फाळणी हा खरंच केवळ ‘इतिहास’ आहे का? मग ती आजही मनामनांत का राहाते आहे? या उपखंडाची भूमी सलग, संस्कृतीही संमिश्रच, त्यामुळे इतिहासालाही अनपेक्षित असलेल्या घटनाक्रमाच्या जखमा इतके दिवस कायम कशा राहतात? फाळणी आणि जातीयवाद यांचे समीकरण इतके पक्के कसे काय राहते? या प्रश्नांची उत्तरे देऊ पाहणारी दोन पुस्तके अलीकडेच आली, त्यांची ही ओझरती ओळख..
भारताचा १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन, तर पाकिस्तानचा १४ ऑगस्ट स्थापनादिन. व्यावहारिक अर्थाने हे दोन्ही देशांचे ‘राष्ट्रीय सण’ आहेत..  परंतु निराळ्या अर्थाने भारतीय उपखंडाच्या फाळणीचे दुर्दैवी वर्धापनदिन ! इतिहासातील रक्तरंजित आठवणी आता चित्रपट, संग्रहालये, आत्मकथा आणि चित्रांमध्ये जरी बंद झाले असले तरी ती जखम आजही जागी आहे. जेव्हा केव्हा हिंदू-मुस्लिम किंवा शीख-मुस्लिम किंवा बंगाली मुस्लिम- बांगलादेशी मुस्लिम किंवा भारतीय पंजाबी-पाकिस्तानी पंजाबी यांच्यातील नात्यांची चर्चा होते, तेव्हा फाळणी हा त्यातील अपरिहार्य धागा असतो. िपजर, गदर, १९४७-अर्थ यासारखे अनेक चित्रपट अलीकडच्या काळात येऊन गेले. या चित्रपटांना प्रतिसादही मिळाल्यामुळे, फाळणी हा विस्मृतीत गेलेला इतिहास नसून आपली वर्तमानकाळातही भळभळणारी जखम आहे, याची जाणीव होते. असे कशामुळे होत असावे? आणि असे सारखे होणे हे आपल्या (भारताच्या, आणि कदाचित पाकिस्तानच्याही) राष्ट्रीय आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी योग्य आहे का ? फाळणीच्या आठवणी ताज्या करणे आणि त्यांना आजही प्रतिसाद मिळणे यामुळे आपण जोडलो जातो की पुन्हा पुन्हा तोडलो जातो, यावर आत्मचिंतन नाही तर किमान विचार करायला हवा.
याची उत्तरे शोधण्यासाठी लिखित इतिहासाचे पापुद्रे उलगडून काढून त्याही पलीकडे- मौखिक इतिहासाकडे जाऊन, मानवी जीवांची झालेली तडफड जाणून घेणारे नवनवीन लिखाण संशोधन आणि आत्मचरित्रे यांच्या माध्यमातून आता येऊ लागले आहे. अलीकडेच ज्मुबान प्रकाशनामार्फत प्रकाशित झालेल्या ‘पार्टिशन : द लाँग श्ॉडो’ या पुस्तकाचा यासंदर्भात जरूर उल्लेख करावा लागेल.
फाळणीमुळे केवळ देश आणि प्रदेश हेच विभागले जात नाहीत तर माणसे, कुटुंबे, संस्कृती, त्यांचे सामूहिक कलाप्रकार आणि समूहजीवनाच्या आविष्काराची माध्यमे विभागली जातात. या पुस्तकाने १९४७ आणि १९७१ या दोन्ही फाळण्यांमुळे झालेल्या मानवी जीवनाची वाताहत आपल्या समोर एका वेगळ्या इतिहास संशोधनाच्या दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकाच्या संपादक आहेत जुबान प्रकाशनाच्या प्रमुख उर्वशी बुटालिया. या स्वत स्त्रीवादी लेखिकाही आहेत आणि दुभंगलेल्या मनांनी एकत्र यायला हवे, ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. हे पुस्तक भावनिक मुद्दय़ांना स्पर्श करणारे असले, तरी त्याचे स्वरूप अभ्यासपूर्ण आहे. निवडले गेलेले लेख इतिहासकार तसेच सामाजिक शास्त्रांत वेगवेगळ्या अंगाने प्रयोग करून फाळणीकडे  पाहणाऱ्या लेखकांचे आहेत. लेखकांमध्ये रीटा कोठारी, कविता पंजाबी, ज्योतिर्मय शर्मा या मान्यवर लेखकांचा समावेश आहे.
सामन्यत: आपला असा गरसमज होतो आणि बऱ्याच अंशी आपल्याकडच्या पुस्तकानी आणि चित्रपटांनी तो दृढ करून दिला आहे की फाळणीची झळ फक्त पंजाबी आणि पूर्व भारतीय (मुख्यत बंगाली) भाषक समाजांनाच सोसावी लागली. हे पुस्तक आपला हा खोलवर रुतलेला गरसमज उधळून लावते. लडाख, ईशान्य भारत, कच्छ (गुजरात) तसेच इतरही अनेक प्रदेशांतील उदाहरणासह या पुस्तकातील लेख दाखवून देतात की, फाळणीचा प्रभाव भारतीय उपखंडातील सर्वावर पडला आहे आणि त्याला जाणून घेण्यात आपण कमी पडत आहोत, हे आपले अपयश आहे. गुजरातमध्ये १९६९, १९८६, २००२ मध्ये झालेल्या मोठय़ा दंगली, दिल्ली मध्ये १९८४ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरात इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेले शिखांचे शिरकाण, वेळोवेळी भारतात- मुंबई, मालेगाव, हैदराबाद, लखनऊ, मेरठ-मुजफ्फरनगर, यांसारख्या अनेक ठिकाणी-  झालेल्या दंगली या सर्वाच्या मागे कुठे न कुठे फाळणीला आपण पचवू शकलो नाही, फाळणीला आपण समजू शकलो नाही आणि फाळणीपासून आपण काही शिकू शकलो नाही याचेच दर्शन घडते.
त्यापुढे जाऊन हे पुस्तक वाचकाला, फाळणीने आपल्यापर्यंत कोणती जखम पोहोचवली आहे? आणि तिचा ओरखडा आपल्यावर कितपत आहे? हेही जाणून घेण्यासाठी बळ देतेते. आपण बऱ्याच वेळा एक कुटुंब म्हणून व्यवस्थित एकमेकांसमोर व्यक्त होत नाही. आपण एकमेकांपासून आपला इतिहास लपवत असतो, कदाचित आपल्या आई-वडिलांच्या किंवा आपल्या आजी आजोबांच्या जीवनात बऱ्याच महत्त्वाच्या घटना घडून गेल्या असतील, ज्या देश पातळीवरील महत्त्वाच्या घटनांमुळे घडल्या असतील – त्यांना आपण जाणून घ्यायचा का प्रयत्न करत नाही ? देशाचा इतिहास हा माणसांच्या आयुष्याने आणि त्यांच्या आठवणीने भरलेला असतो. इतिहासामध्ये फक्त राज्यकर्त्यांचा उदो-उदो करायचा नसतो तर ज्यांच्यावर राज्य केले गेले त्यांच्या आयुष्यातील टक्के-टोणपे सुद्धा शोधून, मोजून मापून आणि त्यांना त्या काळातील मोठय़ा समस्यांना कसे तोंड द्यावे लागले, त्याना तत्कालीन संघर्षांतून वाट काढण्यासाठी कोणत्या कोणत्या मार्गाचा अवलंब करावा लागला आणि त्यासाठी त्यांनी कोणते वेगळे मार्ग अवलंबले या सर्वाचा शोध-अभ्यास आपला आपणच केला पाहिजे. त्याची पहिली सुरुवात आपण आपल्या घरातील लोकांचा इतिहास जो थेट आपल्याशी संबधित आहे, त्याचा शोध-वेध घेऊन करूया, मग आपल्याला त्याचा संबंध कसा प्रांतीय, राज्य, देश आणि जग पातळीवर होणाऱ्या घटनांकडे एका वेगळ्या नजरे होण्यास होईल.
अडचणीच्या काळात आपण कसे तग धरून राहतो, कोणते अंगभूत गुण आणि कौशल्ये आपल्याला जगण्यामध्ये आणि पुढे प्रगती करण्यामध्ये मदत करतात यासाठी सुद्धा फाळणीचा अभ्यास व्हायला हवा. जुन्या िहदी चित्रपटातील नायक नायिका आठवून पाहा. दिलीप कुमार, सुनील दत्त, देव आनंद, गुलझार, पृथ्वीराज कपूर हे सर्व पाकिस्तानमध्ये (पूर्वाश्रमीचा पंजाब-सिंध) जन्मले होते. या प्रकारचे अनेक लोक, जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये आज एका उंचीवर पोहोचलेले आहेत, त्यांच्या संघर्षांचा आपल्या येणाऱ्या पिढय़ांना का उपयोग होऊ नये? त्यासाठी त्यांच्या संकटकालीन अनुभवांचा फाळणी आणि जीवनाची लढाई या अंगाने आपणही संधी मिळेल तेव्हा शोध घेत राहावे, अशी प्रेरणा पुस्तकातील काही प्रकरणे देतात.
आपल्या कुटुंबातील, आपल्या मित्र मंडळीतील आणि आपल्या समाजातील व्यापक अर्थाने जाणून-बुजून किंवा अजाणतेपणाने धारण केलेल्या शांततेचा आणि मौनाचा वेध आणि बोध घेण्याची सुरुवात आपण करायला हवी. कोण, कधी आणि कोणत्या अर्थाने का गप्प आहे याचा शोध घेतला पाहिजे. त्यापाठीमागे कदाचित काही तरी दुखद किवा दुर्दैवी घटना असू शकते. समाजमानसशास्त्रातील हा ‘ट्रॉमा’ सिद्धान्त. मने दुभंगणारी, तोडणारी ती घटना निखाऱ्यासारखी मनात धुमसत राहाते, तीच पुढे जेव्हा सामुहिक अज्ञान, विखारी द्वेष आणि िहसक उन्मादाच्या आगीमध्ये परावर्तित होते, तेव्हा सामाजिक रोष आणि विध्वंस जणू ‘अटळ’ ठरतो. जातीय-धार्मिक दंगली आणि मारकाट होतात त्या यामुळेच, असे हे पुस्तक सूचित करते. फाळणीची ६९ वर्षांपूर्वीची प्रक्रिया ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुरू राहू शकते, याचे भान आपण कधीही विसरता कामा नये. आपसातील गरसमज वेळोवेळी त्वरित दूर न केल्यामुळे काय अनर्थ घडू शकतो हे त्या अर्थाने आपल्याला चांगलेच माहिती आहे.
याच प्रकारे आणखी एका वेगळ्या प्रकारे फाळणीचा वेध घेणारे आणखी पुस्तक आले आहे. ‘मिडनाइट्स फ्यूरीज- द डेडली लीगसी ऑफ इंडियाज पार्टिशन’ हे निशिद हजारी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव आहे. हे पुस्तकही फाळणीच्या काळातील (१९४६ पासूनच) दंगलींपासूनचा आढावा घेते, पण साहित्य, कौटुंबिक गोष्टी, कलाप्रकार, संगीत आणि आपल्या सामान्य लोकांच्या जीवनातील संघर्षांचा धांडोळाही घेते. याप्रकारच्या पुस्तकांमुळे आपल्या फाळणीच्या मर्यादित समजुतीला चांगल्या अर्थाने धक्का बसतो आणि आपण या आपल्या सामूहिक इतिहासाला आणखी गंभीरपणे आणि त्याचबरोबर आणखी संवेदनशीलतेने सामोरे जायला शिकतो. एका अर्थाने ही दोन्ही पुस्तके ‘मानवी इतिहासा’चे केवळ कथन करून न थांबता, त्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी प्रत्येकामध्ये विकसित होऊ शकते, असा निर्देश करतात.
फाळणीच्या  झळा भोगाव्या लागलेल्या लोकांच्या मुलाखती आणि त्यांचे तत्कालीन फाळणीच्या होरपळी मध्ये हरवलेले आयुष्य, त्याच्या आठवणी, त्याचा निचरा (कॅथार्सिस) होण्यासाठी त्यांनी निवडलेले मार्ग, तसेच अविभाजित लोकांचे एकत्रित सण-समारंभ, विभाजन झाल्यानंतर सुद्धा लोकांना एकमेकांच्या संस्कृतीबद्दल वाटणारा केवळ आपलेपणा (पाकिस्तानात लाहोरमध्ये बंदी न जुमानता साजरा होणारा ‘बसंत’ उत्सव).. त्या संस्कृतीमध्ये एकमेकांना सामावून घेण्याची सहभागी करून घेण्याची एक वेडी धडपड हे सर्व या दोन्ही पुस्तकातून येते. इतिहास आणि मानवी आठवणी यांचे संशोधन करण्याच्या अंगाने जाणारे लिखाण हे या दोन्ही पुस्तकांचे आणखी एक वैशिष्टय़ आहे.
फाळणी भूगोलाची झाली पण त्याने प्रश्न मिटला नाही. फाळणी सत्तेची झाली पण आपल्या संस्कृतची पाळेमुळे – जी आपल्या एकत्रित संस्कृती आणि जीवन-पद्धती मध्ये रुतलेली आहेत, त्यांची फाळणी कधीच होऊ शकणार नाही. तरीही फाळणीच्या काळातील अनपेक्षित घटनांमुळे आपल्या जीवनात, सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोनात झालेल्या बदलांमुळे, आपण गेल्या काही वर्षांमध्ये एका नव्या फाळणीला जन्म देत आहोत. प्रश्न केवळ िहदू आणि मुस्लिम वेगवेगळय़ा वसाहती करून राहतात आणि आपापल्या वस्तीत दुसऱ्या जमातीला घर देत नाहीत एवढय़ापुरता मर्यादित नाही. एकमेकांबद्दलच्या संशयाचे धुके दाट होत जावे याची कायमस्वरूपी व्यवस्था आपण केली आहे, हा खरा व्यापक प्रश्न. प्रश्न केवळ हिंदूंचा दिवाळी/दसरा आणि मुस्लिमांचे मोहरम/रमजान एवढाच नाही. आपले अनेक सण समारंभ एक आहेत पण आपण कुणाला आपले मानतो, कुणाला परके मानतो हे पक्के संस्कार आपल्याला घराघरात दिलेले असतात. आपण एक देश, एक राज्यघटना मानतो -पण काही ठराविक गटांला कशी दुय्यम नागरीकासारखी वागणूक द्यायची, हे सामाजिक स्तरावर बऱ्याच वेळा आपण ठरवून ठेवलेले असते. आपण राष्ट्रीय एकात्मकता आणि सामाजिक समरसता यावर अनेक चर्चा करतो पण जेव्हा पूर्णपणे दुसऱ्या संस्कृतीला समजावून घायची वेळ येते, तेव्हा आपली अस्मिता आपण प्रखर करतो आणि एका प्रकारे नकारात्मक दूरदृष्टीने ‘फाळणीची आखणी’ करतो.
असो. फाळणीच्या संदर्भात मानवी कथा, जीवन संघर्ष आणि त्याचा मानवी प्रतिकार यावर अधिकाधिक लेखन व्हावे, त्याचा वेगवेगळ्या कला माध्यमांनी धांडोळा घ्यावा आणि त्यापासून आपण काही तरी एक शिकवण घ्यावी असा या दोन्ही पुस्तकांचा प्रयत्न आहे, तो वाया जाऊ नये इतकेच.
creativityindian@gmail.com

Avimukteshwaranand Saraswati Criticized mohan bhagwat
Avimukteshwaranand Saraswati : मोहन भागवतांच्या वक्तव्यावर भडकले शंकराचार्य, “सत्ता हवी होती तेव्हा मंदिराचा जप सुरु होता, आता…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mumbai Boat Accident
Elephanta Caves: घारापुरी (एलिफंटा) लेणींना एवढे महत्त्व का? हजारो पर्यटक त्यांना रोज भेट का देतात?
History of Geography How Big is the Universe
भूगोलाचा इतिहास: विश्वाचा आकार केवढा?
Seven historical reasons for the decline of Maharashtra
महाराष्ट्राच्या ऱ्हासाची सात ऐतिहासिक कारणे
Dattatreya Jayanti 2024
Datta Jayanti 2024: एकमुखी ते त्रिमुखी दत्तमूर्ती; सिंधू संस्कृती, वेद ते गुरुचरित्र त्रिमूर्तीचा विकास कसा झाला?
Indian observatories Jantar Mantar
भूगोलाचा इतिहास : वेध वेधशाळांचा; जंतर मंतर!
best investigation police officer honored
सर्वोत्कृष्ट तपास करणार्‍या पोलिसांचा सन्मान; शस्त्रसाठी जप्ती, मोबाईल नेटवर्कचा तपास सर्वोत्कृष्ट
Story img Loader