अमाप पैसा, कोणताही विधिनिषेध नाही आणि काहीही केले तरी पाठीशी घालणारे राज्य नेतृत्व. यामुळे कलानी यांचा वारू चौखूर उधळला, त्यास अडवण्याची धमक एकाही राजकीय पक्षात नव्हती. अशा नतद्रष्टांमुळे महाराष्ट्रातील समाजजीवनाचा पुरता विचका झाला असून राज्यातील अनेक प्रांतांत स्थानिक गुंडपुंडांची सरंजामशाही तयार झाली आहे.
विधायक चेहऱ्याच्या राजकारण्यांनी पुढे आणलेल्या विध्वंसक चेहऱ्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणास गेली काही दशके ग्रासून टाकलेले आहे. यातील काहींनी पांढरे डगले चढवून वाल्याचे वाल्मीकी झाल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या आभासी वाल्मीकींमधून काही शिक्षणसम्राट झाले, काही खाणसम्राट तर काही बांधकामसम्राट बनले. यातील काहींना त्यांच्या टोळी-उद्योग काळाची आठवण करून दिल्याचेही लोकप्रतिनिधी सभेने पाहिले. यांच्याही पलीकडे राजकारण्यांचा एक वर्ग असा होता की त्यांनी कधी सभ्यतेचा आवसुद्धा आणण्याचा प्रयत्न केला नाही. अशा नामांकितांतील अग्रणी म्हणजे सुरेश ऊर्फ पप्पू कलानी. राजकीय प्रतिस्पध्र्याची हत्या केल्याप्रकरणी आज पप्पू कलानी यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. महाराष्ट्राचे बिहारीकरण व्हावे यासाठी ज्यांनी जीव तोडून प्रयत्न केले अशा बिनीच्या शिलेदारांत या पप्पूची गणना पहिल्या पाचात व्हावी. मुंबईजवळील उल्हासनगर हे यांचे कार्यक्षेत्र. परंतु त्यांच्या कर्तृत्वास भौगोलिक सीमांचे बंध कधीही अडवू शकले नाहीत. सत्तरीचे दशक हे अशा उपटसुभांसाठी महाराष्ट्रात अनेकार्थानी महत्त्वाचे ठरले. शिवसेनेसारखा नवा पक्ष जन्माला आलेला होता आणि गावगल्लीतील उनाडांच्या राजकीय आश्रयाची सोय त्यामुळे झाली होती. मुंबईसारख्या शहरांत त्याचे पडसाद उमटत होते. कामगार चळवळीस गुंडगिरी वा खंडणीखोरीचेच स्वरूप आले होते. राजकारणाचा फारच संकुचित अर्थ या काळात रूढ व्हायला लागला. आपापल्या जातीजमातींच्या मंडळींना एकत्र करून पुंडगिरी करणे असे घडू लागले. हे असे का करायचे? तर या झुंडशाहीच्या आधारे आपापल्या अनैतिक उद्योगांना झाकता यावे म्हणून. वसई परिसरातील ठाकूर, उल्हासनगर परिसरातील कलानी, भिवंडीचा जयवंत सूर्यराव ही अशा मंडळींची ढळढळीत उदाहरणे.
यातील उल्हासनगर हा तर स्थलांतरितांचा समूह. भारताची फाळणी झाल्यानंतर सिंधी बांधवांना मोठय़ा प्रमाणावर त्या देशातून निर्वासित व्हावे लागले. या स्थलांतरितांसाठी एखादी वसाहत असावी म्हणून उल्हासनगर या छावणीची निर्मिती झाली. सिंधी समाज हा मुळातच उद्यमशील. परंतु त्यांची उद्यमशीलता पंजाबींप्रमाणे वाहन उद्योगातील सुटे भाग आदींच्या निर्मितीत रस घेणारी नाही. सिंधी मंडळी व्यापारउदिमात मोठय़ा प्रमाणावर आली. स्थलांतरितांचे म्हणून एक दु:ख असते. आपल्या मुळापासून तुटून ज्यांना यावे लागते, त्यांना शून्यातून सुरुवात करावी लागते. अशा वेळी यातील काहींना आपले स्थलांतरामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रगतीची घाई होत असेल तर ते एका अर्थाने नैसर्गिकच. परंतु याचाच परिणाम म्हणून अशांकडून आडमार्गाचा अवलंब होण्याची शक्यता असते. उल्हासनगरात तेच घडले. त्याचमुळे महाराष्ट्रातील समाजजीवनात जे जे अभद्र, अशुभ ते ते सर्व या शहराशी निगडित आहे. किंबहुना उल्हासनगर हे अशा गैर उद्योगांसाठी प्रतिशब्द बनला असून बेकायदा बांधकामांच्या संदर्भात तर उल्हासनगराच्या नावाचे प्रारूपच तयार झाले आहे. पप्पू कलानी हे या शहरातील प्रगतीची घाई असणाऱ्यांतील एक. त्याच्या उद्योगाची सुरुवात मद्यनिर्मितीपासून झाली. त्यातही काही गैर नाही. समाजाची तीही एक गरज असू शकते आणि ती भागवण्यात काही वावगे वाटावयाचे कारण नाही. परंतु कलानी यांनी यातही सरळ मार्गाने व्यवसाय केला नाही. नियमांना बगल दिली की छोटय़ा काळात मोठी संपत्ती जमा होऊ शकते. कलानी यांनी या मार्गाने कमावलेली संपत्ती आलिशान हॉटेल आणि तत्सबंधी उद्योगांत वापरली. स्थानिक राजकारण्यांना हाताशी धरावे, त्यांच्या मदिरा आणि मदिराक्षींची सोय या हॉटेलांत करावी आणि त्याच्या जोरावर आपली राजकीय दहशत तयार करावी ही त्यांची कार्यपद्धती. त्यांच्या या जाळय़ात महाराष्ट्राचे अनेक स्थानिक नेणते आणि जाणते नेते अडकले. परिणामी कलानी यांचा प्रभाव वाढत गेला. अशा मार्गानी प्रगती करणाऱ्या बदमाशांचा शेवटचा मुक्काम नेहमीच राजकारण असतो. तेव्हा कलानी यांनी राजकारणात जाणे साहजिकच होते.
अमाप पैसा, कोणताही विधिनिषेध नाही आणि काहीही केले तरी पाठीशी घालणारे राज्य नेतृत्व. यामुळे कलानी यांचा वारू चौखूर उधळला. त्यास वेसण घालण्याची सोडाच, पण अडवण्याची धमकही त्या वेळी एकाही राजकीय पक्षात नव्हती हे सत्य आहे. राजकीय पक्ष आणि राजकारण चालवण्यासाठी जे जे लागते ते सर्व पप्पूच्या पदरी अमाप असल्याने त्यांना रोखण्याची इच्छाही कोणी केली नाही. स्थनिक पातळीवर ज्यांनी ज्यांनी असा प्रयत्न केला, त्यांना थेट पप्पूने वा त्याने पाळलेल्यांनी संपवले. यातूनच महाराष्ट्राला लाज वाटावी अशी घटना घडली. ९० सालच्या निवडणुकीत पप्पूच्या विरोधात लढणाऱ्या भाजप उमेदवाराने पप्पू आणि कंपूस बोगस मतदान करताना पकडले. त्यामुळे संतापलेल्या पप्पू आणि कंपनीने भाजप उमेदवाराची भर दिवसा त्याच्या कार्यालयात जाऊन हत्या केली. एवढेच नव्हे तर त्याच्या भावालाही नंतर या मंडळींनी पोलीस संरक्षण असतानाही ठार केले. पप्पूचा दरारा एवढा की इतके होऊनही तो निवडून आला. त्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी गेल्या आठवडय़ात पूर्ण होऊन पप्पू आणि कंपनी या हत्येत दोषी आढळली. न्यायाधीशांनी मंगळवारी, दोषींना शिक्षा ठोठावली. मधल्या काळात परमेश्वराचा धावा करीत होतो, असे पप्पू म्हणाल्याचे प्रसिद्ध झाले आहे. आताशा परमेश्वरालाही अशा मंडळींनी हाताशी धरण्याचे प्रकार घडू लागल्यामुळे पप्पू आणि कंपूस आपल्याला शिक्षा होणार नाही, अशी आशा होती. ती फोल ठरली आणि आपल्या न्यायव्यवस्थेची- आणि तसेच परमेश्वराचीही.. लाज राखली गेली. जवळपास २३ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आणि कलानी यास जन्मठेप ठोठावण्यात आली. म्हणजे जेवढा काळ पप्पूने तुरुंगात डांबलेल्या अवस्थेत काढावयास हवा, त्याहीपेक्षा अधिक काळानंतर तो दोषी आढळला. आता तुरुंगात जावयाची वेळ आल्यास त्याच्या छातीत वगैरे दुखून उर्वरित काळ रुग्णालयात घालवण्याची सोय त्यास असेल यात शंका नाही. तुरुंगाच्या ऐवजी रुग्णालय कसे गाठावयाचे या संदर्भात पप्पू अधिक मार्गदर्शनासाठी जळगावच्या सुरेश जैन यांचा सल्ला घेऊ शकेल. काही काळ या दोन्ही मान्यवरांनी एकाच पक्षात राजकारणाचे धडे गिरवलेले आहेत. त्यामुळे उल्हासनगरातल्या सुरेशच्या मदतीसाठी जळगावातील सुरेश येणारच नाही असे नाही. दोघांच्या राजकारणातही बरेच साम्य असल्यामुळे हे साहचर्य पुढेही दिसू शकेल.
वस्तुत: या अशा नतद्रष्टांमुळे महाराष्ट्रातील समाजजीवनाचा पुरता विचका झाला असून राज्यातील अनेक प्रांतांत स्थानिक गुंडपुंडांची सरंजामशाही तयार झाली आहे. केवळ निवडून येण्याची क्षमता आणि त्या क्षमतेस आधार देईल अशी आर्थिक ताकद हेच राजकारणासाठी आवश्यक घटक बनल्यामुळे राज्यातील अनेक प्रदेश या गुंडपुंडांना आंदण दिले गेले आहेत. सिंधुदुर्गापासून ते चंद्रपुरापर्यंत, व्हाया नवी मुंबई, जळगाव, नाशिक, पुणे.. अशा अनेक ठिकाणी आज या व अशा पप्पूंचेच राज्य आहे. राज्यातील या समग्रपप्पूपर्वाची सामुदायिक समाप्ती करणे हे महाराष्ट्रासमोरील आव्हान आहे. राज्याच्या प्रगतीची दिशा त्यावर ठरेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा