इराणच्या अध्यक्षपदी हसन रोहानी यांच्यासारखा नेमस्त सुधारणावादी निवडून आला आहे. त्यांच्या विजयाने इराण आणि पाश्चात्त्य देशांतील घर्षण कमी होऊन शांतिपर्व सुरू होईल, अशी जगाची अपेक्षा आहे.
लोकशाहीचा पूर्णावतार नसलेल्या देशातील राजकीय व्यवस्था बऱ्याचदा गुंतागुंतीची असते. उदाहरणार्थ इराण. प. आशियातील या बलाढय़ देशात राज्य करू पाहणाऱ्यास जनतेतून निवडूनही यावे लागते आणि त्याच वेळी धर्मपीठाचाही, म्हणजे अयातोल्ला यांचा आशीर्वादही लागतो. हे सव्यापसव्य पार करणे सर्वासाठीच आवश्यक असले तरी ताज्या निवडणुकीत निवडून आलेले हसन रोहानी यांच्यासाठी ते अधिक आव्हानात्मक होते. याचे कारण एका बाजूला खड्डय़ात गेली अमेरिका असे म्हणणारे अयातोल्ला अली खोमेनी आणि दुसरीकडे अमेरिकाधार्जिण्या पाश्चात्त्य जगाशी सुसंवाद साधायला हवा अशा मताचे स्वत: रोहानी असा हा पेच होता. त्याच वेळी निवडणुकीत रोहानी यांना स्पर्धा होती ती पाश्चात्त्य जगाशी अधिक संघर्ष करायला हवा अशी आक्रमक आणि टोकाची भूमिका घेणाऱ्या अन्य उमेदवारांशी. त्यात आघाडीवर होते सईद जलिली. यांना स्वत: अयातोल्ला खोमेनी यांचा पाठिंबा होता आणि इस्लामची धार्मिक मूल्ये, भ्रष्ट पाश्चात्त्य अशा त्यांच्या मांडणीमुळे कट्टरपंथीय मोठय़ा प्रमाणावर त्यांच्या मागे उभे राहतील अशीही चिन्हे होती. इस्लामचा संस्थापक प्रेषित महंमद याची परराष्ट्रनीती असा प्रबंध या जलिली महाशयांच्या नावावर आहे. धर्मभावनांना भोंगळ अभ्यासाने शास्त्राचे रूप देणाऱ्यांची मोहिनी जनसामान्यांवर पडत असते. आपल्याकडेही हे अलीकडे मोठय़ा प्रमाणावर होताना दिसते. असे विद्वान मग गाईच्या शेणाने त्वचारोग बरे होत असल्याचे वा गंगाजल सर्वगुणसंपन्न असल्याचे संशोधन सादर करतात. तेव्हा इराणसारख्या अर्धप्रगत देशात असे झाल्यास नवल नाही. त्यामुळे जलिली यांचे नाव निवडणुकीत आघाडीवर होते. त्यांच्या आघाडीस आणखी एक कारण आहे. आपल्या धसमुसळय़ा वागण्याबोलण्यासाठी कुख्यात असलेले मावळते अध्यक्ष महमूद अहेमदीनेजाद यांनी आपले वजन जलिली यांच्या पारडय़ात टाकले होते. त्यामुळे जलिली हेच इराणचे पुढील अध्यक्ष असतील असा समज होता. त्यास रोहानी यांच्या विजयामुळे तडा गेला आणि त्याचे स्वागतच करावयास हवे.
त्याचे कारण रोहानी हे सुधारणावादी आहेत, इतकेच नाही. त्यांच्या निवडीमुळे एकंदरच नेमस्त आणि समंजस अशा ताकदींना प्रेरणा मिळेल हे आहे. २००९ सालातील निवडणुकीत अहेमदीनेजाद यांनी घोटाळे केले आणि आपणच निवडून येऊ अशी व्यवस्था केली. त्याही वेळी समंजस मतदारांनी सुधारणावाद्यांना पाठिंबा दिला होता. सुधारणावादी म्हणून ओळखले जाणारे मीर हसन मुसावी हेच पाच वर्षांपूर्वीच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाले होते. परंतु अहेमदीनेजाद यांनी दांडगाई करीत आपल्यालाच जनाधार असल्याचा देखावा निर्माण केला आणि सत्ता राखली. तेव्हापासून इराणी नेमस्तांनी हाय खाल्ली. आपल्या मतांस कधीच राजमान्यता मिळणार नाही असे चित्र निर्माण झाल्याने मध्यममार्गी इराणी राजकीय व्यवस्थेपासून काहीसा दुरावला गेला. अशा वातावरणात कर्कश्शांना बळ मिळते. सर्वच प्रश्न दांडगाईने सोडवायचे असतात असा समज दृढ होतो आणि नेमस्त आणि नेभळट यांच्यातील फरक जनतेस कळेनासा होतो. इराणात हेच होत होते. अहेमदीनेजाद यांच्या एकारलेल्या आणि अतिरेकी भूमिकांमुळे अमेरिकेसमोर नाक खाजवणे हा एकमेव कार्यक्रम इराणी जनतेसमोर आहे, असा समज निर्माण झाला होता. सततच्या संघर्षवादी भूमिकेमुळे अहेमदीनेजाद हे जागतिक राजकारणात गझनीच्या महंमदाप्रमाणे वेडे वाटू लागले होते. आपला जीव किती आणि आपण बोलतो काय याचे संपूर्ण भान सुटलेला हा गृहस्थ इराणास आर्थिक गर्तेत लोटू पाहात होता. आर्थिक विपन्नावस्थेत आक्रमकता अकारण आकर्षक ठरते. त्यामुळे अहेमदीनेजाद यांचा बेडूक अधिकच फुगला. अखेर न्यायालयीन कारणांमुळे अहेमदीनेजाद यांना ही निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली. या पाश्र्वभूमीवर रोहानी यांच्या विजयाचे मोल अधिकच आहे.
तरीही त्यांच्या विजयाचे स्वागत करताना सुधारणावादी या विशेषणाचे इराणी मूल्य मोजकेच आहे, हे ध्यानात ठेवावयास हवे. रोहानी यांची पाश्र्वभूमीदेखील धर्मगुरूचीच आहे. पुढे ब्रिटनमधील ग्लासगो विद्यापीठात त्यांचे उच्च शिक्षण झाले असले तरी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अयातोल्ला खोमेनी यांच्या धर्मक्रांतिकाळातच झाली हे विसरता येणार नाही. १९७९ साली तत्कालीन सत्ताधारी शहा महंमद रझा पहेलवी यांच्या विरोधात धर्मक्रांती करून अयातोल्ला खोमेनी यांनी सत्ता ताब्यात घेतली आणि चार महिन्यांतच अमेरिकेच्या तेहरानमधील दूतावासावर हल्ला होऊन तेथील कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले गेले. त्याच काळात रोहानी हे खोमेनी यांच्या नजरेत आले. त्याचे कारणही रोहानी यांची त्या वेळची अमेरिकाधार्जिण्या शहा यांच्या विरोधातील भूमिका हे होते. अमेरिकेच्या हातचे बाहुले बनलेल्या शहा यांच्या राजवटीवर रोहानी कडाडून हल्ला चढवीत असत. तेव्हा अयातोल्ला खोमेनी यांना रोहानी यांच्यामध्ये समानधर्मी दिसला यात नवल काही. याच विश्वासामुळे राज्यसत्ता हाकताना धर्मसत्ताप्रमुख अयातोल्ला खोमेनी यांनी रोहानी यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या दिल्या. याच काळात इराणने गुप्तपणे अण्वस्त्रे बनवण्याची योजना आखली आणि पुढे ती फुटल्यावर पाश्चात्त्य देशांशी संवाद साधण्याची जबाबदारीही रोहानी यांच्यावर येऊन पडली. इराणने अण्वस्त्रनिर्मिती करण्यास विकसित देशांचा विरोध असल्याने रोहानी यांची संवादकाची भूमिका त्या देशाच्या दृष्टीने महत्त्वाची होती. परंतु पाश्चात्त्यांशी चर्चा फिसकटल्यावर रोहानी यांनी माघार घेत इराणी अणुचाचण्या थांबवण्याची शिफारस केली होती, असे म्हणतात. या त्यांच्या निर्णयावर इराणात त्या वेळी मोठी टीका झाली होती आणि तिचे नेतृत्व अहेमदीनेजाद यांनीच केले होते. पुढे याच अहेमदीनेजाद यांच्याशी रोहानी यांचे मतभेद झाले आणि त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. आता काव्यात्म न्यायाने ते अहेमदीनेजाद यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील.
त्यांच्या निवडीमुळे पाश्चात्त्य देशांबरोबर, त्यातही अमेरिकेबरोबर, सुरू असलेले इराणचे घर्षण कमी होईल असा अंदाज वर्तविला जातो. परंतु त्याबाबतही सावधगिरी बाळगलेली बरी. प्राधान्याने गरीब आणि अज्ञानी जनता असेल त्या देशाच्या राज्यकर्त्यांस टोकाची भूमिका अचानक बदलून चालत नाही. जनतेचा भावनाभंग होतो. त्यामुळे रोहानी यांना अत्यंत सावकाशच पावले टाकावी लागतील. परंतु त्या दिशेने त्यांना जावे लागेल हे नक्की. कारण तसे केल्याखेरीज इराणवरील आर्थिक र्निबध दूर होणार नाहीत. या र्निबधांमुळे इराणचे आर्थिक कंबरडे मोडले असून त्यामुळे जनता जेरीस आली आहे. सद्यस्थितीत त्यामुळे अमेरिकेशी मैत्री वा शत्रुत्व यापेक्षा आर्थिक र्निबधांमुळे आलेली तंगी हा मुद्दा इराणी जनतेसमोर अधिक गंभीर आहे. १९७९ च्या क्रांतीनंतर अमेरिकेने इराणबरोबरील राजनैतिक संबंध तोडलेले आहेत. त्याच्या पुनस्र्थापनेसाठी प्रयत्नदेखील रोहानी यांच्या कार्यक्रमपत्रिकेवर आहेत. ही सर्व कसरत कोणत्याही धार्मिक भावना न दुखावता त्यांना करावयाची आहे, ही बाब त्यांच्यासमोरील आव्हानाचे गांभीर्य अधोरेखित करू शकेल.
पन्नाशीच्या दशकात इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या कच्छपी लागून अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष आयसेनहॉवर यांनी इराणचे लोकनियुक्त सत्ताधीश महंमद मोसादेघ यांच्याविरोधात उठाव घडवून    आणला. अमेरिकी गुप्तहेर यंत्रणेचे तत्कालीन प्रमुख कर्मिट रूझवेल्ट यांनी हा उठाव पेरला होता. तेव्हापासूनच अमेरिका आणि इराण यांच्यात सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यानंतर १९७९ साली अमेरिकेचे तत्कालीन        अध्यक्ष जिमी कार्टर यांचे नाक कापून अयातोल्ला खोमेनी यांनी अमेरिकेवर सूड उगवला. त्यानंतरही इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी झाला नाही. शियाबहुल इराणला रोखण्यासाठी सुन्नीबहुल सौदी अरेबियास ताकद देण्याचा उद्योग अमेरिकेने नेहमीच केला. त्यास कारण होते ते अमेरिकेचे आखातातून मिळणारे तेलप्रेम. आता अमेरिकेस या प्रदेशातील तेलाची गरज नाही. खेरीज इस्रायलला मोकळे न सोडता त्यालाही कह्य़ात ठेवण्याची गरज अमेरिकेस वाटू लागली आहे. त्यामुळेच अमेरिकेचा या प्रदेशातील हस्तक्षेप आता कमी होऊ शकेल.  
अशा वातावरणात रुजण्यासाठी शांततेस संधी मिळावी लागते. रोहानी यांच्या विजयामुळे ती मिळू शकेल आणि त्याच वेळी अमेरिकेतही बराक ओबामा यांचे संयत नेतृत्व असल्याने या शांतिपर्वाचे आयुष्य वाढू शकेल. त्याचमुळे पर्शियाचा विद्यमान पेच नवे अध्यक्ष रोहानी सोडवून दाखवू शकतील. त्यांच्याकडून जगाची तीच अपेक्षा आहे.

Story img Loader