‘राज्यातील ५५,००० औषध विक्रेते व्यवसाय गुंडाळून परवाने परत करणार’ ही बातमी (लोकसत्ता, ११ जून ) वाचून असे वाटले की, आजपर्यंत कायदा धाब्यावर बसवून फक्त नफा आणि नफा हे उद्दिष्ट असणारे हे नॉनफार्मासिस्ट (केमिस्ट) लोक खरंच असे करणार का, हा मुळात मोठा प्रश्न आहे. या केमिस्ट संघटनेच्या नेत्यांनी आजपर्यंत संघटनेच्या दबावाखाली कधीच कायद्याची अंमलबजावणी होऊ दिली नाही. पण दोन वर्षांपूर्वी ‘ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट – १९४०’ कायद्याचे कडक पालन सुरू झाले. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी औषधविक्री दुकानात फार्मासिस्ट असावा व फार्मासिस्टशिवाय औषधविक्री करू नये या नियमाचीही अंमलबजावणी करून कारवाईस सुरुवात केली. पण या फार्मासिस्टविना ‘केमिस्ट’दुकान थाटणाऱ्यांनी नफा कमी होणे, औषधविक्री क्षेत्रात एफडीआय आणणे तसेच अन्न व औषध प्रशासन अन्यायपूर्वक व आकसपूर्ण कारवाया करत आहे, अशी कारणे देत बंद पुकारणे, औषधविक्री सेवा खंडित करणे असे प्रकार आरंभले. तसेच आता ठोक औषध विक्रेत्यांनी १ जूनपासून औषध खरेदीच बंद केली आहे आणि १५ जुल रोजी ५५,००० औषध विक्रेते त्यांचे परवाने जमा करणार आहेत.
असे झालेच, तर समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने ही फार महत्त्वाची गोष्ट ठरेल, कारण आजपर्यंत हे नॉनफार्मासिस्ट लोक खरे म्हणजे जनतेच्या आरोग्याशी खेळत आले आहेत. फार्मासिस्टच्या नोंदणीकृत प्रमाणपत्रावर रुग्ण सेवा बाजूला ठेवून फक्त नफा कमावित आले आहेत.
पण आता फार्मासिस्टांना मोठीच व्यवसायसंधी आहे. औषध विक्रेते व ठोक औषध विक्रेते बनण्यासाठी. अन्न व औषध प्रशासन कायदेशीर बाबी पूर्ण असल्यास दोन दिवसांत औषधविक्री व ठोक औषधविक्रीचे परवाने फार्मासिस्टनाच देणार आहे. त्यासाठी कोणत्याही संघटनेच्या ना-हरकत प्रमाणपत्राची गरज नाही तसेच कुठेही अनामत रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. परवाना काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे व संपूर्ण प्रक्रिया www.fda-mah.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तेव्हा केमिस्ट संघटनेच्या दबावाला बळी न पडता फार्मासिस्टनी या संधीचा लाभ घेऊन आरोग्यसेवा सुरळीत चालू ठेवावी आणि आपण प्रथम रुग्ण सेवा व नंतर व्यवसाय हे उद्दिष्ट ठेवून सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी कायद्याप्रमाणे औषधविक्री चालू ठेवून त्यात कुठेही खंड पडणार नाही याची ग्वाही समाजाला द्यावी.
जयेश नलावडे, चांदिवली (मुंबई)
भावनांचे कंप नव्या पिढीला समजतच नाहीत?
जिया खानच्या आत्महत्येचा विषय चíचला जात असल्यानं तिला आलेलं नराश्य, तिची पत्रं, तिनं केलेले अबोर्शन इत्यादी सगळी वर्णनं ऐकताना/ वाचताना असं जाणवतंय की तिला तोंड द्याव्या लागलेल्या कठीण प्रसंगी आपलं मन मोकळं करू शकणारं तिच्याजवळ कोणीच नव्हतं.. अगदी जन्मदातेसुद्धा नाही. तिच्यावर ही वेळ यावी यात दोष फक्त एकटय़ा सूरज पांचोलीचाच? तिचे आई-वडील आणि तथाकथित जवळचे मित्रमत्रिणी यांच्यापकी एकालाही तिच्या वागण्या-बोलण्यात कुठल्याही क्षणी काहीच जाणवलं नाही?
लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका विशीतल्या जोडप्याशी काही महिन्यांपूर्वी माझी ओळख झाली. भीत भीत (हो.. कारण त्यांच्या खासगी आयुष्यात उगाच आपली ढवळाढवळ न होवो या उद्देशानं!) पण आवर्जून त्यांना विचारलं की, तुम्ही असं आयुष्य का जगताय? पकी मुलगा या नात्याकडे शारीरिक संबंधांबरोबरच आíथक आणि भावनिक आधार या दृष्टिकोनातूनही बघत होता, पण मुलीच्या उत्तरांनी मी चकितच झालो! तिची प्रतिक्रिया होती, ‘पटता है तो टेक, वरना रामटेक!’ ती त्या मुलाची ‘कपॅबिलिटी’ पारखून बघत होती.
हा या आणि यांच्यासारख्या अनेक जोडप्यांचा वैयक्तिक प्रश्न असला तरी त्याची धग समाजाला जाणवल्याशिवाय राहणार नाही!
प्रसन्न मंग्रुळकर, मुंबई.
संप कोणासाठी पुकारता राव?
शरद राव यांनी अखेर मुंबईतील संप मागे घेतला खरा, पण ज्यांच्यासाठी शरद राव संपाची वारंवार टिमकी वाजवत असतात त्यांच्या कामाच्या सुमारपणाबद्दल ते काहीच बोलत नाहीत. घोटाळेबाज नेते आणि कामगार संघटनांचे फाजील लाड करणारे शरद रावांसारखे नेते देशाच्या विकासात मोठा अडथळा आहेत.
मुजोर रिक्षाचालक आणि कर्तव्यचुकार कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवण्यास सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे. उदा. कामात हेळसांड होत असल्यास कठोर कारवाई होत असती तर आज मुंबईमध्ये पावसाळ्यात घाणीचे साम्राज्य दिसले नसते.
जयेश राणे, भांडुप (मुंबई)
भाजपकडे संधी येऊनही ती का हुकते?
बाबरी, गोध्राकांड आणि मागील २० वर्षांत भाजपचा स्वत:चा आणि मित्रपक्षांसोबतचा आतापर्यंतचा प्रवास याचं चुरचुरीत विश्लेषण करणारा ‘महत्त्वाकांक्षी प्रयोगाची सुरुवात’ हा सुनील चावके यांचा लेख (लालकिल्ला, १७ जून) वाचला. भाजपमध्ये ‘नमो’ उदयामुळे मागील आठवडाभरात अनेक घटनाक्रम घडले. पक्षाचे ‘पितामह’ अडवाणी यांची नाराजी आणि नंतर ती नाराजी दूर करण्यासाठी पक्षातील दिग्गजांनी केलेली खलबते साऱ्या देशाने बघितली. अडवाणी नरमले तोच रालोआचा दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा मित्रपक्ष ‘जेडीयू’ने १७ वर्षांची मत्री तोडत वेगळी वाट धरली. एकंदर ‘पार्टी विथ डिफरन्स’मध्ये सध्या तरी ‘डिफरन्स’च पाहायला मिळतो आहे.
‘यूपीए-२’च्या कार्यकाळातील न संपणाऱ्या घोटाळ्यांच्या मालिकेमुळे जनतेचा भ्रमनिरास झाला होता, अण्णांच्या आंदोलनामुळे भ्रष्टाचारविरोधात सर्वसामान्यांचा उद्रेक रस्त्यावर उतरला होता; पण दुर्दैवाने या आंदोलनाला फाटे फुटले आणि सर्वसामान्यांचा पुन्हा अपेक्षाभंग झाला. अशा परिस्थितीत लोक भाजपकडे एक पर्याय म्हणून पाहत आहेत. खरं तर भाजपकडे कुशल आणि अनुभवी नेत्यांची कमतरता नाही, पण ‘नमोनिया’च्या मात्रेचा त्यांच्या पक्षात अतिरेक झाल्याने अनेक चांगल्या नेत्यांना स्वत:च्या नेतृत्वगुणांवरच विश्वास राहिला नाही. ‘नमो’शिवाय कुणीच पर्याय नाही असं इतर कर्तबगार नेत्यांनादेखील वाटतंय याचा खेद वाटतो. अडवाणींना साठ वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असल्यानेच त्यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या एका ब्लॉगमध्ये म्हटलं होतं, ‘पुढचा पंतप्रधान दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांचा नसेल, तर तो एखाद्या तिसऱ्या आघाडीचा असेल’. जेडीयू आता रालोआतून फुटून तिसऱ्या आघाडीच्या वाटेवर आहे. तेव्हा अडवाणींचा हा संकेत खरा होण्याची चिन्हे दिसत आहेत.
रालोआतून जेडीयू बाहेर पडल्याने बिहारमध्ये भाजप आता प्रमुख विरोधी पक्षाची जागा घेणार आहे. यापूर्वी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत २०१२ मध्ये भाजपने सत्ता गमावून विरोधी पक्षनेतेपद मिळवले होते. कर्नाटकात सत्ता काँग्रेसने भाजपकडून खेचून घेतली आहे. २०१२ मधील पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा फायदा भाजप-अकाली दलांना झाल्याने तिथे त्यांना सत्ता राखता आली. उत्तर प्रदेशात सारी ताकद अजमावून अपेक्षेपेक्षा कमी जागाच हाती लागल्या. ‘बालेकिल्ला’ गुजरातमध्येही यंदा गेल्या वेळेपेक्षा दोन जागा कमी मिळाल्या. आगामी छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत ‘अँटी इन्कम्बन्सी’चा फटका बसला; तर मात्र भाजपला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. प्रत्येक वेळी चांगली संधी येऊनसुद्धा भाजपला त्याचा फायदा घेत येत नाही.
भारती गड्डम, पुणे.
.. असा निषेध करू नये!
नितीशकुमार यांनी साथ सोडल्यानंतर, बिहारच्या भाजपनं मंगळवारी (१८ जून) त्या राज्यात ‘बिहार बंद’चे आवाहन केलं आहे. ‘संयुक्त जनता दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पािठबा काढून घेतला’याच्या निषेधासाठी हा बंद असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मला वाटतं त्यांनी असा निषेध करू नये. भाजपचा लढा प्रवृत्तीच्या विरुद्ध असताना व्यक्तिविशेषावर त्यांनी का उतरावे? गोस्वामी तुलसीदासांचा श्रीराम रावणाविरुद्ध एक देखील अपशब्द काढीत नाही, उलट त्याच्या पक्षातील सज्जनांचं तो अधिकार देऊन पुनर्वसन करतो.
रमेश पुरुषोत्तम कुलकर्णी, वाकोला (मुंबई)
.. तरीही गोंधळ कसा उरला?
‘संघाची भाजपवरील पकड अजूनच घट्ट’ हा संजीव केळकर यांचा लेख (रविवार विशेष, १६ जून) कुठल्याही निष्कर्षांविना संपणारा वाटला. ४० वर्षे ेसंघात काम केल्यावरही विचारांचा इतका गोंधळ ह्या लेखात दिसून आला की, त्यावरून हा लेख संघाच्या बाजूने होता की विरोधात, हेच कळले नाही.
– अमोल कुलकर्णी, कल्याण.