जोसेफ हे त्यांचे ख्रिस्ती नाव चिनी प्रशासनाने नेहमीच अमान्य केले. त्यांच्या ‘फान झोंगलिआंग’ याच नावाने चिनी तुरुंग अधिकाऱ्यांनी त्यांची नोंद केली आणि ते बिशप आहेत, याची पत्रास कधीही ठेवली नाही. वयाची ९६ वर्षे उलटली, तरीही त्यांना नजरकैदेतच राहावे लागले आणि तेथे गेल्या आठवडय़ात त्यांचे निधन झाल्यानंतर रविवारी, त्यांच्या दफनविधीसाठी अत्यंत लहान जागा देऊन चिनी प्रशासनाने त्यांना मरणोत्तर त्रास देण्याचीही कामगिरी बजावली. एवढा त्रास सहन करावा लागण्यासाठी बिशप जोसेफ यांचा गुन्हा काय होता? – त्यांचे ख्रिस्ती धर्मप्रसारक असणे आणि ख्रिस्तींच्या जेझुइट पंथातील असल्याने चीनच्या मते ‘क्रांतीविरोधी’ असणे, हा! चीनने सन १९४९मध्ये निधर्मी माओवादाचा स्वीकार केला त्याआधी, १९३८ पासून- म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षीच जोसेफ फान हे धर्मप्रसाराचे रीतसर शिक्षण घेण्यासाठी सेमिनरीत दाखल झाले होते. शिक्षणानंतर सामाजिक-धार्मिक कार्याचा अनुभव घेऊन १९५१मध्ये ते पाद्री झाले. शांघाय हे माओआधीच्या चीनमधील सर्वाधिक आंग्लाळलेले शहर होते. परंतु माओच्या सैनिकांनी येथेही सांस्कृतिक क्रांती सुरू केली आणि तिला कधी मूकपणे, तर कधी मुखरपणे विरोध ख्रिस्ती समाजाने दर्शविला. तेवढय़ाने, क्रांतीविरोधी आणि पर्यायाने देशविरोधीच कारवाया केल्याचा सज्जड ठपका ठेवून १९५५मध्ये त्यांना अटक झाली आणि आधी कैदेत, तर १९५८ ते ७८ अशी २० वर्षे श्रम-छावणीत काढावी लागली. श्रमछावणी हे छळछावणीचेच माओवादी रूप, तेथे ऐन उमेदीची वर्षे काढून, साठाव्या वर्षी त्यांनी क्विंघाय शहरात प्रथम मोकळा श्वास घेतला. याच शहरातील धर्मप्रसारकांसह जोसेफ राहू लागले आणि क्विंघायमधील पाच वर्षांच्या वास्तव्यातही तीनदा अटक झाल्यानंतर १९८५मध्ये त्यांना पुन्हा स्वत:च्या शहरी, शांघाय येथे जाण्याची संधी मिळाली. तीही, बिशपचे सहकारी म्हणून. मात्र हे सारे सरकारला कळू न देता करावे लागणार होते. एव्हाना चीनने लोकांना ख्रिस्ती असा धर्म लावण्याची मुभा दिली होती, परंतु धर्मप्रसारकांनी कम्युनिस्ट पार्टीच्याच आज्ञेत राहावे, अशा अपेक्षेचे काटेही कायम होते. अनेक चिनी नागरिकांनी स्वत:ची चिनी आणि ख्रिस्ती नावेही धारण केली होती. पण जोसेफ हे तेव्हाही चीनच्या मते शत्रूच होते. त्यांना शांघायमध्येही स्वस्थता लाभली नाही. अखेर, सन २०००मध्ये पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी जोसेफ यांना शांघाय कॅथलिक धर्मप्रांताचे बिशप म्हणून घोषित केले. चिनी प्रशासनाने ही नेमणूक अमान्य ठरवून, स्वत:च्या अखत्यारीत दुसरे बिशप नेमले. दलाई लामांच्या वारसदाराबद्दलही अशीच दडपशाही चीनने केली होती.

 

Story img Loader