‘प्रिट्झ्कर आर्किटेक्चर प्राइझ’ हा वास्तुरचनाकारांसाठीचा जागतिक पातळीवरील सर्वाधिक प्रतिष्ठेचा सन्मान दरवर्षी कुणा ना कुणा प्रख्यात आर्किटेक्टला मिळतोच. पण यंदाचे मानकरी शिगेरू बान हे या पुरस्काराच्या आजवरच्या एकंदर ३७ आणि त्यांपैकी सात जपानी विजेत्यांपेक्षा निराळे ठरतात, ते त्यांनी केलेल्या पुठ्ठय़ाच्या वास्तुरचनांमुळे! कागद व प्लास्टिकपासून बनवण्यात येणाऱ्या टिकाऊ आणि मजबूत पुठ्ठय़ाच्या पोकळ नळकांडय़ांचा वापर, हे शिगेरू बान यांचे वैशिष्टय़. बान जपानमध्ये (टोकिओत) जन्मले, तेथे घरांतल्या भिंतींसाठी लाकूड व कागद यांच्या मिश्रणातून बनवलेला पुठ्ठा वपरण्याची प्रथा होतीच. तिचे पुनरुज्जीवन भव्य, भार पेलणाऱ्या वास्तुरचनांसाठी बान यांनी केले. 

दक्षिण कॅलिफोर्निया वास्तुरचना संस्थेतून पदवी घेऊन शिगेरू बान यांनी ‘कूपर युनियन्स स्कूल ऑफ आर्किटेक्चर’मध्ये उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेतला. ज्या ‘न्यूयॉर्क फाइव्ह’ गटातील पाच वास्तुरचनाकारांनी पुढे नागरी पर्यावरणाचे महत्त्व मांडले, त्यापैकी जॉन हैडक हे मूळचे चेक वास्तुरचनाकार बान यांचे ‘कूपर’मधील गुरू. हैडक यांनी ‘काव्यमय कमानकले’चे महत्त्व बान यांच्यावर ठसवले. मात्र चेक-अमेरिकी गुरूंना अभिप्रेत असलेल्या चेक काव्यातील संकल्पनात्मक अवकाश निराळा आणि आपला आशियाई-जपानी अवकाश निराळा, हे बान यांना लवकरच समजले असावे.. कारण बान यांच्या वास्तुरचनांतील अवकाश हा जपानी काव्यासारखा काटकसरी, साधासरळ, अनलंकृत; परंतु भोक्त्याला स्वत:चे भान देणारा आहे. त्याहीपेक्षा, पुठ्ठय़ासारख्या नव्या, हलक्या आणि स्वस्त साधनाच्या उपयोजनामुळे शिगेरू बान यांना स्वत:च्या वास्तुकला-संकल्पनांशी तडजोड न करता लोकांसाठी काम करता आले आणि पुढे याच कामाचे ‘मानवतावादी वास्तुरचना’ म्हणून कौतुक झाले, हे अधिक महत्त्वाचे.
न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरातील भूकंपात, या शहराला ज्यावरून नाव मिळाले ते चर्चच उद्ध्वस्त झाले होते, ते नव्याने बांधताना पुठ्ठय़ाचा वापर करून बान यांनी ७० फूट उंच, ७०० माणसे बसू शकतील असे भव्य चर्च उभारले. या रचनेचा उल्लेख ‘प्रिट्झ्कर प्राइझ’च्या निवडमंडळाने आवर्जून केला आहे, पण भूकंपग्रस्त कोबे शहरातील चर्च, आफ्रिकेत- रवांडातील निर्वासितांसाठी त्यांनी उभारलेले स्वस्त निवारे, फ्रान्समधील गार्दाँ नदीवरील पूल.. असे पुठ्ठय़ाचे वास्तुप्रकार त्यांनी हाताळले आहेत. अन्य अनेक (पुठ्ठा न वापरता) प्रकल्पही बान यांनी हातावेगळे केले, पण कार्डबोर्ड- पुठ्ठा वापरून त्यांनी उभारलेला वास्तुवारसा अधिक स्मरणीय आहे. तागुचीसारख्या जपानी विचारवंताने मांडलेल्या ‘तुमच्या कामाने समाजाचे नुकसान किती?’ (ते कमीत कमीच आहे ना?) या सततच्या प्रश्नाचे एक उत्तर शिगेरू बान यांच्या रचनांतून प्रत्यक्ष मिळते आहे.

 

Story img Loader