‘राज्यातील ५५,००० औषध विक्रेते व्यवसाय गुंडाळून परवाने परत करणार’ ही बातमी (लोकसत्ता, ११ जून ) वाचून असे वाटले की, आजपर्यंत कायदा धाब्यावर बसवून फक्त नफा आणि नफा हे उद्दिष्ट असणारे हे नॉनफार्मासिस्ट (केमिस्ट) लोक खरंच असे करणार का, हा मुळात मोठा प्रश्न आहे. या केमिस्ट संघटनेच्या नेत्यांनी आजपर्यंत संघटनेच्या दबावाखाली कधीच कायद्याची अंमलबजावणी होऊ दिली नाही. पण दोन वर्षांपूर्वी ‘ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट – १९४०’ कायद्याचे कडक पालन सुरू झाले. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी औषधविक्री दुकानात फार्मासिस्ट असावा व फार्मासिस्टशिवाय औषधविक्री करू नये या नियमाचीही अंमलबजावणी करून कारवाईस सुरुवात केली. पण या फार्मासिस्टविना ‘केमिस्ट’दुकान थाटणाऱ्यांनी नफा कमी होणे, औषधविक्री क्षेत्रात एफडीआय आणणे तसेच अन्न व औषध प्रशासन अन्यायपूर्वक व आकसपूर्ण कारवाया करत आहे, अशी कारणे देत बंद पुकारणे, औषधविक्री सेवा खंडित करणे असे प्रकार आरंभले. तसेच आता ठोक औषध विक्रेत्यांनी १ जूनपासून औषध खरेदीच बंद केली आहे आणि १५ जुल रोजी ५५,००० औषध विक्रेते त्यांचे परवाने जमा करणार आहेत.
असे झालेच, तर समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने ही फार महत्त्वाची गोष्ट ठरेल, कारण आजपर्यंत हे नॉनफार्मासिस्ट लोक खरे म्हणजे जनतेच्या आरोग्याशी खेळत आले आहेत. फार्मासिस्टच्या नोंदणीकृत प्रमाणपत्रावर रुग्ण सेवा बाजूला ठेवून फक्त नफा कमावित आले आहेत.
पण आता फार्मासिस्टांना मोठीच व्यवसायसंधी आहे. औषध विक्रेते व ठोक औषध विक्रेते बनण्यासाठी. अन्न व औषध प्रशासन कायदेशीर बाबी पूर्ण असल्यास दोन दिवसांत औषधविक्री व ठोक औषधविक्रीचे परवाने फार्मासिस्टनाच देणार आहे. त्यासाठी कोणत्याही संघटनेच्या ना-हरकत प्रमाणपत्राची गरज नाही तसेच कुठेही अनामत रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. परवाना काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे व संपूर्ण प्रक्रिया www.fda-mah.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तेव्हा केमिस्ट संघटनेच्या दबावाला बळी न पडता फार्मासिस्टनी या संधीचा लाभ घेऊन आरोग्यसेवा सुरळीत चालू ठेवावी आणि आपण प्रथम रुग्ण सेवा व नंतर व्यवसाय हे उद्दिष्ट ठेवून सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी कायद्याप्रमाणे औषधविक्री चालू ठेवून त्यात कुठेही खंड पडणार नाही याची ग्वाही समाजाला द्यावी.
जयेश नलावडे, चांदिवली (मुंबई)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा