ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये बंदिस्त न ठेवता ‘मऱ्हाटी’त आणण्याचे कार्य संतांनी केले. या ज्ञानासोबत भाषेच्या सक्षमीकरणाचा वसा संतांनी आपल्याला दिला, तो मात्र आपण टाकून दिला!
मराठी भाषेवर होणाऱ्या इंग्रजींच्या आक्रमणाबाबत (?) गळे काढण्याची आताशा फॅशनच झालेली आहे. तसे पाहिले तर, अस्तित्वासाठी आणि प्रतिष्ठेसाठी मराठीचा झगडा पार तिच्या बाल्यावस्थेपासून सुरूच आहे. तेव्हा तो संघर्ष होता संस्कृतशी. आज तोच संघर्ष झडतो आहे इंग्रजीशी एवढाच काय तो फरक. ज्या भाषेच्या पाठीशी सत्तेचे बळ ती भाषा व्यवहारात बलवान, हा न्याय पूर्वापार आहे. १३ व्या शतकात संस्कृत भाषा सामथ्र्यशाली होती कारण तिला भक्कम अधिष्ठान होते ते धर्मसत्तेचे. धर्मसत्तेचा पगडा राजसत्तेवर असल्याने धर्मसत्ता आणि राजसत्ता या उभय सत्तांच्या एकत्रित पाठिंब्यातून प्रसवणारे संस्कृत भाषेचे अर्थकारणही तेव्हा बुलंदच होते. साहजिकच, पंडितांची ज्ञानभाषा म्हणून संस्कृत त्या काळी मिरवत होती. सर्वसामान्यांची भाषा असणारी ‘मऱ्हाटी’ प्राकृत तेव्हा उपेक्षितच होती. आजही मराठी उपेक्षितच आहे. याचा विस्मय वाटण्याचे त्यामुळेच कारण नाही.
आज इंग्रजी ही जगातील एक प्रमुख ज्ञानभाषा बनलेली आहे. साहजिकच तिचे महत्त्व, माहात्म्य आणि उपयोजनही वैश्विक आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेद्वारे आज जगाच्या कानाकोपऱ्यांतील बाजारपेठांची परस्परांत घट्ट गुंफण झालेली आहे. संपत्तीच्या हातात हात घालून संस्कृतीचेही वैश्विक भ्रमण-स्थलांतरण त्यामुळे वेगवान बनलेले आहे. अर्थसत्तेचा खंबीर टेकू लाभल्याने इंग्रजी भाषेचे अर्थकारण आज प्रचंड मजबूत झालेले आहे. ज्या भाषेचे अर्थकारण सुदृढ तिचा परीघ विस्तारक्षम, हा चिरंतन न्याय असल्याने इंग्रजी भाषेच्या प्रभावाचा पैस दिसागणिक विस्तारतो आहे. इंग्रजीच्या त्याच झंझावाताचे आक्रमण मराठीवर होत असल्याची हाकाटी आता जी पिटली जाते, तिचा कार्यकारणभाव हा थोडक्यात असा सांगता येईल. या प्रकारे छाती पिटणे सोपे असते आणि लाभदायकही! ऊर बडवण्याने एक तर भाषेवरील प्रेमाचे प्रदर्शन जगासमोर मांडता येते. दुसरे म्हणजे, मराठीच्या सक्षमीकरणासाठी अणूभरही प्रयत्न न करण्याची आमची निष्क्रियता सहानुभूतीच्या त्या पांघरुणाखाली दडपता येते. या बाबतीत तर संतांच्या प्रयत्नांपासून आपण कणभरही काही शिकलेलो नाही.
सर्वसामान्यांचे सक्षमीकरण घडवून आणणे हा संत विचाराचा आणि संतांच्या कार्याचा गाभा. ज्ञान हे तर सक्षमीकरणाचे आद्य साधन. ‘ज्ञान हेच सामथ्र्य’ हे समीकरण सार्वकालिक आहे. आजच्या २१ व्या शतकाइतकेच हे समीकरण १३ व्या शतकातही लागू होते. परंतु, ज्ञानभाषा संस्कृत असल्यामुळे त्या काळी ज्ञान सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. समाजाचे सक्षमीकरण घडवून आणण्याचे भाषा हे साधन असले, तरी सक्षम भाषाच समाजपुरुषाचे सक्षमीकरण घडवून आणू शकते याचे पुरेसे भान संतमंडळाला होते. त्यासाठी प्रथम भाषेचेच सक्षमीकरण घडवण्याची मोहीम संतांनी हाती घेतली ती मराठीला ज्ञानभाषा बनविण्याचा संकल्प कृतीमध्ये उतरवून. या मोहिमेची पायाभरणी केली महानुभावांनी. ग्रंथरचनेसाठी मराठीची योजना करून लोकव्यवहाराची भाषा असणाऱ्या प्राकृत मराठीला महानुभाव संतांनी ग्रांथिक भाषेची प्रतिष्ठा प्रदान केली. परंतु, गद्य ग्रांथिकी मराठी वाचून त्या भाषेतील ज्ञान पचवण्यासाठी प्रथम ग्रंथगत भाषा समाजाच्या ओठी रुळणे आवश्यक ठरते. ज्ञानदेवादी वारकरी संतांनी त्यासाठी केलेले प्रयत्न महानुभावांनी आरंभलेल्या उपक्रमाला पूरक ठरले. ओवी आणि अभंग हे अस्सल देशी, मोकळाढाकळा रूपबंध असलेले वाण या परंपरेतील संतांनी त्यांच्या साहित्यरचनेसाठी वापरले ते त्याच हेतूने. सुलभता आणि गेयता ही अंगभूत वैशिष्टय़े लाभलेले ओवी आणि अभंग हे रचनाबंध स्त्री आबालवृद्धांपर्यंत सर्वच स्तरांतील समाजघटकांच्या निकट परिचयाचे होते. त्यामुळे, संस्कृत ग्रंथांवरील टीकाग्रंथ ओवीछंदात ओवण्यासाठी ज्ञानदेवांनी ‘मऱ्हाटी’चा माध्यमभाषा म्हणून उपयोग केला. कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदीप उजळण्यांसाठी नामदेवबाबांनी ‘अभंग’ हा लोकछंद प्रभावीपणे वापरण्यास त्याच्याच आगेमागे सुरुवात केलेली होती.
संस्कृतातील ज्ञान ‘मऱ्हाटी’ सारख्या लोकभाषेत आणण्याने मऱ्हाटीचे सक्षमीकरण साधत असतानाच ज्ञानभाषा बनविलेल्या मराठी या लोकभाषेच्या माध्यमातून तत्कालीन मराठी समाजाचेही सबलीकरण घडवून आणण्याचा दुहेरी उद्योग संतांनी आरंभला, हे वास्तव आपल्याला भिडतच नाही. भगवद्गीता हा ज्ञानदेवांच्या लेखी अध्यात्मशास्त्राचा ग्रंथ तर आहेच; परंतु, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अर्जुनाला कर्तव्यसन्मुख बनविणारी अशी ती दोन मित्रांमधील विवेकपूर्ण ‘ज्ञानगोठी’ आहे, याची ज्ञानदेवांना पूर्ण जाणीव होती. त्यामुळे, हे कर्तव्याभिमुख ऐहिक ज्ञान ‘मऱ्हाटी’मध्ये आणून विवेकदीपावरील काजळी फेडण्यास ते सिद्ध झाले. तत्कालीन समाजाची ती गरज ज्ञानदेवांनी अचूक हेरली. ‘मज विवेकु सांगावा। मऱ्हाटा जी।।’ हा ‘ज्ञानेश्वरी’च्या तिसऱ्या अध्यायात अर्जुनाच्या मुखी ज्ञानदेवांनी घातलेला उद्गार, १३ व्या शतकातील सर्वसामान्य ज्ञानवंचित मराठी मनाच्या ज्ञानतृष्णेचा प्रातिनिधिक हुंकार ठरतो. ‘मऱ्हाटी’ हे आजच्या ‘मराठी’चे ज्ञानदेवकालीन रूप जरी असले, तरी ‘मऱ्हाटी’ अथवा ‘मऱ्हाटा’ या शब्दाचा एक अर्थ ‘सुलभ’, ‘प्राकृत’ असा आहे. संस्कृत भाषेच्या प्रांगणात बंदिस्त झालेला तो विवेकाचा ठेवा ‘मऱ्हाटा’ बोलांमध्ये म्हणजे साध्या, सुलभ अशा प्राकृतामध्ये मांडावा असा आर्जव ज्ञानदेवांचा अर्जुन श्रीकृष्णाला करतो त्या वेळी तत्कालीन सर्वसामान्य मराठी माणसाची ज्ञानइच्छा तिथे व्यक्त होत असते.
संस्कृतातील ज्ञान लोकभाषेमध्ये आणण्यामागील संतभूमिका ही अशी आहे. ज्ञानरूपी गंगेमध्ये बुडी मारून सक्षम बनण्याच्या वाटा संस्कृत भाषेची गहन तीरे वाटेत आल्याने सर्वसामान्यांसाठी दुष्कर बनलेल्या होत्या. ती गहन तीरे तोडून ज्ञानगंगेमध्ये उतरण्यासाठी मराठी भाषेच्या पायऱ्या मी बांधतो आहे, ही आपली भावना ज्ञानदेव ‘‘तीरें संस्कृताचीं गहनें। तोडोनि मऱ्हाठिया केली शब्दसोपाने।’’ अशा शब्दांत मांडून एका परीने मराठी भाषेचे सामथ्र्यच व्यक्त करत असतात. संस्कृतातील ज्ञान तितक्याच समर्थपणे व्यक्त करण्याचे सामथ्र्य मराठी भाषेत आहे, याचा जणू पुरावाच ते तत्कालीन संस्कृत भाषाभिमान्यांपुढे ठेवतात. केवळ एवढेच नाही, तर आम्हाला संस्कृत भाषा येत नाही म्हणून आम्ही मराठीमध्ये रचना करतो असे नाही हेही संस्कृतच्या पाठिराख्यांना ठणकावून सांगण्यासाठीच जणू ज्ञानदेवांनी ‘अमृतानुभव’ या आपल्या स्वतंत्र प्रबंधात पहिले पाच श्लोक संस्कृतात रचून त्या पुढील ८०० ओव्यांमधून आगमाचा तत्त्वसिद्धांत मराठी भाषेमध्ये मांडलेला आहे. ‘ज्ञानेश्वरी’ हा टीकाग्रंथ आहे तर ‘अमृतानुभव’ हा ज्ञानदेवांचा स्वतंत्र दर्शनग्रंथ होय. संस्कृतातील ज्ञानाचा अनुवाद करण्याबरोबरच स्वतंत्र तत्त्वदर्शन मांडण्याची क्षमताही लोकभाषा ‘मऱ्हाटी’ मध्ये आहे, याचा रोकडा पुरावाच ज्ञानदेवांनी तत्कालीन समाजपुरुषासमोर मांडला. लोकभाषा असलेल्या ‘मऱ्हाटी प्राकृत’ भाषेला संपन्न अशी ज्ञानभाषा बनविण्याचा संतांचा हा कृतिशील उपक्रम आज आम्ही पूर्णपणे उपेक्षिलेला आहे.
मराठी ही ज्ञानभाषा बनल्याखेरीज तिचे अर्थकारण सुदृढ बनणार नाही, हे वास्तव आपण ध्यानात घेणार का नाही? खऱ्या अर्थाने मराठी ही ज्ञानभाषा बनावी, यासाठी व्यक्तिगत, सामाजिक अथवा शासकीय पातळीवर आपण नेटाने डोळस प्रयत्न करतो का?
आपण धन्यता मानतो केवळ टिपे गाळण्यात! विविध ज्ञानशाखांमधील किती अव्वल विद्वान बांधिलकीच्या भावनेमधून, मराठीला ज्ञानभाषा बनवण्यासाठी संशोधने, प्रमेये, सिद्धांत मराठी भाषेतून समाजासमोर मांडतात? मराठीमध्ये लिहिले तर मानमान्यता मिळत नाही. इंग्रजीमधून फर्डा ‘रीसर्च पेपर’ लिहिला तर दिगंत कीर्ती मिळण्याबरोबरच अर्थप्राप्तीही उत्तम होते. मग, मराठीमध्ये लिहिणार कोण? हे द्वंद्व केवळ आजचे आहे, असेही नाही. १६ व्या शतकातील चित्र असेच होते. संस्कृतमध्ये रचना करणाऱ्यांना मानाचे पान बहाल करणाऱ्या तत्कालीन ज्ञानव्यवहारातील मुखंडांना एकनाथांसारखा शांतिब्रह्म पुरुषही ‘‘संस्कृत ग्रंथकर्ते ते महाकवी । मा प्राकृतीं काय उणीवी ।।’’, असा मोठा मार्मिक सवाल करतात तो या भाषाभेदापायीच. आजचा झगडा नेमका तोच आहे. तेव्हा मराठीची लढाई होती देववाणीशी. आज युद्ध आहे साहेबांच्या भाषेशी. भाषेचे सक्षमीकरण करण्याचा संतांनी दिलेला वसा आपण सोडून दिला. त्यामुळे ‘संस्कृतवाणी देवें केली। तरी प्राकृत काय चोरापासोनि जाली॥’ हा जो प्रश्न एकनाथांनी संस्कृतच्या संदर्भात विचारला, तो आज इंग्रजीच्या संदर्भात विचारण्याचा हक्क आपण गमावून बसलो आहोत.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sai Pallavi reacts on turning vegetarian for Sita role in Ramayana
‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
News About Osho
Osho : आचार्य रजनीश अर्थात ओशो कोण होते? त्यांच्या विषयीची ही रहस्यं तुम्हाला ठाऊक आहेत का?
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
loksatta readers response
लोकमानस : हे केवळ चुकांवर पांघरूण
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Story img Loader