आयपीएल म्हणजे मुक्तछंदातले काव्य. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या क्रिकेटच्या साऱ्या परिभाषा ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या या व्यासपीठाने बदलून टाकल्या. पण कसोटी क्रिकेट म्हणजे छंद-वृत्त आदी बंधनातले एक अभिजात काव्य. शनिवारी शिखर धवन जेव्हा आपल्या पहिल्यावहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची लक्तरे वेशीवर टांगत होता, तेव्हा पीळदार मिशीच्या या नवयुवकाने समस्त क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. दिल्लीचा हा ‘रावडी’ धवन पदार्पणातच ही किमया साधतो, तर पुढे तो धावांचे अनेक इमले बांधेल, अशी आशा एकीकडे निर्माण होते, तर दुसरीकडे आक्रमणाची ही आयपीएल शैली कसोटी क्रिकेटच्या प्रांगणात कितपत टिकाव धरेल? थोडक्यात म्हणजे आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात झोकात पदार्पण तितके झाले, पण हा फॉर्म आणि रुबाब, अल्पायुषी तर ठरणार नाही ना, ही भीती मात्र सहज प्रतिबिंबित होते. धवनने पहिल्याच कसोटीत फक्त ८५ चेंडूंत शतक पूर्ण केले. याशिवाय १७४ चेंडूंत त्याने १८७ धावांची वादळी खेळी साकारली. वीरेंद्र सेहवागचा वारसा आता दिल्लीचाच खेळाडू चालविणार, हे कुणाला वाटले, तर कुणाला त्यात सचिन तेंडुलकर, विवियन रिचर्ड्स दिसले. पण एका खेळीत धवनवर भाळणे ही घोडचूक ठरू शकेल. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर गेली दोन वष्रे वैयक्तिक फॉर्मशी झुंजत असल्याने भारताला चांगली सलामी नोंदवून देऊ शकलेले नाहीत. गंभीर आणि सेहवाग या दिल्लीच्या अनुभवी खेळाडूंचा काटा महेंद्रसिंग धोनीने अतिशय चतुराईने काढला. आता मुरली विजय आणि धवन हे सलामीचे शिलेदार म्हणून धोनी आजमावत आहे. मागील दोन हंगामांमध्ये धवनने आयपीएलच्या रणांगणावर डेक्कन चार्जर्सकडून खेळताना धावांचा पाऊस पाडला आहे. याशिवाय रणजी, इराणी, आंतरराष्ट्रीय संघांविरुद्धच्या प्रथम श्रेणी सामन्यांत त्याने चांगली कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच डावखुऱ्या धवनचा सलामीसाठी विचार करण्यात आला आहे. १९८८मध्ये नरेंद्र हिरवाणी या लेग-स्पिनरने पहिल्याच कसोटीत विक्रमी १६ बळी घेत विवियन रिचर्ड्सच्या वेस्ट इंडिज संघाची दाणादाण उडवली होती. बेदी-प्रसन्ना-वेंकटराघवनचा वारसदार अशी कौतुकाची शाबासकी त्याला पहिल्याच कसोटीत मिळाली. पण त्याची कसोटी कारकीर्द मात्र फक्त १७ कसोटी सामन्यांपर्यंतच मर्यादित राहिली. आक्रमण हा बचावाचा सर्वोत्तम मार्ग असतो. सध्याच्या ट्वेन्टी-२०च्या वेगवान युगात पैसा आणि प्रसिद्धी यांच्यानिशी मिळणारी आयपीएलची संधी मोठी असल्यामुळे उदयास येणारे अनेक क्रिकेटपटू आयपीएलचे स्वप्नच घेऊन वावरतात. या वेगवान क्रिकेटच्या काळात कसोटी क्रिकेटचे निकाल लागण्याचे प्रमाण वाढत आहे. परंतु कसोटी क्रिकेटचा आत्मा मात्र हरवत चालला आहे, ही शोकांतिका आहे. राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्यासारख्या फलंदाजांमुळे कसोटी क्रिकेट तरून होते. ख्यातनाम समालोचक आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू उपहासाने म्हणतो, ‘चमकनेवाली हर चीज हिरा नहीं होती.’ नेमके हेच आक्रमक फलंदाजीची ‘दबंग’गिरी दाखविणाऱ्या धवनच्या बाबतीत आपल्याला सांभाळायला हवे.