नोकियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन एलोप यांनी कंपनीच्या मायक्रोसॉफ्टमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा सोडली. त्यांची जागा कोण घेणार, यावर अनेक कयास बांधले जात होते. परंतु अपेक्षेप्रमाणेच, भारतीय वंशाचे राजीव सुरी यांच्याकडे ही धुरा सोपविण्यात आली. सन २००९ पासून सुरी हे नोकिया सोल्युशन आणि नेटवर्क विभागाचे प्रमुख होते. ४६ वर्षीय सुरी आणि मायक्रोसॉफ्टचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला हे दोघेही मणिपाल तंत्र संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. सुरी यांचा जन्म सन १९६७ मध्ये भारतात झाला. असे असले तरी त्यांचे बहुतांश बालपण कुवेतमध्ये गेले. पदवी शिक्षणासाठी मात्र भारतात राहून, मणिपाल तंत्र संस्थेतून त्यांनी सन १९८९ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या शाखेतून अभियांत्रिकी पदवी मिळवली.
सुरी यांनी सन १९९५ मध्ये नोकियात रुजू होण्यापूर्वी आयसीएल (इंडिया), नायजेरिया येथे आरपीजी आणि चर्चगेट समूहामध्ये नोकरी केली. नोकियामध्ये सुरुवातीला त्यांनी नोकिया-सीमेन्स नेटवर्कच्या व्यावसायिक विभागात काम करणाऱ्या सुरी यांनी पुढल्या १२ वर्षांत व्यवसाय वृद्धी, विपणन, विक्री अशा विविध विभागांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. एप्रिल ते ऑक्टोबर २००७ या कालावधीत नोकियाचे आशिया पॅसिफिक ऑपरेशन विभागाचे, तर पुढे नोकियाच्या सेवा विभागाचे प्रमुख म्हणून काम करताना भारतात नोकियाचे मोठे सेवा केंद्र सुरू व्हावे यासाठी कंपनीला प्रवृत्त केले, ते सुरींनीच. भारत, कुवेत, फिनलंड, ब्रिटन, नायजेरिया, जर्मनी आणि सिंगापूर या देशांमध्ये त्यांनी काम केले आहे. सुरी हे सध्या फिनलंडच्या हेलसिंकी या राजधानीत राहतात. त्यांच्या पत्नी उद्योजक आहेत, तर मोठा मुलगा बोस्टन येथील संगीत शाळेत संगीताचे धडे घेत आहे. स्वत: राजीव यांनाही संगीताची आवड आहे, पण व्यायामशाळेत जाऊन तंदुरुस्ती टिकवण्याच्या छंदात त्यांचा अधिक वेळ जातो.
‘या पदाची धुरा स्वीकारणार का, हे विचारणेच माझ्यासाठी खूप सन्मानाचे आहे. भविष्यात माझ्यासमोर काम करण्याच्या अनेक संधी मिळणार असून नोकियाच्या संपूर्ण संघाला सोबत घेऊन काम करणे मला अधिक आवडेल,’ अशा ऋ जू शब्दांनिशी त्यांनी पद स्वीकारले आहे. सुरी यांच्यातील कामाचा उत्साह आणि त्यांची भविष्यवेधी निर्णयनीती ही व्यवसायवृद्धीस कारणीभूत ठरेल असे सर्वाना वाटत आहे. सुरी यांच्या याच धोरणांमुळे कंपनीला बाजारात आपले नाव पुन्हा प्रस्थापित करता आले. ते सांभाळत होते तो विभाग कंपनीच्या एकूण नफ्यातील अर्धा हिस्सा मिळवून देत होता. यामुळेच विश्वासाने त्यांच्याकडे नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा