एक तुतारी द्या मज आणुनि, फुंकीन मी ती स्वप्राणाने, भेदून टाकिन सगळी गगने.. हे शब्द जगण्यासाठी आतुरलेला शिवा घुगे शनिवारी अचानक काळाच्या पडद्याआड गेला. शिवा खूप वर्षांपासून अनेक व्याधींशी झगडत होता. त्याच्या झगडण्याला असीम जिद्दीची साथ होती. तो पराभूत होईल असं त्यामुळेच कधी वाटलं नव्हतं. किंबहुना, असंख्य आजारांशी सामना करत त्यांना परतवून लावण्याच्या खेळाची जणू त्यालाच चटक लागली होती. हॉस्पिटलात होतो. आत्ताच घरी आलोय, दुपारी भेटू या का, असं फोनवरून विचारत ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी आपली वाट पाहात रेंगाळणारा शिवा, पाठीवर लॅपटॉपचं ओझं वागवत, हातातल्या काठीच्या आधारानं हळुवार पावलं टाकत कधी तरी अचानक, अनपेक्षितपणे समोर येऊन उभा ठाकणारा शिवा, आणि गप्पांना सुरुवात करतानाच आपल्या मनातली सारी स्वप्नं डोळ्यांतून आणि शब्दांतून सुंदरपणे समोर उघडी करणारा शिवा मुंबईच्या मराठी पत्रकारांपकी अनेकांनी अनुभवला असेल.. हाती घेतलेलं काम पूर्ण होईपर्यंत प्रकृतीच्या कोणत्याही तक्रारीला भीक न घालता केवळ कामाच्या मागे धावताना शिवाला अनेकदा अपघातांचा सामना करावा लागला. आपले सारे शरीर अपघातप्रवण झाले आहे, असं सागताना त्याच्या डोळ्यांत, समोरच्याच्या मनाला थरकापवणारा विनोद सहजपणे चमकायचा. मराठी साहित्यक्षेत्रात अक्षरश: वाघाच्या हिमतीनं झेप घेणाऱ्या या स्वप्नाळू तरुणानं समकालीन संस्कृती नावाचं मासिक आणि पाठोपाठ प्रभात प्रकाशन नावाची प्रकाशन संस्था सुरू केली आणि हाती असलेल्या तुटपुंज्या पुंजीची तमा न बाळगता या संस्थेला प्रतिष्ठेची झळाळी दिली. आपल्या जुन्या मारुती व्हॅनमध्ये पुस्तके भरून गावोगावी पुस्तक जत्रा भरवून वाचनसंस्कृतीला बहर देण्याचे स्वप्न त्याच्या डोळ्यांत सदैव तरळताना दिसायचे. इंटरनेटच्या जाळ्यात गुरफटलेल्या जगाला साहित्यविश्वाची वेगळी ओळख देण्याचा ध्यास शिवा घुगे याने घेतला आणि बुकबझार डॉट कॉम नावाची वेबसाइटही सुरू केली. सीडीवरील दिवाळी अंकाचा धाडसी प्रयोगही शिवानेच केला, आणि हा दिवाळी अंक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तो स्वत: दारोदारी फिरला.. साहित्य आणि लोककलांपासून दुरावत चाललेल्या नव्या पिढीला इंटरनेटच्या माध्यमातून संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी व्हिडीओ मॅगझिन नावाचा एक आगळा प्रयोग करताना शिवा घुगेने आपल्या साऱ्या शारीरिक तक्रारी जणू बासनात गुंडाळून ठेवल्या, आणि त्यावर या ध्यासाचे वेष्टन चढविले. कोणत्याही कुरबुरीविना या ध्यासासाठी रात्री बेरात्रीदेखील ठरलेल्या ठिकाणी पोहोचून काम पूर्ण करण्याच्या सवयीतून शिवाच्या तुतारी या व्हिडीओ मॅगझिनचे काही अंक रसिकांपर्यंत पोहोचले. आपल्या लॅपटॉपवरील व्हिडीओ मॅगझिन समोरच्या व्यक्तीला दाखविताना शिवाचे डोळे त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर खिळलेले असत. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटणारी प्रतिक्रियेची प्रत्येक रेषा शिवाच्या डोळ्यात उमेदीची नवी चमक उमटवून जाताना अनेकांनी पाहिली असेल. या उमेदीमुळेच शिवाला जगण्याची जिद्द मिळाली आणि काही तरी वेगळं करून दाखविण्याची ऊर्जाही मिळाली. या ऊर्जेने शिवाच्या अध्र्यामुध्र्या जगण्याच्या प्रत्येक क्षणाचे सोने केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा