कुमारजींचा खरा ध्यास होता, तो सतत काही नवं करत राहण्याचा. मुद्दामहून नवं करण्याच्या हट्टापलीकडे जाऊन, सततच्या चिंतनातून जे सापडत होतं, त्याची पुनर्माडणी करण्याचा हा ध्यास विलक्षण या शब्दात मावणारा नव्हता. पण त्या सगळय़ा प्रयत्नामागे एक हेतू निश्चितच होता, तो संगीतात चैतन्य भरण्याचा.
कशासाठी जन्म घ्यायचा, हे जन्मल्यानंतर फार लवकर कळणारी माणसं लोकोत्तर होतात, असा आजवरचा अनुभव. जन्मलो, म्हणून जगत राहय़लो, असं करण्यापेक्षा जन्मलोच आहे, तर पुरेपूर जगून घेऊ आणि परिसरातील सगळय़ांना बरोबर घेऊन जगू या, अशी प्रेरणा असणाऱ्या अगदी थोडक्यांमध्ये कलावंतांचा समावेश करायलाच हवा. कुमार गंधर्व यांच्या नव्वदाव्या जन्मदिनाच्या निमित्तानं (जन्म- ८ एप्रिल १९२४) अशा थोडक्यांचे म्होरके असणाऱ्यांचं गुणगान अस्थानी ठरायला नको. कुमारजींनी काय केलं आणि काय काय केलं नाही, याची यादी भलीथोरली होण्याची शक्यता अधिक. पण त्यांनी भारतीय संगीताचा थेट स्थायीभाव नसलेल्या आनंदाला आपल्या आणि सगळय़ांच्या जगण्याचा ठेवा करून ठेवल्यानं जगण्यातली मजा मात्र वाढवली. भारतीय अभिजात संगीताच्या परंपरेतील माहीत असलेली पहिली परंपरा प्रबंध गायनाची. त्याचे कोणतेच अवशेष शिल्लक नसल्यानं साधारण अंदाजानं आणि त्यावरील विविध लेखनांचा अभ्यास करून जो अंदाज बांधायचा, तो अस्सल असण्याची शक्यता कमी. तरीही प्रबंध गायनानंतरच्या धृपदाच्या गायकीवरून प्रबंध गायकीचा काहीसा धूसर अंदाज बांधता येईल. धृपदातून निर्माण झालेल्या ख्याल गायकीनं संगीताचा चेहरामोहराच बदलून गेला. ख्याल गायकीची परंपरा पुढे चालवत असताना कुमार गंधर्वानी त्यात जे चैतन्य आणलं, त्यानं ही परंपरा नुसती समृद्ध झाली नाही, तर त्याला अनेक वेगवेगळे पदर मिळाले. ख्याल गायकीतून उलगडणारे कुमार गंधर्व जेवढे सर्जनशील तेवढेच लोकसंगीताच्या वाटेनं जाऊन त्यातली अभिजातता शोधणारे कुमारजीही वेगळे. भारतीय संस्कृतीच्या परंपरेत दीर्घकाळ वास्तव्य करणाऱ्या संतपरंपरेला निर्गुणीच्या रूपानं त्यांनी दिलेला साज जेवढा गहन, तेवढाच रागसंगीतातील अनेक कोडी उलगडण्याचा त्यांचा ध्यासही कमालीचा. फार लहान वयात आपण काय करायचंय हे कळलेल्या कुमारांना इतरेजनांची सारी आयुष्यं पुरून उरतील, एवढी नवनिर्मिती करता आली. वर्षांचाच हिशेब करायचा तर कुमार गंधर्वाचं आजचं नव्वदाव्या जन्मदिनाचं स्मरण हे खरं तर काहीशेव्या वर्षांचंच असेल. आयुष्यभर त्यांनी घेतलेल्या नवनिर्मितीच्या ध्यासाला त्यांच्या तल्लख आणि कुशाग्र बुद्धिमत्तेनं कधीच तडा जाऊ दिला नाही. एकाच आयुष्यात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर नवनिर्माण होण्याची खचित घडणारी ही घटना कुमारांच्या निमित्तानं घडली आणि त्याला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील बदलत्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचाही अंदाज घेता आला, हे सगळय़ात महत्त्वाचं.
घराणेदार असलेल्या अभिजात संगीताच्या परंपरेला पुन्हा नवी झळाळी देत त्यातील कूटप्रश्न सोडवणाऱ्या कुमारजींचा खरा ध्यास होता, तो सतत काही नवं करत राहण्याचा. मुद्दामहून नवं करण्याच्या हट्टापलीकडे जाऊन, सततच्या चिंतनातून जे सापडत होतं, त्याची पुनर्माडणी करण्याचा हा ध्यास विलक्षण या शब्दात मावणारा नव्हता. पण त्या सगळय़ा प्रयत्नामागे एक हेतू निश्चितच होता, तो संगीतात चैतन्य भरण्याचा. थुईथुई नाचणाऱ्या मोराला पाहून होणाऱ्या आनंदाप्रमाणे त्यांच्या गायनातून हे चैतन्य सतत पाझरत राहिलं. आनंद स्वरातून कसा देखणेपणानं साजरा करायचा, याचं कुमारजी म्हणजे एक अप्रतिम उदाहरण. रागसंगीताकडे पाहण्याची परंपरागत दृष्टी बदलणं आणि तिथं नव्या वैचारिक अधिष्ठानाची स्थापना करणं, हे फारच वेगळं आणि महत्त्वाचं काम होतं. तोच हमीर, तोच मालकंस, तोच तोडी आणि तीच भैरवी. शतकानुशतकं, या रागांचे स्वर बदलले नाहीत, त्यातील स्वरांचे संबंध बदलले नाहीत आणि त्यांच्या मांडणीतही फरक पडला नाही. पुढच्या पिढीच्या प्रत्येक नव्या कलावंतानं रागाची मूळ चौकट न मोडता, त्यात आपल्या प्रतिभेनं नवी भर घातली. कुमारांनी हे सारं केलंच. पण रागाकडे पाहण्याची नवीच दृष्टी दिली. डावीकडून, उजवीकडून, मागून, वरून, खालून तोच राग कसा वेगळा दिसतो, हे त्यांनी दाखवलं. नेहमी ऐकणाऱ्याला स्तंभित करायला लावणारी ही वेगळी नजर त्याला नुसता कलात्मक आनंद देऊन थांबली नाही, तर ‘अरेच्चा, हे असं पण दिसू शकतं की!’ अशी भावना त्याच्यामध्ये रुजली गेली. सतत स्फुरण्याचं हे अलौकिकत्व फार थोडय़ांच्या वाटय़ाला येतं. बहुतेकांना आयुष्यात क्वचित एखादंच असं शिखर सर करता येतं, की त्यानंतरच्या काळात त्याच्या आसपासच्या छोटय़ा-मोठय़ा टेकडय़ांवरच समाधान मानावं लागतं. कुमारजींच्या सर्जनाचं वेगळंपण असं की, त्यांना सततच उंच शिखरांवर विजय मिळवता आला. काही वेळा त्या शिखरांची उंचीच रसिकांना कळली नाही, पण म्हणून कुमारांनी हा स्वरविजय थांबवला नाही. ते पुन:पुन्हा नव्या शिखराच्या विशालतेनं अचंबित होण्याच्या प्रयत्नांना लागले. कबीर, सूरदास, मीराबाई यांच्या भक्तिपर रचनांना त्यांनी नुसत्या चाली लावल्या नाहीत. त्या संतांच्या विचाराचं सार स्वरांच्या माध्यमातून कसं पोहोचवता येईल, याची त्यांना चिंता होती. जगण्याच्या प्रत्येक क्षणी सर्जनाचं हे दडपण त्यांनी निभावण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच भा. रा. तांबे यांच्यासारख्या मराठीतील ज्येष्ठ कवीनं त्यांना साद घातली. नाटय़संगीताला अभिजाततेच्या पातळीवर नेऊन ठेवणाऱ्या बालगंधर्वाच्या गायकीनं त्यांना खुणावलं. बालगंधर्वासारख्या कलावंताच्या संगीताचा नव्यानं धांडोळा घ्यावा, असं त्यांना वाटलं, याचं कारणच त्यात निश्चित असं नवं रूप त्यांना सापडलं होतं. हे प्रयोग फसले असं कुणाला वाटलं, तरी त्यानं कुमारांनी खचून जाण्याचं कारण नव्हतं. कारण त्यांची प्रतिभा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आता मागे वळून पाहताना ‘तांबे दर्शन’ किंवा ‘मला उमजलेले बालगंधर्व’ या त्यांच्या कार्यक्रमांबाबत महाराष्ट्रातील रसिकांनी नाकं का मुरडली असतील, असा प्रश्न पडतो. पण कलावंताला जेव्हा सर्जनाचं भरभरून दान मिळतं, तेव्हा त्याला मागे वळून पाहायचीही सवड मिळत नाही. कुमारांच्या बाबतीतही असंच घडलं असावं.
सतत नवं आणि अभिरुचीपूर्ण सुचणं म्हणजे नवोन्मेष. हे भाग्य त्यांना लाभलं. त्याचं कधी त्यांना अप्रूप वाटलं की नाही कोण जाणे. प्रत्येक वेळी काही नवं मांडायचं आणि त्यातून सांगीतिक विचार पुढे न्यायचा, हेच त्यांच्या आयुष्याचं श्रेयस आणि प्रेयस. ते कधी समाधानी होते की नाही ठाऊक नाही, पण आपण काही नवं शोधतोय आणि त्या नवतेला परंपरेचाच आधार आहे, हे मात्र ते ठासून सांगायचे. परंपरेकडे परंपरागत नजरेनं न पाहता, त्यातूनच नव्यानं काही घडवण्याची ही प्रवृत्ती फार थोडय़ा कलावंतांमध्ये दिसते. कुमारजींनी हे सारं केलं, कारण त्यांना त्यांच्या प्रज्ञेनं आणि प्रतिभेनं कधीच अंतर दिलं नाही. निसर्ग आणि संगीत हा त्यांच्या जगण्याचाच गाभा होता. त्यामुळे निसर्गाच्या चमत्कारांपुढे नतमस्तक होत आणि भारावून जाण्यात त्यांना आनंद वाटला. त्यांच्या बंदिशींमधून दिसणारा हा निसर्ग असा चैतन्यदायी आणि आनंदपूर्ण होऊन आपल्यापुढे उभा ठाकला. मग ते गौड मल्हाराचं सर्वागीण दर्शन किंवा वर्षांगीत असो, की हेमंत, बसंत ऋतूचं दर्शन असो. ऋतुराजांचं वैविध्यपूर्ण दर्शन असो की त्या सगळय़ा निसर्गदर्शनाला एक नवी झळाळी प्राप्त करून देण्याचं सामथ्र्य त्यांच्या संगीतात होतं. हे असं झालं, याचं कारण त्यांना सतत ओढ होती, ती चैतन्याची. त्यातून व्यक्त होणाऱ्या आनंदाच्या सुखद लहरींची. पण म्हणून तेवढंच करत राहणं, त्यांच्या नवोन्मेषी सर्जनाला पुरणारं नव्हतं. ठुमरी, टप्पा, तराणा यांसारख्या अभिजात संगीतप्रकारांकडे अभ्यासकाच्या नजरेनं पाहणाऱ्या कुमारजींची समाज, त्यातील नाना प्रकारचे प्रश्न, त्यातील गुंतागुंत हेही संगीतातून व्यक्त करण्याची तयारी होती. बुद्धी आणि भावना यांच्यावर विजय मिळवत मानवी मनाचे अनेक चेहरे शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हे सारं स्वरांच्या साहय़ानं करायचं आणि त्याला गरजेपुरता शब्दांचाही आधार द्यायचा. निर्गुणीतल्या स्वरांच्या लगावापासून ते त्यांच्या अभिव्यक्तीपर्यंत त्याला एका वैचारिक बैठकीचं अधिष्ठान देत असताना भावनेचीही डूब देणारे कुमारजी, लोकसंगीतातील अभिजातता शोधणारे कुमारजी, रागसंगीताला बुद्धिगम्यतेच्या पलीकडे नेणारे कुमारजी अशी त्यांची रूपं प्रत्येकाला भारावून टाकणारी. स्वरांनी भरलेलं आणि भारलेलं मनाचं अवकाश घेऊन, पृथ्वीचं अवकाश त्यातील सगळय़ा गुणावगुणांसह कवेत घेण्यासाठीही स्वरांनाच शरण जायचं, ही त्यांची धारणा होती. संगीताकडे योग्याच्या नजरेनं पाहू शकणारा असा कलावंत दुर्मीळ. कुमार गंधर्वाच्या निधनानंतर दोन दशकांनीही त्यांच्या स्वरसान्निध्यानं मोहरून जाणाऱ्या आणि चैतन्यानं भारून जाणाऱ्या संगीतप्रेमींसाठी ते सतत न उलगडलेलं कोडं राहिलं. कलावंताच्या जगण्याला याहून वेगळा अर्थ कशाला हवा?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा