संख्यात्मक सिनेमानिर्मितीत जगभरात अव्वल स्थान असल्याचा वाईट परिणाम म्हणजे सिनेचाहतेपणाचीही अव्वल अवस्था असल्याचा फुकाचा भ्रम आपल्या भारतीय मनांवर सातत्याने राज्य करत असतो. त्यामुळे नायकापुढे धावण्याचे कार्य करणाऱ्या दीड दमडीच्या अभिनयशून्य कलावतींना ‘बॉलीवूड क्वीन’ किताब बहाल होतात. चारित्र्याच्या नावाने बोंब असणारे नरपुंगव सेलिब्रेटी म्हणून ‘हीरो’ किंवा देव बनतात. त्यांची जगाच्या सिनेक्षेत्राने जराशी दखल घेतली की ती अभिमानाची राष्ट्रीय बाब होते. फ्रान्समध्ये होणाऱ्या कान महोत्सवातील कॅटवॉककर्ती ऐश्वर्या रॉय ते बॉलीवूड पऱ्यांच्या माध्यमांतील छब्या यादेखील अशाच राष्ट्रीय अभिमानाच्या बाबी होतात. बाकी या चित्रपंढरीमध्ये भारताने गेल्या काही वर्षांत किती चित्रपटांना आंतरराष्ट्रीय वितरक मिळविले, किती चित्रपटांची या महोत्सवात दखल घेतली गेली याची जराही माहिती आपल्या अव्वल चित्रोत्पादक राष्ट्राला गरजेची वाटत नाही. कान चित्रपटामधील सर्वोच्च समजला जाणारा ‘पाम द ऑर’ पुरस्कार यंदा तुर्कस्तानी दिग्दर्शक नूरी बिल्ग जेलान यांना मिळाला. गेल्या दशकभरात त्यांच्या सिनेमाला ‘कान’मध्येच मिळालेला हा पाचवा  पुरस्कार आहे.
तुर्कस्तानमध्ये गेल्या वर्षी पुरातन वृक्षतोडीवरून झालेले राष्ट्रव्यापी आंदोलन, त्यातून उफाळलेल्या सरकारविरोधाची खदखदती पाश्र्वभूमी यांच्या अवतीभवती सिनेमा निर्मितीतून दीड-दोन तासांचे तुर्की प्रतिविश्व तयार करणाऱ्या या दिग्दर्शकाने रविवारी पुरस्कार स्वीकारताना, तो आंदोलनात शहीद झालेल्या तरुणांना अर्पण करून एक प्रकारे संपूर्ण तुर्कस्तानलाच अभिमानास्पद वाटावे असे कार्य केले आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांच्या उझाक, क्लायमेट्स, थ्री मंकीज, वन्स अपॉन ए टाइम इन अ‍ॅण्टोलिया या चित्रपटांनी कान गाजविले होते. यंदा विंटर स्लीप या चित्रपटासाठी सर्वोच्च पुरस्कार मिळवून त्यांनी कानमधील यशसातत्याचा विस्तार केला. इस्तंबूलमध्ये जन्मलेल्या आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग शिकलेल्या जेलान यांनी पंधराव्या वर्षांपासून फोटोग्राफीचा छंद वाढवत नेला. पॉकेटमनी मिळविण्यासाठी प्रसंगी पासपोर्ट फोटो काढून देण्याचा उद्योगही केला. सिनेनिर्मितीमध्ये उतरल्यानंतर पात्रांच्या मानसिक द्वंद्वाच्या त्यांच्या चित्रकथा जगभरच्या फेस्टिवल वर्तुळांतून गाजत गेल्या. जगभरातील चित्रकथांमधील मानवी भाव-भावना चिरंतन असल्या, तरी त्यांच्या चित्रपटांचे एका वाक्यात वर्णन करताना, ‘आधुनिक तुर्कस्तानचे एचडी कॅमेऱ्याने केलेले आधुनिक चित्रण’, असे करता येईल. गेल्या तीन दशकांत तुर्की सिनेमाने जगात परवाइतका मोठा सन्मान मिळविला नाही म्हणूनही अन् दक्षिण कोरियाई, हाँगकाँगच्या चित्रपटांचे कानवरील वाढते प्रस्थ जेलान यांच्या चित्रपटाने मोडीत काढल्यामुळेही त्यांचे यश केवळ तुर्की जनतेलाच नाही तर जगातील सिनेप्रेमींसाठी मोठे आहे.

Story img Loader