या लेखिकेचे नाव उच्चारायला अवघड आहेच, पण तिच्या मायदेशातील – नायजेरियामधील सद्यस्थिती त्याहून अधिक अवघड आहे. एकेकाळी आधुनिकतेच्या वाटेवर असलेला हा देश, लष्करशाही राजवटीतून बाहेर पडूनदेखील उभा राहूच शकला नाही. उलट, सध्या हा देश बको हरम सारख्या तालिबानी दहशतवादी गटांचं केंद्रस्थान बनला आहे. साहजिकच, या देशाकडे गेल्या दहाबारा वर्षांत प्रगत देश संशयानेच पाहातात. अमेरिकेत एखाद्या नायजेरियन तरुणाला, हुशार असूनही तो केवळ या देशाचा , या एका कारणासाठी प्रवेश नाकारला जातो. हीच नेमकी परिस्थिती, इंग्रजी साहित्यिक (कादंबरीकार व कथाकार) म्हणून गेल्या दहा वर्षांत जगभर नाव झालेल्या चिमामांडा यांनी ’ अमेरिकाना’ या ताज्या कादंबरीत मांडली. महत्त्वाचे म्हणजे, सुरक्षेच्या कारणांखाली दडलेला अमेरिकी दंभ उघडा पाडणाऱ्या या कादंबरीला अमेरिकी समीक्षकांच्या ‘नशनल बुक क्रिटिक्स सर्कल’ या संस्थेचा, यंदाच्या सर्वोत्कृष्ट ललित साहित्याचा पुरस्कार मिळाला आहे.
‘अमेरिकाना’ ही चिमामांडा एन्गोझी यांची तिसरी कादंबरी. पहिली – ‘ पर्पल हिबिस्कस’ ही कादंबरी त्यांच्या वयाच्या २६व्या वर्षी प्रकाशित झाली. या कादंबरीने त्यांना जागतिक इंग्रजी सारस्वतात प्रतिष्ठा मिळवून दिली. या पहिल्या कादंबरीला, प्रतिष्ठित ‘बुकर पारितोषिका ’ च्या संभाव्य विजेत्यांच्या यादीत स्थान मिळाले . पण ‘ बुकर ’ ने हुलकावणी दिली. अन्य , कमी प्रतिष्ठित पुरस्कारांवर या कादंबरीला समाधान मानावे लागले. अर्थात, वाचकांनी या कादंबरीचे स्वागतच केले आणि त्यानंतर तीन वर्षांनी चिमामांडा यांची दुसरी कादंबरी – ‘ हाफ द यलो सन ’ प्रचंड वाचकप्रियता मिळविणारी ठरली.
हे सारे स्वागत ‘ निराळे प्रश्न मांडणारी ललित कृती’ म्हणून होत होते. पण चिमामांडा यांच्या लिखाणात ‘दलित प्रवाह ’ आहे आणि विद्रोहाची ती शलाका त्यांच्या कादंबऱ्यांपेक्षा कथांतून अधिक दिसते, असे जाणकारांचे मत होते. या कथांचेही पुस्तक -‘ द िथग अराउंड युअर नेक’ निघाले. नव्या कादंबरीत मात्र , ललित की दलित ही दुविधा मिटविण्याची ताकद आहे. या कादंबरीची नायिका शिकायला अमेरिकेत येते आणि अल्पावधीत आपली चमक दाखवून देते. अमेरिकेत साहित्य, संवादशास्त्र आणि राज्यशास्त्रा अशा तीन विषयांत पदव्या मिळविलेल्या चिमामांडा यांचे या नायिकेशी साम्य आहे. पण ही आत्मकथा नव्हे. स्वतच्या पलीकडले, मानवी शक्यता शोधणारे आणि त्यांची संगती लावताना, वास्तव हे असे आहे याचे भान वाचकाला देणारे कथानक चिमामांडा यांनी रचले आहे.
चिमामांडा एन्गोझी अडीशे
या लेखिकेचे नाव उच्चारायला अवघड आहेच, पण तिच्या मायदेशातील - नायजेरियामधील सद्यस्थिती त्याहून अधिक अवघड आहे.
First published on: 17-03-2014 at 12:24 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personality chimamanda ngozi adichie wins us national book critics circle award for americanah