सामाजिक गरज आणि शिक्षण यांची सांगड कशी घालायची, या प्रश्नाने आज शिक्षण व्यवस्था पछाडलेली आहे. पन्नासच्या दशकात मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीला विरोध करत समाज आणि शिक्षणाची सांगड घालणाऱ्या शिक्षण व्यवस्थेची संकल्पना एका २६ वर्षांच्या तरुणाने मांडली आणि ती प्रत्यक्षातही उतरवली. तो तरुण म्हणजे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील.
प्राचार्य पाटील यांचे कार्य हे फक्त ‘संस्थाचालक’ या बिरुदापुरते कधीच राहिले नाही. सांगली जिल्ह्य़ातील चिकुर्डे हे प्राचार्य पाटील यांचे जन्मगाव. विद्यार्थीदशेपासूनच सेवादलाच्या कार्यात त्यांचा सहभाग होता. अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. जे. पी. नाईक यांच्याबरोबर प्राचार्य पाटील यांनी काम सुरू केले. त्या वेळी डॉ. नाईक यांनी अनौपचारिक शिक्षणाची संकल्पना मांडून ‘मौनी’ विद्यापीठ सुरू केले होते. मौनी विद्यापीठाचे काम करत असतानाच एकीकडे प्राचार्याच्या स्वप्नातील शाळेची संकल्पना मनात साकारत होती आणि म्हणूनच पन्नासच्या दशकात तब्बल दोन हजार रुपये महिना वेतन मिळणारी केंद्र शासनाची नोकरी नाकारण्याचे धाडस प्राचार्यानी दाखवले. डॉ. नाईक यांच्या प्रेरणेने लंडन येथे जाऊन ‘कम्युनिटी डेव्हलपमेंट’चा अभ्यास त्यांनी केला.
रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनचे फक्त नावच नाही, तर आनंददायी शिक्षणाची रुजवात १९५८ साली नवभारत शिक्षण मंडळाच्या स्थापनेतून त्यांनी केली आणि अनौपचारिक शिक्षणाची ‘शांतिनिकेतन’ ही राज्यातील पहिली निवासी शाळा उभी राहिली. गृहमंत्री आर. आर. पाटील हे याच शाळेचे एक विद्यार्थी! अनेक दिग्गजांना प्राचार्य पाटील यांनी घडविले. ‘शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजातील सर्व घटकांचा विकास होऊ शकतो. खरे शिक्षण हे पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडचेच आहे,’ या विचारावर आधारित काम, शिक्षण यांची सांगड घालणाऱ्या शिक्षण व्यवस्थेची ओळख प्राचार्यानीच करून दिली. उत्तम वक्ता ही त्यांची अजून एक ओळख! कराड येथील साहित्य संमेलनात नरसिंह राव यांच्या उपस्थितीत झालेल्या प्राचार्य पाटील यांच्या भाषणाची आठवण अजूनही अनेक साहित्यप्रेमी सांगतात. ग्रामस्वराज्याची संकल्पना अमलात आणण्यासाठी पंचायतराज व्यवस्थेचे बळकटीकरण, समाजशिक्षण यांचे मूळ राज्यात प्राचार्यानीच रुजवले.
त्यांनी मांडलेल्या संकल्पना, सिद्धांत, जाती व्यवस्थेवरील वक्तव्य यांमुळे अनेकदा ते वादग्रस्तही ठरले, मात्र त्या वादांमध्ये अडकून त्यांचे काम कधीही थंडावले नाही. राजकारणामध्येही ते सक्रिय होते. राजकारण आणि समाजकारण यांची सांगड प्राचार्य पाटील यांच्या कार्यातून दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा