इसवीसनापूर्वी ‘विरोधाभास’ मांडून त्यातून अर्थ काढू पाहणारा इलिया येथील झीनो ते विसाव्या शतकावर बराच काळ प्रभाव असलेला कार्ल मार्क्‍स! या दोघांना जोडणारी वाट आहे, ती ‘द्वंद्वविकासा’च्या वाटचालीची प्राचीन ग्रीक संस्कृतीत झीनो नावाचे दोन तत्त्ववेत्ते होऊन गेले. पहिला झीनो म्हणजे ईलिआचा रहिवासी झीनो (इ.स.पू. ४९०-१) आणि दुसरा झीनो सीशियम प्रांतातील (सायप्रस) रहिवासी झीनो (इ. स. पू. ३३६-२६५).  हा दुसरा ‘स्टोइकवाद’ या विचारपंथाचा प्रवर्तक व संस्थापक होता तर पहिला ‘ईलिआचा झीनो’ या नावाने परिचित आहे.
सॉक्रेटिसची संवादपद्धती ज्या प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्त्याच्या विचारपद्धतीवर आधारलेली होती, तो ‘ईलिआचा झीनो’ हा होय. आज अतिपरिचित आणि वादग्रस्त असणाऱ्या ‘द्वंद्वविकास’ या संकल्पनेचा मूळ हा जनक म्हणता येईल. लोककथांमध्ये असलेली ससा आणि कासवाच्या शर्यतीची कथा मूळ याची असून ती त्याच्या तात्त्विक विचाराचे उदाहरण म्हणून आलेली आहे. त्याचप्रमाणे गणित व भौतिकशास्त्र या ज्ञानशाखांमध्ये वादग्रस्त असलेली ‘अनंत’ ही संकल्पना व त्यातील विरोध यासाठीही झीनो ओळखला जातो.  
‘द्वंद्वविकास’ या विचारपद्धतीबरोबरच त्याने ‘विरोधाभास’ ही संकल्पना मांडली. वस्तुत: या दोनांत फारसा फरक करता येत नाही. झीनो हा पाम्रेनिडिझ या तत्कालीन ज्येष्ठ तत्त्वज्ञाचा निकटचा मित्र व त्याचा अनुयायी होता. झीनोचा एकच ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यात त्याने त्याचे प्रसिद्ध ४० विरोधाभास किंवा युक्तिवाद मांडले होते. अथेन्समध्ये या पुस्तकाचे प्रथम वाचन त्याने केले तेव्हा सॉक्रेटिसशी त्याचा संवाद झाला. तेव्हापासून सॉक्रेटिसवर त्याचा प्रभाव पडला असावा, असे म्हणण्यात येते. संकल्पनांचे विश्लेषण व खंडन करण्याच्या तत्त्वज्ञानातील ‘द्वंद्वविकास’ या विचार रीतीचा नमुना त्याने घालून दिला.
झीनोचे मुख्य विरोधाभास असे-(१) द्विभाजन : गतिमान वस्तू काहीही अंतर जाण्यापूर्वी ती अध्रे अंतर गेली पाहिजे. हे अध्रे अंतर जाण्यापूर्वी त्याचे अध्रे अंतर ती गेली पाहिजे व असे अनंत काळपर्यंत होत असल्यामुळे गती अशक्य आहे, असे सिद्ध होते. (२) ससा व कासव यांच्या शर्यतीत, कासव आरंभी काही अंतर पुढे असल्यास ससा कासवास अनंत काळपर्यंत गाठू शकणार नाही. कारण कासव ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी ससा येईल तेव्हा कासव ते स्थान सोडून पुढे गेलेले असेल व याप्रमाणे कासव नेहमी सशाच्या पुढेच राहील. म्हणजेच ससा कासवास गाठू शकणार नाही. (३) सोडलेला गतिमान बाण हा प्रत्येक क्षणी पुढे सरकत असतो, परंतु अवकाशात प्रत्येक क्षणी तो कुठेतरी स्थिर असतो. तर गंमत म्हणजे गतिमान म्हणजे कुठल्याही क्षणी कुठेही एका ठिकाणी नसणे, असे मानल्यास असा बाण हलू शकत नाही असे सिद्ध होते.
‘अ‍ॅचिलीस इन वंडरलॅँड’चा लेखक लुईस कॅरॉल याने यातील अनेक विरोधाभास त्याच्या प्रस्तुत कादंबरीत आणि इतरत्रही वापरले. कासव व अ‍ॅचिलीसच्या कथेवर त्याने ‘कासव अ‍ॅचिलीसला काय म्हणाले’ (What the Tortoise Said to Achilles) हा प्रदीर्घ लेख ‘माइंड’ या जगप्रसिद्ध नियतकालिकात १८९५ साली लिहिला. २००८ साली जपानी दिग्दर्शक ताकेशी कितानो यांनी (Achilles and the Tortoise) या नावाचा चित्रपट तयार केला. अर्थात तो त्यांच्या आत्मकथानक या स्वरूपाचा आहे.  
झीनोचा अनंतासंबंधीचा व एकतेचा युक्तिवाद  किंवा विरोधाभास (पॅराडॉक्स) थोडक्यात असा मांडता येईल : जर अनेक असतील, तर त्यांतील प्रत्येक एक असला पाहिजे. जो एक आहे त्याला आकारमान असणार नाही; कारण त्याला आकारमान असेल तर त्याचे भाग असतील. म्हणजे तो एक नसून अनेक आहे असे होईल. तेव्हा कोणत्याच एकाला आकारमान असणार नाही; पण मग असे एक एकत्रित केल्याने आकारमान असलेली वस्तूही निष्पन्न होणार नाही. पण आकारमान असलेल्या वस्तू आहेत. तेव्हा ज्या एकांच्या त्या बनलेल्या असतील त्यांना आकारमान असणार. म्हणजे असा एक घेतला, तर (त्याला आकारमान असल्यामुळे) त्याचे भाग असणार आणि त्यांना आकारमान असल्यामुळे त्यांचे भाग असणार व या भागांना आकारमान असणार. म्हणजे या एकाचे अनंत भाग असणार व या प्रत्येक भागाला आकारमान असल्यामुळे या एकाचे आकारमान अनंत असणार. तेव्हा अनेक असले तर त्यांपकी प्रत्येक एक असा असणार, की त्याला आकारमान असणार नाही आणि त्याचे आकारमान अनंत असणार, ही दोन्ही विधाने त्याच्याविषयी सत्य ठरतील. झीनोने मांडलेल्या या विरोधाभासांवर अ‍ॅरिस्टॉलपासून अनेक तत्त्ववेत्त्यांनी खल केला. अखेर १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व्हायरस्ट्रॉस , डेडिन्किट आणि जॉर्ज कँटर या तिघा जर्मन गणितज्ञांनी या प्रश्नांची निर्णायक उकल करून दाखवली आणि गणितातील ‘अनंत’ या संकल्पनेला आधुनिक स्वरूप दिले.
‘द्वंद्वविकास’ (डायलेक्टिक्स) ही संज्ञा अनेक अर्थाने वापरली जाते. तर्कावर आधारलेला वाद हा एक ढोबळ अर्थ आहे. पण झीनोने त्यास विशेष अर्थ दिला. पूर्वपक्षाचे मत स्वीकारण्यायोग्य मानले तर तार्किकदृष्टय़ा अनवस्था स्वीकारावी लागते, असे त्याने दाखवून दिले. नंतर सोफिस्ट तत्त्ववेत्त्यांनी द्वंद्वविकासाला वाग्युद्धाचे शस्त्र आणि शास्त्र बनविले. परिणामी ‘द्वंद्वविकास’ म्हणजे नसते तर्कट असा (वाईट) अर्थ झाला. साहजिकच लोक या रीतीची आणि एकूणच चर्चा करण्यास फारसे उत्सुक राहिले नाही.
सॉक्रेटिसने द्वंद्वविकासाला प्रतिष्ठा दिली. एका अर्थाने ती खरी तर प्लेटोने दिली आणि अ‍ॅरिस्टॉटलने तिचे डायलेक्टिक्स असे नामकरण करून ती मुख्य चर्चाविश्वात आणली. सत्याचा शोध घेण्यासाठी मानवी विवेकशक्तीला ज्या तर्कपद्धतीचा विकास करावा लागतो, तो ‘द्वंद्वविकास’ असा अर्थ त्यांनी या संज्ञेला मिळवून दिला. मराठी विश्वकोशात ‘डायलेक्टिक्स’ साठी ‘द्वंद्ववाद’ आणि ‘डायलेक्टिक’ या शब्दासाठी ‘द्वंद्वीय’ हा शब्द वापरण्यात आला आहे.   
प्लेटो, कांट या श्रेष्ठ तत्त्ववेत्त्यांनी द्वंद्वविकास रीती स्वीकारली ती काहीशी नकारात्मक होती. पण तिला विधायक स्वरूप योहान गोटलीप फिक्टे (१७६२-१८१४) या जर्मन तत्त्वज्ञाने दिले.  एकांगी असलेले सत्य आणि तितकेच एकांगी असलेले त्याविरोधी सत्य यांचे निरसन करून दोघांना सुसंगतपणे स्वत:त सामावून घेणारा समन्वय असे त्रिपदी स्वरूप फिक्टेने मांडले. विधान, प्रतियोगी विधान आणि संश्लेषक विधान अशी विधानत्रयी म्हणजे द्वंद्वविकास असे तो म्हणतो. जॉर्ज व्हिल्हेल्म फ्रेडरिक हेगेल (१९७०-१८३१) याने ही त्रयी स्वीकारली पण काही मूलभूत फरक केले. त्याच्या मते विधानत्रयी किंवा सत् हे स्वयंगतीशील असते. विश्वात आणि मानवी मनोव्यापारात एक स्वयमेव गति, परिवर्तनशीलता आहे. त्याचा आत्मविकास हाच द्वंद्वविकास  असतो. सत्चे  स्वरूप असे द्वंद्वविकासी आहे. हा हेगेलचा सिद्धान्त कार्ल मार्क्‍स (१८१८-८३) ने स्वीकारला आणि त्याची जडवादाशी सांगड घातली. म्हणून मार्क्‍सवादी तत्त्वज्ञानाला द्वंद्वविकासी जडवाद म्हणतात.
मार्क्‍सला अभिप्रेत असलेली समाजव्यवस्था एखाद्या देशात येणे म्हणजे साम्यवाद  (कम्युनिझम) आणि सगळय़ा जगात ती येणे म्हणजे समाजवाद (सोशालिझम). साम्यवादाची संकल्पना पाश्चात्त्य परंपरेत आधी प्लेटोने मांडली होती (ती उपनिषदांतही आढळते- ‘सर्वेऽपि सुखिन: सन्तु, सर्वे सन्तु निरामय’ ) . इंग्रजीत सोशालिझम या संज्ञेचा वापर प्रथम सन १८२७ मध्ये रॉबर्ट ओवेन या समाजशास्त्रज्ञाने केला. सोशालिझम म्हणजे सहकार हा मूळ अर्थ असून एका तत्कालीन फ्रेंच वृत्तपत्राने सोशालिझमच्या जवळपास ६०० व्याख्या किंवा दृष्टिकोन दिले होते. त्यामुळे सी. ई. एम. जोड या विचारवंताने ‘समाजवाद म्हणजे अनेकांनी वापरल्यामुळे जिचा आकार नष्ट झाला आहे अशी एक टोपी आहे’ अशी टीका केली.
 ६ लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे सहयोगी प्राध्यापक आणितत्त्वज्ञान विभाग प्रमुख आहेत.

sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
Dhirendrakrishna Shastri makes unscientific claims promote superstition under guise of spirituality
धीरेंद्रकृष्ण यांच्या कार्यक्रमास अंनिसचा विरोध, अंधश्रध्देस खतपाणी घालणाऱ्यांना परवानगी दिल्याबद्दल नाराजी
artificial intelligence to develop ability to create substances with specific qualities
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतून हव्या त्या गुणधर्मांचा पदार्थ
loksatta analysis blue zone concept fact or myth
या भागांतली माणसे असतात दीर्घायुषी… काय आहेत ‘ब्लू झोन’? ही संकल्पना वास्तव, की मिथक?
Loksatta kutuhal Artificial Intelligence ISRO and DRDO
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता : इस्राो आणि डीआरडीओ