलेला खेळ.. कोणासाठी हा वैष्णवांचा मेळा तर कोणासाठी अलौकिक अशा आध्यात्मिक आनंदाची आस. ज्याला त्याला आपल्या भावनेनुसार, कल्पनेनुसार सुचलेला हा पंढरीचा अगाध महिमा.
या वर्षी पावसाने ताण दिलेला. त्यामुळे िदडय़ांमध्ये चालणाऱ्यांची वाट कोरडीच. पाऊस बरा झाला असेल आणि पिकांनी भुईच्या बाहेर आपले तोंड काढले असेल तर रस्त्याने कुठे कुठे हिरवळ दिसते. अशा वेळी िदडीतला सहभाग वाढतो. आकाशात कुठेच पावसाचे ढग दिसत नाहीत. वातावरणात पावसाचा मागमूस दिसत नाही. पेरण्याही झालेल्या नाहीत. तेव्हा माणसांना गाव सोडावे वाटत नाही. िदडीत चालणाऱ्या पावलांमध्ये उत्साह राहात नाही. जेव्हा पाऊस या दिवसांत ताण द्यायला लागतो तेव्हा आता िदडय़ा परतल्याशिवाय तो येणार नाही, अशी ठाम धारणाही अनेकदा तोंडून व्यक्त होते. म्हणजे आषाढी एकादशीनंतर जेव्हा िदडय़ा परतीच्या दिशेला लागतील तेव्हाच तो येईल हा विश्वास.
हेही तितकेच खरे की िदडीत पायी चालणाऱ्या सगळ्याच पावलांमध्ये आवेग असतोच असे नाही. संसारात पोळलेली अनेक पावले या रस्त्यावर वळतात. जसे दिवसभर कष्टणारी माणसे एखाद्या भजनातल्या अभंगात, एखाद्या ओवीत आपला सारा शिणवटा विरघळवून टाकतात, तसेच जगण्याच्या लढाईत हरलेले अनेकजण िदडीच्या वाटेवरही दिसू लागतात. त्यामुळे जरा खोलवर पाहिले तर या सगळ्या ब्रह्मानंदी तल्लीन झालेल्यांच्या िदडय़ा नाहीत किंवा िदडय़ामधले सगळेच भक्तिरसात डुंबणारे नाहीत. यातल्या अनेकांची गत एखादी जखम उराशी बाळगत ठेचाळत ठेचाळत चालावे तशी आहे. नापिकी आहे, कर्जबाजारीपणा आहे, व्यवहारात पदरी आलेले नुकसान आहे, दैनंदिन जगण्यातले असंख्य ताप. त्यापासून जरा हा थोडा वेळचा विसावा आहे. इथले सगळेच वातावरण रखरखीत जगाचा विसर पाडणारे, रोजच्या वास्तवापासून बरेच दूर घेऊन जाणारे आहे. अनेकांच्या मनात आपण आयुष्याच्या जुगारात हरत आहोत ही भावना साठलेली. अशा वेळी जगण्याला कुठूनच बळ मिळत नाही. इथे ते थोडेफार मिळविण्याचे प्रयत्न चाललेले.
ग्रामीण भागांत उपेक्षेची धनी झालेली म्हातारीकोतारी माणसे. कोणी त्यांच्याकडे धड बघायलाही तयार नाही. अशा वेळी एखाद्या िदडीत दाखल झाले की सर्वासोबत आपलीही काळजी घेतली जाते अशी भावना. ‘माउली’ असे म्हणत सर्व प्रकारची देखभाल घेतली जाते. काही दिवस का होईना, पण आपल्याला आस्थेने विचारले जाते, ही त्यातल्या त्यात अनेकांसाठी समाधान देऊन जाणारी गोष्ट. पुन्हा एरवीचे आपले रहाटगाडगे सुरूच आहे. पण हे बऱ्याच जणांसाठी येणारे दरवर्षीचे विसाव्याचे ठिकाण. मनात दाबून ठेवलेल्या दु:खाला या निमित्ताने जरा आणखी तळघरात ढकलले जाते. टाळमृदंगाच्या घोषात आपले आतले कढ आपल्यालाही ऐकू येऊ नयेत असाच सगळा माहौल. एवढी दूरवर वाट चालल्याचा शीणही जाणवू नये अशी परिस्थिती. अनेकांना असेही वाटते, आपल्या अंत:करणातले दु:ख मोकळे करण्याचे ठिकाण म्हणजे पंढरपूर! तो आहे तिथे उभा. तो जाणतो सगळी आपली आपदा असा हा भाव. एकदा त्याच्या पायावर डोके ठेवले की आपल्या सगळ्या अपेष्टांचा विसर पडतो. एवढय़ा दूरवरून पायी चालत जो आटापिटा केला त्याचेही मग फारसे दु:ख वाटत नाही. संसाराचा ताप सर्वानाच असह्य़ करणारा, पण या तापदायक वाटेवर अनेकांसाठी हेच जणू मुक्कामाचे ठिकाण.
दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान।
त्री एकी अन्न अन्न करिता मेली॥
लज्जा वाटे जिवा त्रासलो या दु:खे ।
वेवसाय देखे तुटीयता ॥
संत तुकारामांसारख्या महाकवीने लिहून ठेवलेली ही संसाराची दुर्दशा..
काय खावे आता कोणीकडे जावे।
गावात राहावे कोण्या बळे।
कोपला पाटील गावचे हे लोक।
आता घाली भीक कोण मज॥
अशी सगळी भोवंडून टाकणारी परिस्थिती. आजही अनेकांच्या जीवनात असेच सगळे चालू आहे. एखादा तुकारामांसारखा कवी या सगळ्या परिस्थितीला वाचा देतो. अनेकांना मात्र आपले भोग सांगताही येऊ नयेत अशी परिस्थिती. अशा वेळी कुठे तरी ओलावा शोधण्यासाठी मग माणसे काही आधार मिळवू पाहतात. पावसाची सगळी नक्षत्रे एकापाठोपाठ एक कोरडी जात आहेत. ज्या दिवसात शेताशिवारात हिरवळ दिसू लागते त्या दिवसात सगळीकडे काळीभोर जमीन दिसू लागली आहे. पाऊस नाही त्यामुळे पेरण्या नाहीत. जेव्हा आभाळाचा रंग विश्वास देणारा नसतो तेव्हा खेडय़ात माणसे एक दुसऱ्याला ओळखतही नाहीत. आभाळाचा रंग आश्वासक असेल तरच एक-दुसऱ्याची नड भागविली जाते. कारण काही दिले तरी परतीची अपेक्षा असते अशा वेळी. नेमक्या अशा काळवंडून टाकणाऱ्या परिस्थितीत या सगळ्या लोकांसाठी विठ्ठलच धावून येतो.
ही सगळी खेडय़ापाडय़ातली, दूरदूरच्या डोंगरवस्त्यांवरची माणसे वारीत सहभागी होतात. यात केवळ आध्यात्मिक अशा अलौकिक आनंदाची आस राहते असे नाही, तर दु:खाने गांजून गेलेलीही असंख्य माणसे असतात. आपल्याला पंढरीत वैष्णवांचा मेळा दाटलेला दिसतो, िदडय़ा-पताकांचे गर्जणारे भार दिसतात. नामाच्या गजरात दुमदुमणारे पंढरपूर दिसते. ही सगळी गर्दी केवळ भवसागर तरुण जाणारांची नाही. या भवसागरात गटांगळ्या खाणारे आणि नाकातोंडात पाणी गेल्याने गुदमरून जाणारेही खूप लोक आहेत. जगताना ही रयत ज्या झाडाझडत्या देते त्या रयतेच्या दु:खाचे कडही चंद्रभागेच्या पाण्यात मिसळलेले दिसतील. यातले काही हुंदके जेव्हा विठूरायापर्यंत पोहोचत असतील तेव्हा कदाचित त्याच्या पायाखालची वीटही थरारत असेल!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा