भारतीय अणुऊर्जा क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी ‘नेहरू आणि होमी भाभांचे स्वप्न’ प्रत्यक्षात उतरवण्यासाठी केलेल्या अतिशय खडतर वाटचालीचे एक मूर्तिमंत प्रतीक म्हणजे अणुशास्त्रज्ञ एन. श्रीनिवासन. ट्रॉम्बेमध्ये प्लुटोनियम अणुभट्टी उभारण्यापासून ते कल्पक्कमच्या उजाड जागेवर आजचा मोठा अणुऊर्जा प्रकल्प साकार करण्यापर्यंतच्या अनेक कामांनंतर चेन्नईत निवृत्त जीवन जगताना, वयाच्या ८४ व्या वर्षी श्रीनिवासन यांचे निधन झाले तेव्हा ही वाटचाल किती खडतर होती याच्या अनेक आठवणी या क्षेत्रातील जाणकारांना आल्या..
यापैकीच एक आठवण, १९५३ च्या सुमाराची. केंद्र सरकारचा अणुऊर्जा विभाग, त्यात नुकतेच रुजू झालेले श्रीनिवासन आणि (हल्ली ज्यांच्या नावाने अणुशास्त्रज्ञांना पुरस्कार दिला जातो, ते) जी. एस. तेंडुलकर हे दोघे दादरच्या कॅडेल रोडवर या खात्याच्या रसायन प्रयोगशाळेत युरेनियम हाताळत होते, निरनिराळ्या अभिक्रिया तपासत होते. यापैकी ‘फ्यूज्ड साल्ट इलेक्ट्रोलिसिस’ या अभिक्रियेमुळे धूर येऊ लागला- हे प्रकरण साधे नव्हे, किरणोत्सार पसरू शकतो, हे लक्षात घेऊन तातडीने दोघांनी ही जागा बंद केली. किल्ल्या तेव्हाचे मुंबईचे या खात्याचे प्रमुख डी. एस. सोमण यांच्या हाती सोपवल्या. असे अपघात यापुढे होणार नाहीत, याची अतोनात काळजी अर्थातच दोघांनीही घेतली आणि त्यांची कारकीर्द झळाळली.
श्रीनिवासन यांच्या या झळाळत्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा पाचच वर्षांनी आला. १९५८ साली ट्रॉम्बेतील प्लुटोनियम अणुभट्टी उभारण्याचे अवघड काम त्यांच्यावर सोपवण्यात आले. मार्गदर्शनाला ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ होमी सेठना होते, पण किरणोत्सारी प्रकल्प उभारणीत कोणकोणत्या काळज्या घ्याव्या लागतील, याचे अचूक गणन करून त्याप्रमाणे काम चोख करण्याचे श्रेय श्रीनिवासन यांचे होते. किरणोत्साररहित द्रव्ये विलग करण्याच्या सुविधेसह ‘प्रोजेक्ट फिनिक्स’ १९६४ साली सुरू झाला. पण श्रीनिवासन यांना या पाच वर्षांच्या अनुभवाने इतके शिकवले की, तारापुरात हेच काम ते १८ महिन्यांत करू शकले!
याच तारापुरात, श्रीनिवासन यांनी अणुभट्टय़ांच्या सुरक्षेसाठी काही मानके तयार केली आणि तीही पूर्णत: भारतीय संदर्भाचा विचार करून. अशा बुद्धिमत्तेमुळेच भारतातील ३३५ छोटे-मोठे प्रकल्प सुरक्षित असतात आणि भट्टय़ांतील अपघात तथाकथित प्रगत देशांतच होतात. अणुस्फोटाच्या चाचण्यांनाही तीव्र विरोध आणि केवळ अणुऊर्जेचाच पुरस्कार करणाऱ्या श्रीनिवासन यांच्या कार्याचे फळ त्यांना कल्पक्कमचे पहिले प्रकल्प संचालक या पदातून मिळालेच, पण २००१ साली ‘पद्मभूषण’ किताब आणि २००९ साली पंतप्रधानांच्या हस्ते अणुऊर्जा विभागाचा कारकीर्द गौरव पुरस्कारही मिळाला.

Story img Loader