पुरुषी अन्याय, पुरुषी अहंकार आणि स्वार्थ यामुळे होणारी स्त्रीची परवड, या त्याच त्या फॉर्मची बाधा न झालेला हा दोन लघुकादंबऱ्यांचा संग्रह. हेच याचे वेगळेपण आहे आणि वाचनीयतेचे एकमेव कारणही. अन्यथा या प्रणयकथाच आहेत.अखिल भारतीय धीट-धाडसी लेखिकांच्या शौर्याची मापनपट्टी ही दुर्दैवाने त्यांच्या उघडय़ावाघडय़ा कामवर्णनांच्या मात्रेवरून ठरविण्यात आली आहे. इस्मत चुगताई यांच्यापासून तसलिमा नासरिन, शोभा डे यांच्या साहित्यातले धीटपण म्हणजे निव्वळ त्यातील बेधडक वर्णनेच आहेत असा समज तथाकथित संस्कृतीरक्षक किंवा धक्का बसलेल्या आणि हादरून गेलेल्या वाचकांनी साहित्य व्यवहारामध्ये रुजवला आहे. आडमार्गाने मांडत कुठे कुठे स्पष्टपणे आकारू लागलेली ही ‘उघड वर्णने’ तपासली तर वास्तवाच्या अंमळही जवळ नसणाऱ्या विशिष्ट मर्यादाकुंपणापर्यंत त्यांची धाव गेलेली दिसते. विश्वप्रवाहामधील लैंगिकतेची करडी छटा दाखविणाऱ्या ‘ममी पोर्न’, साशा ग्रे-जेना जेम्सन या पूर्वाश्रमीच्या पोर्नपऱ्यांच्या साहित्यकृती किंवा टोबी लिट, चक पाल्हानिक या लेखकांच्या ‘हार्डकोर’ आणि कालसुसंगत कादंबऱ्यांच्या तुलनेत बिनधास्तपणाचे लेबल लागलेल्या भारतीय कादंबऱ्या अद्यापही ‘वयात’ आल्याचे दिसत नाही. तरीही त्यातल्या त्यात संस्कृतीरक्षक नामक घटकांना विरोधशस्त्र परजण्यासाठी आणि समाजातील एका  घटकाला डोळे वटारण्याचा व्यायाम देण्यासाठी या कादंबऱ्यांचे महत्त्व आहेच. या भारतीय प्रभृतींच्या चमूत संगीता बंद्योपाध्याय हे आणखी एक बंडखोर आणि बेधडक बंगाली नाव समाविष्ट झाले आहे.
संगीता बंद्योपाध्याय यांच्या ‘पॅण्टी’ या लघुकादंबरीने २००६मध्ये बंगालमध्ये खळबळ उडवून दिली होती. भारतीय वाचकांसाठी ती आता आणखी एका लघुकादंबरीसोबत इंग्रजीत आली आहे. यातील बेधडकपणा आणि वेगळेपणा हा आहे, की यात पुरुषी अन्याय, पुरुषी अहंकार आणि स्वार्थ यांमुळे स्त्रीची होणारी कुचंबणा या पारंपरिक घटकाला थारा नाही.
‘पॅण्टी’च्या प्रमुख व्यक्तिरेखेला नावच नाही. ही कथा आहे कुठल्याशा अज्ञात शहरातून कोलकातामधील एका उंची फ्लॅटमध्ये अचानकपणे उतरलेल्या तरुणीची. यात तिची रवानगी तिच्या मित्रानेच गुप्तपणे केलेली आहे. ही तरुणी एका दुर्धर आजारावर शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आलेली असते. सुरुवातीलाच फ्लॅटमध्ये एका खोलीत तिला बिबटय़ाळलेल्या चित्राचे अंतर्वस्त्र सापडते आणि त्यावरून ते जिच्या मालकीचे असेल तिच्या लैंगिक व्यवहारावर तर्क सुरू होतो. पुढे या तर्कापासूनच विस्तारत जाणाऱ्या स्वगत तपशिलांचे टप्पे म्हणजेच या निनावी नायिकेच्या आयुष्याचा विशिष्ट कोन मांडणारी ही लघुकादंबरी. इमारतीचा परिसर, बाल्कनीतून रस्त्यावर दिसणाऱ्या उघडय़ावरच्या संसाराच्या कथा, वैध-अवैध नातेसंबंधांवरची मतमतांतरे आणि एकूणच कामेच्छांच्या अपूर्तीगाथा यांनी ही कादंबरी भरली आहे. निव्वळ स्त्रीपात्राच्या तोंडून येणारी कामवर्णनेच वाचण्यासाठी आलेला या कादंबरीत फार काळ टिकू शकत नाही, इतकी चाणाक्ष रचना लेखिकेने केली आहे.  
‘हिप्नॉसिस’ ही लघुकादंबरी तुलनेने मोठी आणि अधिक स्तरावर या पिढीच्या स्त्री लैंगिकतेवर प्रकाश पाडणारी आहे. उच्च मध्यमवर्गात वाढलेली इलिआना कुहू मित्र या वृत्तवाहिनीत काम करणाऱ्या मध्यमवयीन तरुणीची ही कहाणी आहे. आचारश्रीमंतीइतकीच तिच्याजवळ विचारश्रीमंती आहे. आपल्या नवऱ्याला सोडून ती माहेरातील स्वत:च्या फ्लॅटमध्ये वास्तव्य करते. वृत्तवाहिनीमध्ये दररोज नाइट शिफ्टच करते आणि फावल्या वेळात मैत्रिणींसोबत लैंगिक उपासमारीच्या चर्चाही करते. एक दिवस वृत्तवाहिनीमध्ये तिला आघाडीचा संगीतकार मेघदूत अपघाताने भेटतो आणि त्यांच्यामध्ये प्रेमनात्याचे आदान-प्रदान होते. पुढे काही काळानंतर ती संमोहनाचे दुकान थाटलेल्या गूढ तिबेटी महिलेला जाऊन भेटते आणि आपल्या व मेघदूतच्या संबंधांना संमोहनविद्येच्या आधारे अधिक व्यापक बनविण्याचा घाट घालते. खरे-खोटे, वास्तव-आभास यांच्या अधल्यामधल्या स्थितीत रेंगाळणारी ही कादंबरी वाचकाला कुतूहलसंपृक्त करत पुढे जाण्यास भाग पाडते. यातही लैंगिक आणि त्यानिमित्ताने एकूणच सुख नावाच्या मृगजळाबाबत मोठी चर्चा आहे.
धाडसी पूर्वसुरींच्या पंक्तीत बसूनही ही लेखिका काही अंशी वेगळी ठरते, ती तिच्यात पुरुषविरोधी सूर शून्यवत असल्यामुळे. या दोन्ही कादंबऱ्यांमधील नायिका पुरुषांना आपल्या स्वार्थासाठी खेळवू शकतात. मात्र त्यांच्याकडून त्यांना कोणत्याही प्रकारचा अपाय होत नाही. या दोन्ही नायिका जागतिकीकरणोत्तर काळात सर्वच बाबतीत सक्षम झालेल्या आहेत. स्वार्थ, अहंकार आणि लालसा यांबाबत पुरुषांशी बरोबरी करणारी विचारसरणी या नायिकांची आहे. त्यांच्यावर खरा अन्याय होतो तो पुरुषांपेक्षा स्वत:च्या स्वतंत्र विचारसरणीतून होणाऱ्या कृतींमुळे. त्या त्यांच्या दृष्टीने योग्य आणि समर्थनीय वाटत असल्या तरी प्रत्यक्षात त्या तशाच असतीलच असे काही नाही.
अजून भारतीय कादंबरीची ‘बोल्ड’पणाची व्याख्या मर्यादित आशय आणि मर्यादित विषयांमध्ये अडकलेली आहे. वास्तविक जागतिकीकरणानंतर पुरत्या ‘अमेरिकनाईझ्ड’ होत असलेल्या पिढीचे जगण्यात आणि लिहिण्यातही चाचपडणे सुरू आहे. भारतीय संस्कृतीच्या आणि जगरहाटीच्या तथाकथित महानतेचे ओझे आणि जगण्याचे सरळसोट वैश्विक तत्त्वज्ञान यांच्यातून मार्ग काढताना येणाऱ्या छिन्नमनस्क स्थितीत ती अडकलेली आहे. या कादंबऱ्या त्या स्थितीचे प्रातिनिधिक स्वरूप आहेत.
पँटी : संगीता बंदोपाध्याय
हॅमिश हॅमिल्टनपेंग्विन बुक्स
पाने : २६०, किंमत : ४९९ रुपये.