टेनिसमध्ये कारकीर्द करणाऱ्या खेळाडूंना ग्रँड स्लॅम स्पर्धाचे विजेतेपद खुणावत असते. भारताचा लिअँडर पेस याने ऑलिम्पिक स्पर्धेत मिळविलेल्या कांस्यपदकाचा अपवाद वगळता अन्य एकाही भारतीय खेळाडूस एकेरीत अव्वल दर्जाचे यश मिळविता आलेले नाही. अर्थात, भारतीय खेळाडूंनीही ग्रँड स्लॅम स्पर्धासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धामध्ये आपल्या आश्चर्यजनक शैलीचा प्रत्यय घडविला आहे. प्रेमजित लाल, रामनाथ कृष्णन, आनंद व विजय अमृतराज बंधू, शशी मेनन, रमेश कृष्णन यांनी अनेक मातब्बर खेळाडूंवर मात करण्याची किमया घडविली होती. डेव्हिस चषक स्पर्धेसारख्या सांघिक स्पर्धेतही भारताने फ्रान्स, चेक प्रजासत्ताक आदी बलाढय़ संघांना पराभवाची चव चाखावयास दिली आहे. टेनिसमधील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे. युवा खेळाडूंकडून किमयागार कामगिरी घडत असतानाही तिशीकडे झुकलेले किंवा चाळिशीकडे झुकलेले खेळाडूही सनसनाटी कामगिरी करीत असतात. चाळिशीच्या उंबरठय़ावरही पेससारखा अतिशय तंदुरुस्त खेळाडू ग्रँड स्लॅममध्ये दुहेरीचे अजिंक्यपद मिळवितो. पेसला आदर्श मानून खेळणाऱ्या सोमदेव देववर्मन याचीही कामगिरी अशीच ठरली आहे. तिशीच्या उंबरठय़ावर असलेल्या या खेळाडूने कारकिर्दीतील पहिले एटीपी विजेतेपद नुकतेच मिळविले. त्यापेक्षाही त्याने दुबई येथील स्पर्धेत अर्जेन्टिनाच्या जुआन मार्टिन डेलपोत्रो या खेळाडूवर मिळविलेला विजय अधिक मोलाचा ठरला आहे. आजपर्यंत सोमदेवला जागतिक क्रमवारीतील पहिल्या पाच मानांकित खेळाडूंवर कधीही विजय मिळविता आला नव्हता. डेलपोत्रो हा जागतिक क्रमवारीतील पाचवा मानांकित खेळाडू आहे. त्याच्यावर मात करीत सोमदेवने खळबळ उडविली. या सामन्यात पहिला सेट सोमदेवने टायब्रेकरद्वारा घेतल्यानंतर हात दुखावल्यामुळे डेलपोत्रो याने सामन्यातून माघार घेतली. सोमदेवला हा काहीसा नशिबाच्या जोरावर विजय मिळाला अशीही टीका होईल आणि त्याचे आव्हान आता संपुष्टात आल्यानेच जणू या टीकेवर शिक्कामोर्तब होईल. तथापि पहिल्या सेटमध्ये त्याने एकही सव्‍‌र्हिसगेम न गमावता, अतिशय जिगरबाज खेळ करीत हा सेट टायब्रेकपर्यंत नेला. डेलपोत्रोची सव्‍‌र्हिस ब्रेक करण्यात यश मिळविले. या सेटमध्ये सोमदेवनेच वर्चस्व गाजविले. या सेटमधील त्याचा खेळ पाहून डेलपोत्रोदेखील अवाक झाला होता. अमेरिकेतच जास्त काळ असणाऱ्या सोमदेवला तेथील स्पर्धा व प्रशिक्षणाचा फायदा झाला आहे. फोरहँडचे क्रॉसकोर्ट फटके, बेसलाइन व्हॉलीज, नेटजवळून प्लेसिंग आदी शैलीमध्ये सोमदेव हा अव्वल दर्जाचा खेळाडू मानला जातो. पेसप्रमाणेच त्यानेही आणखी पाच-सहा वर्षे कारकीर्द सुरू ठेवली तर निश्चितच भारतास टेनिसमध्ये आणखी एक ऑलिम्पिक पदक मिळू शकेल.

Story img Loader