पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सेना दलप्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांना आता काहीही करून आपले अस्तित्व सिद्ध करण्याची घाई झाली आहे. ते पाकिस्तानचे पहिलेच असे प्रमुख असतील, की ज्यांना पद सोडावे लागल्यानंतरही ऐशआरामात राहता येत आहे. अन्यथा अनेकांची हत्या तरी झाली किंवा फाशी तरी दिली गेली. लियाकत अली खान, झुल्फिकार अली भुट्टो, झिया उल हक, बेनझीर भुट्टो अशांच्या वाटय़ाला मुशर्रफ यांच्यासारखे जगणे आले नाही. सतत काही ना काही वाद उकरून काढून आपण झोतात राहायला हवे, असे या महाशयांना वाटत असते. त्यामुळे कारगिल युद्धात पाकिस्तानच्या सैन्याने भारताची मुंडीच आवळली होती, यासारख्या त्यांच्या वक्तव्याकडे जग फारशा गांभीर्याने पाहत नाही. वास्तविक त्या वेळच्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांना, नवाज शरीफ यांना, अंधारात ठेवून कारगिल युद्ध करणाऱ्या मुशर्रफ यांना आपण हे सारे कशासाठी करत आहोत, याची पक्की जाणीव होती. या युद्धातील पराभवानंतर शरीफ यांनी त्यांची हकालपट्टी केली म्हणून त्यांनी शरीफ यांचीच उचलबांगडी करत सर्वसत्ताधीश होण्याचा मार्ग पत्करला. भारताशी असलेले वितुष्ट हा पाकिस्तानमधील सगळ्या सत्ताधाऱ्यांसाठी हुकमी एक्का असतो. ज्या देशाला अमेरिका आणि चीनच्या मदतीशिवाय काहीच करता येत नाही, त्या देशातील स्वाभिमान जागा ठेवण्यासाठी सतत भारतावर दुगाण्या झाडणे, एवढाच मार्ग तेथील सत्ताधाऱ्यांच्या हाती असतो. सिंधमधील हल्ले असोत किंवा पेशावरमधील, त्याला भारतच कसा जबाबदार आहे, हे सांगण्यात मुशर्रफ यांच्यासह सगळे नेते आपली शक्ती खर्च करीत असतात. कारगिल युद्धाबाबतची सगळी कागदपत्रे अद्यापही उघड करण्यात आलेली नाहीत. त्या काळात प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या अनेकांनी आपल्या ज्या आठवणी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केल्या आहेत, त्यातून जे सत्य बाहेर येते, ते मुशर्रफ यांच्या विधानाशी अजिबात सुसंगत नाही. ‘हम भी वहाँ मौजूद थे’ हे पाकिस्तानाचे माजी मंत्री अब्दुल माजिद मलिक यांचे पुस्तकही याची साक्ष देते. कारगिल युद्धाबद्दल मुशर्रफ यांनी जनरल अश्फाक कयानी यांना अंधारात ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चीनमधून दूरध्वनीने मुशर्रफ यांनी सेना दलप्रमुखांना कारगिल युद्धाबाबत सूचना दिल्या होत्या, असाही गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. अशा चर्चा दूरध्वनीवरून केल्या जात नसतात, भारताने हा दूरध्वनी संदेश पकडल्यानेच पुढील अनर्थ ओढवला, असे त्यांचे म्हणणे आहे. मुशर्रफ यांना पाकिस्तानात उजळ माथ्याने फिरायचे आहे. तेथील निवडणुकीत साफ झाल्यानंतरही त्यांना पुन्हा सत्तेत येण्याची दिवास्वप्ने पडत आहेत. अशा स्थितीत, आपणच खरे भारतद्वेष्टे हे दाखवण्यासाठी अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई हे भारताच्या बाजूने असल्यानेच आपण त्यांच्याविरोधात कारवाया केल्याचीही कबुली मुशर्रफ यांनी दिली आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान क्रिकेट सामने खेळवण्याचा विषय चर्चेला येत असताना त्यांची अशी बिनबुडाची विधाने अनेक राजकीय अर्थानी भरलेली असू शकतात. कारगिल युद्ध भारत कधीही विसरू शकणार नाही, असे जे मुशर्रफ म्हणतात, ते अगदीच खरे आहे. कारण त्यांना आणि त्यांच्या देशालाही कारगिलमध्ये भारताकडून स्वीकारावा लागलेला पराभव कधीच विसरता येणारा नाही.
मुशर्रफ यांची कसरत
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सेना दलप्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांना आता काहीही करून आपले अस्तित्व सिद्ध करण्याची घाई झाली आहे.
आणखी वाचा
First published on: 20-05-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pervez musharraf has confirmed pak govt role in kargil