कमी श्रमात जास्त धन कमावण्याच्या लोभाला धर्म, आध्यात्म, ‘गुप्तविद्या’.. पसरवलेल्या माहितीवर लोकांचा व  प्रसारमाध्यमांचाही अंधविश्वास, असे अनेक अवयव असतात. हे सारे अवयव चालवणारा मेंदू कुणा गुन्हेगाराचा.. अमेरिकेतील अलास्काच्या समुद्रात सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी हेच घडले!

‘लोभापोटी सारासार विचार लुळा पडतो’ अशा आशयाचे कित्येक वाक्प्रचार आणि म्हणी जगभरच्या भाषांमध्ये आहेत. लोभाच्या भरात त्याचाही विसर पडत असावा! प्रलोभनाला सहजी भुरळणारे लोक असतात याचा पुरेसा अदमास असणारे धूर्त सर्वत्र आढळतात. सहजी अफाट धन मिळेल, झटपट एका झटक्यात ‘मालदार’ होता येईल असे आमिष दिसले, की बऱ्याच लोकांची चलबिचल होऊ लागते. त्यांची ‘नजरबंदी’ करणारे हरघडी एखादी नवी वाटणारी शक्कल घेऊन अवतरतात.
‘अमेरिका’ या एके काळी अज्ञात आणि निर्जन असलेल्या ‘भू-खंडावर’ युरोपातले गोरगरीब येऊन धडकू लागले. या अज्ञात प्रदेशामध्ये बायबलातील वर्णनाशी जुळेल असा स्वर्गरम्य रहिवास लाभू शकतो, असा त्यातल्या अनेकांचा समज होता. या समजुतीचा त्या काळच्या सुसंपन्न लोकांवर प्रभाव पडला होता. त्याचा लाभ घेऊन काही हजार पौंडांमध्ये स्वर्गभूमीत जागा मिळवायला लोक आतुर होते. एका बिलंदराने या आमिषापोटी अमाप पैसे गोळा केले आणि काही खोटे पत्ते, नकाशे देऊन टाकले. कालांतराने हे पैसे गुंतलेले आशाळभूत तेथे पोहोचले. तेव्हा त्यांच्या स्वर्गातुर नजरेला पाहायला मिळाला अफाट दलदलीने भरलेला प्रदेश!
अमेरिका या खंडात अशा फसवाफसवींचा मोठा सविस्तर नोंदलेला इतिहास आहे. त्यातले काही इरसाल पण खास प्रातिनिधिक नमुने पाहू.
इसवी सन १८९०. अमेरिकेमध्ये प्रिस्कॉट फोर्ड येरनेगान (Prescott Ford Jernegan) नावाचा बाप्तिस्मा देणारा रुबाबदार देखणा ‘ख्रिस्ती उपाध्याय’ होता. (चर्चच्या भाषेत ‘मिनिस्टर’) तो  प्रतिष्ठित कुटुंबातला होता. त्याला म्हणे दृष्टांत झाला. या दृष्टांतामध्ये स्वर्गस्थ शक्तींनी त्याला एक गूढ विद्या दिली. त्या विद्येमुळे त्याला समुद्राच्या पाण्यातून सोने पाझरून काढणे शक्य होणार होते. या दृष्टांताची सुवार्ता त्याने आपल्या कनेक्टिकटमधल्या श्रीमंत मित्र आणि ख्रिस्त मंडळातील सुसंपन्न सहकाऱ्यांना सांगितली. त्याचा हा विद्याशोध किती विश्वासार्ह एवढे तरी निदान तपासलेच पाहिजे असा त्यांचा ग्रह झाला. अशी पडताळणी करून पाहायला ते तयार झाले. या पडताळणीच्या तयारीत मोठय़ा उत्साहाने सरसावला तो आर्थर बी. रायन. हे गृहस्थ काही काळ शहराचे कोतवाल (आल्डरमन) होते. आणि जडजवाहीर विकणाऱ्या एका ख्यातनाम, यशस्वी कंपनीचे प्रमुख भागीदार होते.
रायनला हाताशी धरून पडताळणी सोहळा करायला येरनेगान सरसावले. फक्त इतर कुणाला पत्ता न लागू देता त्यांनी आपल्या खास मर्जीतला दोस्त चार्लस फिशरला एक कामगिरी सांगितली. हा चार्लस फिशर म्हणजे, केप कॉड या समुद्री भागातला उत्तम ‘सूर’करी पाणबुडय़ा होता. फिशर आणि ‘उपाध्याय’ महोदय येरनेगानची इतकी दाट मैत्री होती की, या उपाध्यायबुवांनी त्याला लिहिलेल्या पत्रात आपली मनाची व्यथाही लिहिली होती. त्याने फिशरला लिहिले होते : माझ्या आयुष्यात दोनच चिवट आणि कठीण आव्हाने आहेत एक म्हणजे ‘पैसा’ दुसरे म्हणजे कामेच्छा! अशी ‘पापकबुली’ ऊर्फ कन्फेशन द्यावी इतका त्याचा फिशर जवळचा दोस्त.
आपला दृष्टांत अस्सल आहे हे पटविल्याखेरीज कुणी पैसे देणार नाही याची येरनेगानला पक्की जाणीव होती. त्याने रत्नपारखी आर्थर बी. रायनला एक पेटी दिली आणि सांगितले, की ऱ्होड आयलंडमध्ये नारामेनसेट उपसागराशी एक निर्जनशी किनारपट्टी आहे. त्यावर समुद्रात जाणारा एक पूलवजा रस्ता आहे. तिथल्या साचलेल्या बर्फात खड्डा करून आत ही पेटी सोडून दे. या पेटीत काही लोखंडी पट्टय़ा आणि सळ्या आहेत. खेरीज एक खास संचयकारक द्रव्य आहे. पेटीच्या बाजूने प्लॅटिनमच्या वायर बांधून पाण्यात फैलावल्या आहेत. त्यामधून समुद्रलहरीबरोबर विजेचा प्रवाह वाहत येईल आणि जादूमय संचयकारक द्रव्यामुळे पेटीमध्ये सोन्याचे कण साचून त्याचे खडे होतील! आणि हे घडून यायला २४ ताससुद्धा पुरेत! आर्थर रायन आपल्या एका नोकरासह तिथे पोहोचला. पेटी बर्फामध्ये सोडून कुडकुडत वाट पाहत थांबला.
इकडे त्यांच्या नकळत पाणबुडे फिशर महाशय आपला सूर मारण्यासाठीचा बुरखा घालून हजर होतेच. प्लॅटिनम वायरचा माग धरून ते पेटीपर्यंत पोहोचले. त्यात येरनेगनने दिलेले सोन्याचे छोटे कण आणि खडे भरले व दुसऱ्या दिशेने कुणाला न दिसता पोहत चालते झाले. दुसरे दिवशी रत्नपारखी कोतवाल ऑर्थर बी रायन यांनी पेटी ओढून घेतली आणि उघडली. पाहतात तो आत सोने जमलेले! दुधावर साय आल्यागत लोखंडावर सोन्याची पखरण! पण त्यांना शंका आली की सोने खरेच अस्सल आहे का? मग त्यांनी ते सोने शहरामध्ये आणून पारखून घेतले. परीक्षांती असे लक्षात आले, की ते अगदी अस्सल बावनकशी सोने. ऑर्थर रायनना वाटले, आपणच ही लोखंडी सळ्या, पट्टय़ांची पेटी आत सोडली होती. एका रात्रीत एवढे सोने पाझरत पाझरत अवतरले! ही निश्चितच त्यातल्या संचयद्रव्याची किमया असणार! येरनेगनचा दृष्टांत काही भाकडकथा नाही अस्सल पन्हेरी सोने देणारी गुप्तविद्याच आहे!
ही कथा सांगोवांगी होत सगळ्याच धनाढय़ वर्तुळात पसरली. प्रत्येकाला समुद्र लाटातून सोने पाझरून मिळू शकेल या ‘सत्याचा’ मोह सुटला. लवकरच येरनेगान आणि फिशर या दुकलीने एक कंपनी स्थापन केली. कंपनीचे नाव ‘इलेक्ट्रोलायटिक मरिन सॉल्ट्स कंपनी’ कंपनीचे कामकाज नॉर्थ ल्युबेक, माईनमधल्या एका दूरवरच्या खेडय़ात चालणार होते. कारण काय? तर येरनेगान बुवा सांगत, की ‘‘आपल्या संदुकीमध्ये जे जादूई संचय द्रव्य आहे त्याचा जितक्या अधिक समुद्र पाण्याचा संपर्क मिळेल तेवढे सोने अधिक मिळेल! या खेडय़ातल्या लाटा पाहिल्यात का तुम्ही, सातत्याने वीस-बावीस फूट उंचीच्या लाटा येथे सतत उसळत असतात! आता एवढे पाणी हाताळणारी जादूई संचयाची पेटीदेखील अवाढव्य हवी. ती उभी करायची तर भरपूर भांडवल घालावे लागणार. येरनेगान बुवांच्या कंपनीने १८९७ पर्यंत एक कोटी डॉलर एवढे शेअर विकले.
या सगळ्या ‘सुवर्णगर्दी’ला ‘आलास्का गोल्डरश’ म्हणतात. त्या तथाकथित अद्भुत संचयी द्रव्याने पैदासलेल्या सोन्याचे बॉस्टन आणि अन्य शहरांत प्रदर्शन मांडण्यात यायचे. या जादूई रहस्याचा इतका गवगवा झाला, की वर्तमानपत्रे, मासिकेपण त्याची चवीचवीने चर्चा करू लागली. एका वर्तमान मासिकाने तर ‘समुद्राच्या पाण्यात सुमारे सत्तर अब्ज टन इतके सोने असावे!’ असा प्राथमिक शास्त्रीय अंदाजसुद्धा जाहीर केला.
यानंतर काय झाले असणार हे उघड आहे. १८९८ साली एक लाखभर डॉलर नगदी रूपात घेऊन सूरकरी पाणबुडे श्रीयुत फिशर यांनी पोबारा केला. कालांतराने त्यापेक्षा दुप्पट रक्कम घेऊन पाद्रीबुवा येरनेगान परागंदा झाले. पण दुर्दैवाने काही वार्ताहरांना ते भेटले. वार्ताहरांनी छेडल्यावर त्यांनी सांगितले, की ते फिशरच्या शोधात फिरत आहेत – कशासाठी तर फिशरने त्यांची गुप्त विद्या आणि प्रक्रिया चोरली, ती घेऊन तो पळून गेलाय! आणि आता येरनेगान त्याचा माग काढतो आहे.
दोन वर्षांनंतर काय झाले कुणास ठाऊक.. येरनेगान यांना पश्चात्ताप झाला. ते स्वत:हून परत आले. आता त्यांच्याकडे फक्त पावणेदोन लाख डॉलर शिल्लक होते. तेवढे त्यांनी जमेल त्यांना परत केले आणि पलायन केले ते फिलिपिन्सला. फिशर यांनी पुढे काय केले, त्यांचे काय झाले हे अजून अज्ञात आहे. येरनेगान यांना शिक्षा झाली नसावी. तशी नोंद नाही. बहुधा त्याने राहिलेले पैसे परत केले एवढी पापाची कबुली बाप्तिस्मा उपाध्यायासाठी पुरेशी वाटून कुणी खटला केला नसावा. समुद्राच्या पाण्यातून गुप्त जादू प्रक्रियेने सोनं पाघळून मिळेल या कल्पनेवर बेहद्द खूश होऊन अनेक श्रीमंत आणि अनेक गरीब लोक भाळले आणि लोक असे भाळतील याचा दृष्टांत येरनेगनला झाला एवढे मात्र खरे!    

Story img Loader