वेदविद्या ही पोटार्थी विद्या नसून ती एक तपस्या आहे व त्यासाठी त्याग करावा लागतो. त्याशिवाय वेदविद्या येत नाही. कर्मकांडाचे पाच सहा वर्षांत शिक्षण घेता येते. मात्र, वेदांच्या अध्ययनाला कालमर्यादा नाही. आजन्म वेदांचे शिक्षण घेतले तरी ते कमीच आहे, अशी ज्ञाननिष्ठा असण्यासाठी मनोनिग्रहाचे बळ असावे लागते. महाराष्ट्रात वेदाध्यापनासोबत भारतीय संस्कृती आणि परंपरा टिकविण्याचे कार्य ज्या व्यक्ती आणि घराणी करीत आहेत त्यात नागपुरातील आर्वीकर घराणे एक होय. राज्य शासनाचे महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार जाहीर झाले असून आर्वीकर वेदपाठशाळेच्या कृष्णाशास्त्री आर्वीकर यांना ‘वेदमूर्ती पुरस्कार’ जाहीर झाल्याने एका त्यागमय जीवनकार्याचा यथोचित सन्मान झाला आहे.
यापूर्वी १९६५ मध्ये आजोबा भाऊजी आर्वीकर, त्यानंतर २०१२ मध्ये वडील गोविंद आर्वीकर, २०१३ मध्ये ललिताशास्त्री आर्वीकर यांना असेच सन्मानित करण्यात आलेले होते. घराण्याचा पारंपरिक वारसा आणि संस्कृती जपत कृष्णाशास्त्री गोविंद आर्वीकर यांनी ऋग्वेद दशग्रंथ आणि कर्मकांड याज्ञिकचे अध्ययन केले. १९७० ते १९७५ पर्यंत घरातच, वैदिकशिरोमणी भाऊजी आर्वीकरांकडे, तर १९७५ ते १९८४ पुण्याला वेदाचार्य विनायकभट्ट घैसास गुरुजींकडे ते शिकले. विद्यावाचस्पती बह्मश्री दत्तमहाराज कवीश्वर यांचेही मार्गदर्शन कृष्णाशास्त्रींना लाभले. १९८४-८५ मध्ये पुण्याच्या श्रीदेवदेवेश्वर संस्थानाच्या वेदविद्या केंद्राचे प्राचार्य म्हणून वेदांचे अध्यापन त्यांनी केले. २००८ मध्ये त्यांनी प्रधानाचार्य देवनाथ वेदविद्यालय सुरू केले. सध्या तेथे १५ विद्यार्थी अध्ययन करीत असून त्यांना विनामूल्य वेदाध्यापन केले जाते.
गेल्या ११ पिढय़ांपासून आर्वीकर घराण्यात अविच्छिन वैदिक परंपरा, अध्ययन आणि अध्यापन कार्य सुरू आहे. अनेक हस्तलिखित ग्रंथांचे जतन कृष्णाशास्त्री आणि त्यांच्या कुटुंबियांनी केले आहे. वेदपरीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल १९८५ मध्ये कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले होते. इंदूरच्या नरहरगुरू वैदिकाश्रम संस्थेचा पुरस्कार, २००२ मध्ये बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषद, २००३ मध्ये सांगली जयंती वासुदेव प्रतिष्ठानतर्फे पुरुषोत्तम पुरस्कार, प्राच्य भाषातज्ज्ञ पुरस्कार, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा वैदिक स्कॉलर ऑफ विदर्भ, नाशिकच्या चित्तपावन ब्राम्हण संघाचा परशुराम वेद पुरस्कार आदी सन्मान कृष्णाशास्त्रीजींना मिळाले. पुण्याची वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळा, वासुदेव वाङ्मय अभ्यास मंडळ, पवनीचे प.प. वासुदेवनंद सरस्वती महाराज स्वामी महाराज साधना मंदिर, रामटेकचे वेदविद्या अभ्यास मंडळ संस्कृत विश्वविद्यालय आदी संस्थांशी ते जुळलेले आहेत.