एखादे नावच ब्रँड होण्याचा तो काळ नव्हता. पण गाडगीळ हे अस्सल कोकणस्थी नाव सोन्याच्या बाजारात लखलखून निघाले, ते केवळ सचोटीच्या आधारे. गाडगीळांकडच्या सोन्यात मिसळण असणारच नाही, अशी खात्री वाटण्यासाठी अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांना बरेच कष्ट करावे लागले. पण ते कष्ट इतके सार्थकी लागले की पुण्याचे पुणेपण कशात आहे, या प्रश्नाचे उत्तर ‘गाडगीळ सराफ’ असे मिळू लागले. सतत सुस्नात चेहऱ्याने दाजीकाका सोने घ्यायला येणाऱ्या प्रत्येकाशी बोलत.  ग्राहक कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी किती तरी आधीपासून दाजीकाका ‘ग्राहक देवो भव’ ही उक्ती आचरणात आणत होते. त्यांच्या सराफी दुकानात काम करणाऱ्या बहुतांश महिलांनाही हीच शिकवण त्यांनी दिली. त्यामुळे चोख सोने मिळाल्याच्या आनंदाबरोबरच चांगल्या वागणुकीचा लाभ ग्राहक घेत राहिले. सांगलीतील गाडगीळांचा सोन्याचा व्यवसाय फार पूर्वीपासूनचा. दाजीकाकांनी पुण्यात विस्तार करायचे ठरवले, तेव्हा पुणेकरांना जिंकण्याचे सर्वात मोठे आव्हान त्यांना पेलायचे होते, पण त्यांच्या स्वभावामुळे आणि त्याहून अधिक सचोटीमुळे ते पुणेरी आभूषण बनले. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरच्या त्यांच्या दुकानातील गर्दी तेजी-मंदीचा कोणताही मुलाहिजा न ठेवता सतत वाढते, याचे ते कारण होते. ‘आमची कोठेही शाखा नाही’ असे सांगण्यातच भूषण मानणाऱ्या पुणेरी व्यावसायिकांना त्यांनी आपल्या शाखा अन्यत्र सुरू करून उत्तर दिले. शंभरीला टेकलेल्या दाजीकाकांना प्रकृतीचे वरदान होते. सोन्याची पेढी आहे, म्हणून दहाही बोटांत अंगठय़ा आणि गळ्यात दोरखंड शोभावा अशी चेन घालण्याची गरज त्यांना कधी वाटली नाही. उलट गरजवंतांना आपणहून मदत करण्यात त्यांना जास्त आनंद वाटला. या हाताने दिलेले त्या हाताला कळू देता कामा नये, ही उक्ती त्यांनी सार्थ केली. सराफी व्यवसायातील सगळ्यांना एकत्र आणून त्यांची संघटना बांधण्याचे त्यांचे काम जसे महत्त्वाचे, तसेच या व्यवसायाला बदलत्या काळानुसार बदलण्याची त्यांची मानसिकताही आगळी. तंत्रयुगाचा फायदा करून घेत आपल्या व्यवसायातही त्याचा अचूक फायदा करून घेण्याची दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. बांधकाम व्यवसायात उतरताना त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचेच ‘ब्रँड नाव’ स्वीकारण्याचा निर्णय घेतला, कारण महाराष्ट्रातील प्रत्येकाचा त्यांच्यावर कमालीचा विश्वास होता. या विश्वासाला आपण पात्र ठरलो, यातच समाधान मानणाऱ्या गाडगीळांच्या शंभराव्या जन्मदिनाच्या सोहळ्याला मात्र मराठी माणसे त्यांच्या निधनामुळे मुकली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा