सुपरस्टार रजनीकांत हे ट्विटरवर आले की ट्विटर रजनीकांत यांना ‘फॉलो’ करू लागले हे निश्चित सांगता येणे कठीण आहे! एक मात्र खरे की रजनीकांत यांचे ट्विटरवरील खाते ही अनेकांसाठी गेल्या दहा हजार वर्षांत झाली नव्हती इतकी महत्त्वाची घटना वाटत आहे. आणि यात कोणताही ‘रजनीविनोद’ नाही!
रजनीकांत यांनी खाते खोलताच त्यावर शब्दश: लाखोंच्या उडय़ा पडल्या. त्याच्या या अनुयायांमध्ये सर्वसामान्य महाजालकर तर आहेतच, परंतु नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्यासारखी मातब्बर मंडळीही आहेत. या मंडळींनाही रजनीकांतचे अनुयायी बनण्याचा मोह व्हावा, असे हे नेमके काय प्रकरण आहे याबाबत अनेकांची अनेक मते आहेत. पण त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग हाच आहे, की लोकप्रियतेच्या बाबतीत आज रजनीकांत यांचा हात धरू शकेल असा एकही अभिनेता भारतातच काय जगातही नाही.
एकाच वेळी लोकांच्या प्रेमाचा आणि विनोदाचा विषय असणारा हा अभिनेता मूळचा मराठी असणे, त्याच्या सौंदर्या या मुलीचे पाळण्यातले नाव चक्क सखुबाई असे मराठमोळे आणि आजच्या मराठी घरांतही न आढळणारे असे असणे ही महाराष्ट्रासाठी आणखी एक उगाचच अभिमानाची बाब. बंगळुरातल्या एका मराठी घरात जन्मलेला हा शिवाजीराव गायकवाड हा खरा तिथल्या कामगार रंगभूमीवरला नट. पालिकेच्या बससेवेत कंडक्टर म्हणून काम करता करता तो रंगमंचावरही उमेदवारी करीत होता. तसा तो भडक अभिनय आणि अफलातून अदांबद्दलच प्रसिद्ध. परंतु तो मूळचा नाटकातला. घडण्याच्या काळात रंगभूमीवरच अभिनयाची पुस्ती त्याने गिरविली असल्यानेच पुढे चित्रपटांतील आचरटपणालाही तो गांभीर्याचे अधिष्ठान देऊ शकला. उच्चभ्रू चित्रवर्तुळात त्याच्या चित्रपटांकडे ‘मास’चा मामला म्हणून नाकेही मुरडण्याची रीत आहे. अर्थात त्याची पर्वा त्यानेही कधी केली नाही आणि त्याच्या चाहत्यांच्या तर हे खिजगणतीतही नाही.
रजनीकांतचा चित्रपट म्हणजे रंजनाची संपूर्ण हमी. एवढेच त्याच्या चाहत्यांना पुरते. २००७ मध्ये त्याच्या ‘शिवाजी- द बॉस’ या चित्रपटाने आतापर्यंतचे तिकीटबारीवरील सगळे विक्रम पार करून त्याला जॅकी चॅननंतरचा आशियातला सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार हा किताब मिळवून दिला. हे रजनीकांतचे यश. त्याचा नेमका अर्थ काय, हे खरे तर समाजशास्त्रीय कोडेच आहे. भारतात क्रिश वगैरे सुपरहीरो अलीकडे आले. त्याआधी हा जिताजागता सुपरहीरो येथे राज्य करीत होता, हे लक्षात घेतले की त्याच्या लोकप्रियतेचा किंचित अन्वय लावता येतो.
रजनीकांत
सुपरस्टार रजनीकांत हे ट्विटरवर आले की ट्विटर रजनीकांत यांना ‘फॉलो’ करू लागले हे निश्चित सांगता येणे कठीण आहे!
First published on: 08-05-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personality observation rajinikanth