कुस्तीसारख्या मराठमोळय़ा खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवायचे असेल तर पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड हवी असे तत्त्व स्वत: अमलात आणून आपल्या शिष्यांनाही त्याप्रमाणे अनुकरण करायला लावणारे प्रशिक्षक क्वचितच आढळून येतात. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर हे अशाच मोजक्यांपैकी. गणपतराव यांनी स्पर्धात्मक कुस्ती कारकिर्दीत मातीवरच अनेक मैदाने जिंकली, मात्र बदलत्या काळानुसार या खेळाला नावीन्याची व आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलाची जोड दिली पाहिजे हे त्यांनी ओळखले व अमलात आणले. जाकार्ता येथे १९६२ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी ग्रीकोरोमन विभागात सुवर्णपदक तर फ्रीस्टाइलमध्ये रौप्यपदकाची कमाई करीत मुलखावेगळी कामगिरी केली. खरे तर फ्रीस्टाइलमध्येही त्यांना सुवर्णपदक मिळाले असते. मात्र अंतिम फेरीची लढत बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही खेळाडूंच्या वजनावर लढतीचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये गणपतराव यांचे वजन त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळाडूपेक्षा काही ग्रॅमच जास्त होते. एकाच वेळी कुस्तीच्या दोन्ही शैलींमध्ये आशियाई पदक मिळविणारे मल्ल क्वचितच आढळून येतात. कोल्हापूरच्या या मल्लांनी दोनशेहून अधिक कुस्त्या जिंकल्या. त्यापैकी चाळीसपेक्षा जास्त लढतींमध्ये त्यांनी पाकिस्तानच्या पहिलवानांवर मात केली. त्यामुळेच की काय पूर्वी पाकिस्तानचे मल्ल भारतात आले की आवर्जून कोल्हापूर येथील मोतीबाग तालमीत आंदळकर कसा सराव करतात हे पाहूनच जात असत. लपेट, कलाजंग, एकेरीपट, एकलंघी आदी अनेक डावांबाबत आंदळकर हे तरबेज मल्ल मानले जात. सादिक पंजाबी हा त्या वेळी अजिंक्य मल्ल मानला जाई. मात्र आंदळकर यांनी त्याला तब्बल ३५ मिनिटे झुंज देत चीत केले. स्पर्धात्मक कारकिर्दीतून निवृत्त झाल्यानंतर ते नवोदित मल्लांना प्रशिक्षण देतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर मैदान गाजविणारे दादू चौगुले, युवराज पाटील, रामचंद्र सारंग, हिरामण बनकर, संभाजी पाटील, नंदू आबदार, बीडचा बालारफिक शेख यांच्यासह शेकडो नामवंत मल्ल त्यांनी घडविले आहेत. फक्त शंभर रुपये मासिक शुल्क आकारणाऱ्या या तालमीत आंतरराष्ट्रीय मॅट्सचे मैदान आहे. महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय मॅट्स प्रथम आणण्याचे श्रेय त्यांनाच दिले जाते. पहिलवानास तल्लख बुद्धीचीही आवश्यकता असते या तत्त्वाचा त्यांनी सतत पाठपुरावा केला आहे. आपल्या तालमीत येणारे विद्यार्थी शैक्षणिक आघाडीवर कमी पडणार नाहीत याची काळजी ते घेतात. वयाची ऐंशी वर्षे उलटली तरी दर सायंकाळी स्वत: ते मैदानात येऊन मल्लांना विविध डावपेच शिकवतात. त्यांना नुकताच जाहीर झालेला राजर्षी शाहू पुरस्कार हा आपला वैयक्तिक पुरस्कार नसून कुस्तीचाच गौरव आहे असेच ते मानतात.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jun 2014 रोजी प्रकाशित
व्यक्तिवेध: गणपतराव आंदळकर
कुस्तीसारख्या मराठमोळय़ा खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवायचे असेल तर पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड हवी असे तत्त्व स्वत: अमलात आणून आपल्या शिष्यांनाही त्याप्रमाणे अनुकरण करायला लावणारे प्रशिक्षक क्वचितच आढळून येतात.
First published on: 24-06-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personality ganpatrao andalkar