साहित्य प्रकारात ‘अनुवाद’ या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण मूळ साहित्यकृतीला आणि त्यातील आशयाला कोणताही धक्का न लावता किंवा त्याचा विपर्यास न करता अनुवादकाला ती साहित्यकृती वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे आव्हान असते. त्यामुळेच सर्वसामान्यांना वरवर पाहता अनुवाद आणि भाषांतर ही दोन्ही कामे एकसारखी वाटली तरी त्यात खूप फरक आहे. गेली अनेक वर्षे विविध विषयांवर लेखन करणारे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना नुकताच ‘बायबल- दी न्यू टेस्टामेंट’ या पुस्तकाच्या त्यांनी मराठीत केलेल्या ‘सुबोध बायबल- नवा करार’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा २०१३ या वर्षीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. ‘फ्रान्सिस दिब्रिटो’ असे नाव असलेले हे व्यक्तिमत्त्व अस्सल मराठमोळे आहे. ते कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून ओळखले जात असले तरी त्यांचा जन्म वसई येथील मराठी ख्रिस्ती कुटुंबात झाला. लेखक म्हणून त्यांनी मराठीत विविध विषयांवर लेखन केले असले तरी त्यांची खरी ओळख ही पर्यावणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरोधात आवाज उठविणारे कार्यकर्ते, सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून जास्त प्रमाणात आहे. ते धर्मगुरू आहेत, पण त्यांचा धर्म हा चर्चपुरता मर्यादित नाही.
मराठी भाषिक ख्रिस्ती समाजाचे मुखपत्र असलेल्या ‘सुवार्ता’ या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. या मासिकाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन आणि वेगवेगळे विषय, उपक्रम त्यांनी सातत्याने हाताळले. त्यामुळे हे मासिक फक्त ख्रिस्ती समाजापुरते मर्यादित न राहता मराठी साहित्यातही या मासिकाने आपला स्वतंत्र ठसा उमटविला. ‘हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून दिब्रिटो यांनी पर्यावरण जतन, संरक्षण आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली. वसईतील ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण’ याच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेतला आणि मोहीम राबविली. पुणे येथे १९९२ मध्ये झालेल्या पंधराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. ‘तेजाची पाऊले’, ‘संघर्ष यात्रा ख्रिस्तभूमीची- इस्रायल आणि परिसराचा संघर्षमय इतिहास’, ‘आनंदाचे अंतरंग- मदर तेरेसा’, ‘सृजनाचा मोहोर’, ‘ओअॅसिसच्या शोधात’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. समाजासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांना दिब्रिटो यांनी नेहमीच कृतिशील पाठिंबा दिला आहे. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि धार्मिक अशा विविध प्रकारच्या उपक्रमांतून त्यांनी स्वत:ला समाजाशी जोडून घेऊन वेळोवेळी आपल्या ‘समाजधर्मा’चेही पालन केले आहे.