पंडित रविशंकर यांच्यासोबत दहा वर्षे काढण्याचे भाग्य लाभलेले सतारवादक परिमल सदाफळ हे शिक्षणाने एम्.टेक. आहेत आणि कमी खर्चात अक्षय ऊर्जा-साधने गरिबांहाती पोहोचवण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे..
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या संस्कारात वाढलेले आणि तरुण वयात जगविख्यात सतारवादक पंडित रविशंकर यांच्या तालमीत तयार झालेले परिमल सदाफळ एकाच वेळी दोन सर्वस्वी भिन्न ध्येय गाठण्यासाठी झटत असतात. सतारवादनातून मन उल्हसित करणारी ऊर्जा निर्माण करतानाच अठराविश्वे दारिद्रय़ वाटय़ाला आलेल्या ग्रामीण भारतात स्वस्त ऊर्जा निर्माण करण्याची त्यांची धडपड चालली असते. बाबा आमटे आणि पंडित रविशंकर या दोन दीपस्तंभांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून.
    परिमल सदाफळ यांचा जन्म आनंदवन, वरोऱ्याचा १९६१चा. बालपण बाबा आमटेंच्या अंगाखांद्यावर खेळण्यात गेलेले. सदाफळ कुटुंब चंद्रपूरचे. सत्तरीच्या दशकात डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या हरित क्रांतीत महत्त्वाचा सहभाग असलेले डॉ. मनमोहन सदाफळ दिल्लीच्या राष्ट्रीय कृषी संशोधन परिषदेत सहायक महासंचालक म्हणून निवृत्त झाले. परिमल यांच्या आई सुमन साधनाताई आमटेंच्या धाकटय़ा भगिनी. नागपूरच्या भोसले राजांचे राजगायक असलेल्या महालातील घुले कुटुंबात जन्मलेल्या सुमन यांनी संगीतात रस घ्यावा म्हणून हैदराबादला असताना एक दिवस मनमोहन सदाफळ यांनी सतार आणि सतार शिकविणाऱ्या मास्तरसह घरी पोहोचून त्यांना चकित केले. वर्षभरात पन्नासेक राग शिकून सुमन सदाफळ झटपट विशारद झाल्या. तेव्हा परिमल तीन-साडेतीन वर्षांचे होते. आई सतार शिकत असताना सोबत असल्यामुळे वर्षभरात परिमलही अनेक राग शिकले. तेव्हा रेडिओ नव्यानेच आला होता. त्यावर लागणारी गाणी किंवा शास्त्रीय संगीताचे राग परिमल वयाच्या चौथ्या वर्षीच ओळखू लागले. त्यांच्या वडिलांनी हैदराबादला पंडित रविशंकर यांचा कार्यक्रम असताना त्यांची महत्प्रयासाने भेट मिळविली आणि परिमलला मार्गदर्शन करण्याची विनंती केली. पंडितजींनी आपल्या शिष्यांना सतारीवर काही राग वाजवायला सांगितले आणि परिमलनी ते सर्व राग अचूक ओळखले. परिमलमध्ये प्रतिभा असल्याचे मान्य करण्यावाचून पंडितजींपाशी पर्यायच नव्हता. त्याच वेळी वडिलांची बदली दिल्लीला झाली होती. कोवळ्या वयात सतार वाजविल्याने तारांवर घासून बोटे फाटतील, म्हणून मुलगा सात वर्षांचा झाल्यावर सतार शिकायला सुरुवात करण्याचा सल्ला पंडितजींनी दिला. परिमलवर सतारीचे संस्कार करण्याची जबाबदारी दिल्लीतील शिष्य बलवंतराय वर्मा आणि उमाशंकर मिश्रा यांच्यावर टाकली. दोघांनीही सर्वासोबत नव्हे तर वैयक्तिकपणे पंडित रविशंकर यांनी सांगितलेल्या शैलीत शिकविले. सातव्या वाढदिवसाला वडिलांनी आणलेल्या लहानशा सतारीनिशी त्यांनी सुरुवात केली.
    शिक्षण आणि शिक्षणाबाहेरच्या क्षेत्रात सारखेच यश मिळविण्याची जिद्द सदाफळ दाम्पत्याने आपल्या तिन्ही मुलांमध्ये बाणवली. परिणामी थोरल्या परिमलचा कित्ता गिरवीत त्यांचे पुण्यात स्थायिक झालेले मधले भाऊ पराग यांनी कंपनी सेक्रेटरी व वकिलीच्या क्षेत्रात यश मिळवीत असतानाच बिरजू महाराजांच्या गुरुभगिनी मंजुश्री बॅनर्जीच्या मार्गदर्शनाखाली कथ्थक नृत्यात नैपुण्य संपादन केले. अमेरिकेत स्थायिक झालेले धाकटे बंधू पंकज यांनी राजन, साजन मिश्रांच्या तालमीत नावाजलेले गायक म्हणून लौकिक संपादन केला. या भावंडांचे साधनाताई आणि बाबा आमटेंना खूप कौतुक होते. आनंदवन मित्रमेळाव्यात पु. ल. देशपांडे, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी यांच्यासमोर सदाफळबंधूंनाही आपली कला सादर करण्याची संधी मिळायची. मध्य प्रदेशातील सागरच्या श्रुती हळवे यांच्याशी परिमल यांचा १९९० साली विवाह झाला. संगीतात एम. ए. केलेल्या श्रुती दिल्लीत नूतन मराठी शाळेत शिक्षिका आहेत. इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षांत शिकणारी त्यांची कन्या ध्वनी लंडनच्या रॉयल स्कूल ऑफ म्युझिकची प्रशस्ती लाभलेली अव्वल दर्जाची व्यावसायिक पियानोवादक असून मुलगा बारावीत शिकतो आहे.
    संगीताकडे उपजतच कल असूनही आणि पंडित रविशंकर यांचे शिष्योत्तम ठरूनही परिमल यांना हे यश सहजासहजी मिळाले नाही. सतार सोडायची नाही, शाळेत (क्लासेसलाही) जायचे, अभ्यासही करायचा अशा बंधनात ते अडकले होते. पहाटे पाचला उठून करोलबागला गुरुजी उमाशंकर यांच्या घरापाशी सायकल नेऊन ठेवायची. तिथून बसने पटेलनगरला घरी परतायचे. मग सकाळचा नाश्ता करून शाळेची बॅग, ड्रेस आणि सतार घेऊन घरून परत सहा किलोमीटर पायी चालत पुन्हा गुरुजींचे घर गाठायचे. तिथे दहा वाजेपर्यंत रियाझ केल्यावर सव्वादहाला सायकलने बिर्ला मंदिराशेजारच्या शाळेत. शाळा संपल्यावर सायकलने करोलबागेला क्लासला जायचे. रात्री आठला बॅग आणि सायकल घरी ठेवून बसने पुन्हा करोलबागला जायचे आणि गुरुजींकडची सतार घेऊन पायी घरी परतायचे, अशा मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा थकविणाऱ्या दिनक्रमात दोन वर्षे ते तावूनसुलाखून निघाले. दिल्लीतील फेथ अ‍ॅकॅडमीमध्ये आठवीपर्यंत, तर दिल्ली-तामिळनाडू एज्युकेशन असोसिएशनच्या शाळेत बारावीपर्यंत शिकल्यानंतर अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठातून त्यांनी कृषी अभियांत्रिकीमध्ये बी. टेक्. केले. दिल्लीला परतल्यावर त्यांनी पुसामध्ये एम. टेक्. केले. वडिलांनी दीड वर्षे पाठपुरावा केल्यानंतर पंडित रविशंकर यांनी परिमल यांचा १९८३ साली शिष्य म्हणून स्वीकार केला. थेट गुरुजींपासून शिकायला मिळाल्याने तिथून त्यांचा नवा प्रवास सुरू झाला. बाबा आमटेंसारखेच गुरुजीही त्यांच्या आयुष्यातील दुसरे दीपस्तंभ ठरले. एम. टेक्. केल्यानंतर परिमल यांनी ग्रामीण भारतात, अपारंपरिक म्हणजे अक्षय ऊर्जेच्या क्षेत्राला वाहून घेण्याचे ठरविले. त्यांना पहिली नोकरी मिळाली, ती टेरी म्हणजे टाटा एनर्जी रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये. गेली २५ वर्षे ते ग्रामीण ऊर्जेवरच काम करीत आहेत. आयडीई नावाच्या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेत ते पाच वर्षे सूक्ष्म सिंचनाच्या कामात गुंतले. कॅनडाच्या सीएचएफ पार्टनर्सच्या या स्वयंसेवी संस्थेच्या दिल्ली कार्यालयाचे ते चार वर्षे प्रमुख होते. २००३ पर्यंत संगीत साधना आणि नोकरी यांचे संतुलन त्यांनी साधले होते. पण ‘नोकरीत गुंतल्यामुळे तुला अन्य कामांसाठी वेळ नसतो. अनेकदा गरज असताना उपलब्ध होत नाही. आता माझे वय झाले आहे. नोकरी करणे आवश्यक आहे काय,’ असे पंडित रविशंकर यांनी त्यांना विचारले आणि करार संपल्यावर नवी नोकरी शोधण्याचा परिमल यांनी प्रयत्न केला नाही. गुरुजींना जास्तीतजास्त वेळ देता यावा  व उदरनिर्वाहही चालावा म्हणून त्यांनी कन्सल्टन्सीचा तोडगा काढला. विनरॉक इंटरनॅशनल, जागतिक बँक, यूएनडीपी, एशियन डेव्हलपमेंट बँकयांचे सल्लागार म्हणून काम पत्करून त्यांनी दोन्ही क्षेत्रांत लवचीकता आणली. व्यवसायाच्या निमित्ताने देशभर फिरणाऱ्या परिमल यांनी ग्रामीण भारतातील दारिद्रय़ अगदी जवळून अनुभवले आहे. अक्षय ऊर्जेच्या निर्मितीचा खर्च भरपूर असल्यामुळे त्याची सांगड ग्रामीण उपजीविकेशी घालण्याचा नवा प्रयोग ते यूएनडीपीच्या माध्यमातून करीत आहेत. लोकांना ऊर्जा देऊन फायदा नाही, कारण ती त्यांना परवडणारी नसते. योग्य उपजीविका उपलब्ध करून ऊर्जा परवडेल, अशी क्षमता त्यांच्यात निर्माण करण्याची आवश्यकता आहे. लोकांना उपजीविकेसाठी मार्गदर्शन करायचे. त्यातील ऊर्जेची कमी अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून पूर्ण करतानाच मिळणाऱ्या पैशातून ऊर्जेचा खर्च फेडता येईल, असा प्रयत्न करण्यात ते सध्या गुंतले आहेत. वाराणसीमध्ये सुरू असलेला हा प्रयोग यशस्वी ठरल्यास स्वत:च्या स्वयंसेवी संस्थेद्वारे विदर्भात याच धर्तीवर काही प्रकल्प सुरू करायची त्यांची इच्छा आहे.
    शेवटची दहा वर्षे सातत्याने गुरुजींसोबत राहून त्यांच्याकडून शिकण्याची दुर्मीळ संधी मिळवली. त्यांची सतार लावून देणे, संगीतरचना करण्यात मदत करणे, युरोप, अमेरिकेच्या दौऱ्यांसह त्यांची मैफलींमध्ये साथ देणे, यांसारख्या सर्व महत्त्वाच्या भूमिका त्यांनी बजावल्या. परिमल यांच्या मते गुरुजींसारखे सिद्धपुरुष  किमान हजार वर्षे बघायला मिळणार नाहीत. नवक्लृप्त्यांचा अवलंब करणारी अत्यंत तल्लख बुद्धी त्यांना लाभली होती. गुरुजींच्या पश्चात परिमल बलवंतराय वर्मा यांच्याशी संवाद साधतात. एकटेही नव्या रचना रचतात. मैफलींमध्ये गुरुजींच्या ठेव्याला उजाळा देतात. निवडक विद्यार्थ्यांना शिकवतात. व्यावसायिक कामानिमित्त गरिबांच्या वस्त्यांकडे पोहोचण्यासाठी बरेचदा विमान, रेल्वे, मोटार किंवा बैलगाडीने प्रवास करावे लागतात. अशा प्रवासात डोकावणाऱ्या चाली, विचार कुठे तरी साठवून ठेवण्याचा ते प्रयत्न करतात. सतारवादन आणि अक्षय ऊर्जा त्यांच्यासाठी आता सारख्याच महत्त्वाच्या ठरल्या आहेत. व्यावसायिक कामानिमित्त अगदी दुर्गम भागात पायी किंवा बैलगाडीने जातानाही सतार साथीला असते. दुसरीकडे संगीत मैफलींना जाताना व्यवसायावर नजर ठेवणारा लॅपटॉपही सोबत असतो. सतार आणि लॅपटॉप, तारांचा बॉक्स, सूरपेटी, इलेक्ट्रॉनिक तंबोरा, तबला हे त्यांच्या प्रवासातील अविभाज्य घटक ठरले आहेत. पुढे जाऊन या उपकरणांना चार्ज करण्यासाठी सोलर पॅनेलही ठेवावे लागेल, असे ते गमतीने म्हणतात. राग म्हणजे स्वरांची माला, अशी अनेक कलावंतांची धारणा झाली आहे. पण राग म्हणजे फक्त स्वरमाला नव्हे. प्रत्येक रागाचा एक मूड, मिजाज असतो. वेगळे चारित्र्य, स्वरूप असते. एखादा राग आज गायला तर वेगळा, उद्या गायला तर वेगळा असतो. बडय़ा रागात आलापाच्या अंगाने जायचे असते. खयाल सुरू करायचा, मध्य लय गाठायची आणि तिथेच थांबायचे. छोटय़ा रागात आलाप करायचाच नाही आणि सरळ मध्य लयीपासून सुरुवात करून द्रुतमध्ये शिरत पूर्ण वेगाने पुढे जायचे, असे कितीतरी नवे पैलू त्यांना पंडित रविशंकर यांच्याकडून समजले. राग म्हणजे एक अवघड भूलभुलैया.. तो सादर करताना एका ठिकाणाहून प्रवेश करून कुठून तरी बाहेर पडायचे असते. रस्ता विसरला तर तुम्ही भरकटून जाता. कुठले स्वर चालतील, कुठले वज्र्य, अशा सगळ्या नियमांचे भान ठेवून त्यातून बाहेर पडण्यासाठी गुरूची आवश्यकता असते. अशा अवघड स्थितीत रस्ता कसा बनवायचा, कसा शोधायचा, याचे कसब परिमल यांनी पंडित रविशंकर यांच्या सान्निध्यातून मिळविले. त्यामुळेच परिमल सदाफळ यांच्या बाबतीत सतारीतील ऊर्जा व्यवसायात आणि व्यवसायातून लाभणारी ऊर्जा सतारवादनात शिरून अशी ‘अक्षय’ बनली आहे. पंडित रविशंकर यांच्याकडून त्यांना असा ‘अक्षय’ ठेवा मिळाला, जो पुढची अनेक वर्षे संपणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा