मुंबई किंवा केंब्रिज या दोन्ही ठिकाणच्या अनेक विद्यार्थ्यांना नीरज हातेकर माहीत आहेत, ते अर्थशास्त्रातील तांत्रिक उपविषय शिकवताना केवळ अर्थशास्त्रीयच नव्हे, तर सामाजिक भान देणारे प्राध्यापक म्हणून. हा उपविषय म्हणजे इकॉनोमेट्रिक्स किंवा अर्थसांख्यिकीय शास्त्रे, गणित, सांख्यिकीशास्त्र किंवा स्टॅटिस्टिक्स आणि हल्ली संगणकशास्त्र किंवा कॉम्प्युटिंग यांचा समावेश या विषयांत होतो. संख्या आणि त्यावर आधारित गणनाचा उपयोग आणि उपयोजन करणे, हाच हेतू असलेली ही अभ्यासशाखा अर्थशास्त्रासाठी उपयुक्त आहे खरी; पण अर्थशास्त्र कशासाठी उपयुक्त आहे? अर्थात समाजासाठीच. अशी हेतुशुद्धता फार कमी जणांमध्ये असते, त्या थोडय़ांपैकी एक म्हणजे नीरज हातेकर.
आंतरशाखीय अभ्यासाच्या हेतुपूर्णतेचे भान हातेकर सदैव शाबूत ठेवतात, याची कल्पना असल्यामुळेच नेदरलँड्समध्ये (हॉलंड) तेथील नव-मध्यमवर्ग नेमका कसा आहे, याचा अभ्यास धोरण-आखणीसाठी करणाऱ्या अभ्यासगटाने हातेकर यांचे सदस्यत्व महत्त्वाचे मानले आणि मुंबईच्या गरीब वस्त्यांत, झोपडपट्टय़ांत राहणाऱ्या कुटुंबांतील मुलांमध्येही कुपोषणाची जीवघेणी समस्या कशी पसरते, याचा अभ्यास हातेकर यांनी केला, त्यातून पुढे कॅनडातील भारतीयांच्या एका संस्थेला या विषयाकडे पाहावेसे वाटले. सामाजिक शास्त्रांचा संबंध जित्याजागत्या समाजाशी असतो आणि त्या समाजाच्या समस्यांबद्दल, बुद्धिवंतांची चर्चा जरी निराळ्या शब्दांत, अगदी परिभाषेत आणि सामान्यजनांना कळेनाशीच असली तरी ती चर्चा वाझोंटी नसायलाच हवी, हे भान असल्यामुळे हातेकर सतत लिहिते राहिले. अनेक विषयांसाठी ज्या-ज्या विद्यार्थ्यांची मदत झाली, त्यांनाही श्रेय देत राहिले आणि त्यातूनच अंबरीश डोंगरे यांच्यासारखे आज अर्थशास्त्रज्ञ म्हणून स्थिरस्थावर झालेले अनेक विद्यार्थी गेल्या दशकभराहून अधिक काळात घडू शकले. विद्वत्-चर्चित नियतकालिकांत (‘पिअर रिव्ह्य़ूड जर्नल्स’मध्ये), ‘ईपीडब्लू’सारख्या साप्ताहिकांत आणि ‘समाज प्रबोधन पत्रिका’, ‘अर्थविज्ञान वर्धिनी’चे नियतकालिक अशा ठिकाणी मराठीत ते लिहितात. ही ‘अभ्यासकीय बौद्धिक अभिव्यक्ती’ म्हणजे काय, याचा अर्थ ज्यांच्याकडे पाहून कळावा अशांपैकी ते आहे, याची साक्ष त्यांच्या या लिखाणातून मिळत राहते.
अभ्यासकाला साजेसा सत्यान्वेषीपणा हा गुण हातेकर यांच्यात पूर्वीपासून होता. पटकावलेली सत्तापदे भोगणाऱ्यांबद्दल हातेकरांनी काही उद्गार काढले .  त्याची बक्षिसी म्हणून सत्ताधीशांनी हातेकरांनाच पेचात पकडण्याचा प्रयत्न चालविला आहे, परंतु महाराष्ट्रातील बुद्धिवंत खरेपणाला पाठिंबा देतात- सत्तेला नव्हे, हे उभारी देणारे दृश्य हातेकरांपुढील त्या पेचामुळेच तर दिसू लागले आहे!

Story img Loader