‘सदमा’ गाजला, तर ‘और एक प्रेम कहानी’ आपटला. हिंदी चित्रपटांच्या प्रेक्षकांना बालू महेन्द्र यांची ओळख ही एवढीच. पण हिंदीच्या पलीकडेही प्रादेशिक भाषांचे चित्रपटविश्व आहे आणि दाक्षिणात्य चित्रपटक्षेत्र तर तांत्रिक आणि कलात्मक बाबींत हिंदीहून कांकणभर सरसच होते, हे आपण विसरतो. या दाक्षिणात्य चित्रपटक्षेत्रावर ठसा उमटवणाऱ्यांपैकी बालू महेन्द्र होते. चारदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे दिग्दर्शक आणि छायालेखक (सिनेमॅटोग्राफर) अशी त्यांची ओळख त्यांच्या निधनानंतरही कायम राहणारी आहे. ‘सदमा’ची कथा, पटकथा त्यांची होती आणि श्रीदेवी- कमल हासन- सिल्क स्मिताच्या भूमिका असलेला हा चित्रपट ज्यावरून बनला, त्या ‘मूंदरम पिरै’ या चित्रपटासाठी पटकथालेखक आणि छायालेखक अशा दोन्ही जबाबदाऱ्या महेन्द्र यांनीच निभावल्या होत्या. त्यांचे अनेक चित्रपट प्रेमाच्या त्रिकोणात फिरत राहिले खरे, पण या त्रिकोणांना अनेकदा नैतिक प्रश्नांची डूब असे. ‘मूंदरम्..’, ‘वण्ण वण्ण पूकळ’ किंवा ‘ओलंगळ’ या चित्रपटांच्या कथा म्हणजे अशा – प्रेमाच्या पलीकडे जाणाऱ्या विषमभुज नैतिक वर्तनाची उदाहरणे.
श्रीलंकेत १९३९ साली जन्मलेले ‘बेंजामिन महेन्द्र’ पुढे बालू म्हणून मद्रासमध्ये आले. लहानपणीच कॅमेऱ्याचे वेड आणि पुढे लागलेला फोटोग्राफीचा छंद यांना योग्य वळण देऊन त्यांनी पुण्याच्या ‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’त छायालेखनाचे शिक्षण घेतले. १९७०च्या दशकात (विशेषत: या इन्स्टिटय़ूटच्या विद्यार्थ्यांत) आलेल्या ‘आर्ट फिल्म’च्या लाटेत बालू महेन्द्र फारसे वाहून गेले नाहीत, हे त्यांच्या नंतरच्या चित्रपटांनी सिद्धच केले. अडूर गोपालकृष्णन यांच्यासारखे विराटकथ्य आपल्या सिनेमाने सांगावे, असे महेन्द्र यांना कधी वाटलेही नसावे. त्यांची वाट वेगळी होती.. छोटय़ाशा – दोघातिघाच पात्रांच्या गोष्टींतून प्रेक्षकाला प्रश्नांचे समुद्र दाखवून, त्या प्रश्नांचे एक साधेसे उत्तरही देऊन टाकणारे सिनेमे त्यांनी केले. ही धाटणी, अगदी १९७७ साली त्यांनी दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच ‘कोकिला’ या चित्रपटातूनही दिसली होती.
२५ चित्रपटांचे दिग्दर्शन, १४ चित्रपटांचे छायालेखन असे कार्य असणाऱ्या सातत्यशील महेन्द्र यांनी १९९६ ते २०१३ असा दीर्घ विराम घेतला. त्या काळात त्यांनी ‘कथै नेरम’ ही लघुकथांची तमिळ चित्रवाणी-मालिका दिग्दर्शित केली. ती इतकी गाजली की त्या कथांची पुस्तके निघाली! मग ‘तलाइमुरैगळ’ या चित्रपटात गेल्याच वर्षी दिग्दर्शन आणि छायालेखनासह आजोबाची प्रमुख भूमिकाही महेन्द्र यांनी केली. गोष्ट सांगणारा दिग्दर्शक, हा त्यांचा लौकिक या सिनेमाने कायम ठेवलाच, पण ही गोष्ट आता कुठे एक पिढी ओलांडत असताना, हृदयविकाराच्या झटक्याने ती संपली.
बालू महेन्द्र
‘सदमा’ गाजला, तर ‘और एक प्रेम कहानी’ आपटला. हिंदी चित्रपटांच्या प्रेक्षकांना बालू महेन्द्र यांची ओळख ही एवढीच.
First published on: 14-02-2014 at 01:12 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personality veteran director balu mahendra