‘उद्याच्या आशां’चे काही खरे नाही, याची जाणीव झाल्यावर माणसे विझतात, शारीरिकदृष्टय़ा जगायचे तर आहे, म्हणून आधार शोधतात.. श्रद्धेची झेपच घेतात! असे करताना आपली ‘तात्त्विक आत्महत्या’ झालेली आहे , हे अनेकांच्या ध्यानातही येत नाही.. हे वास्तव कायम आहे आणि विचारी माणूस म्हणून जगण्याची इच्छा असलेलेही आहेत, तोवर काम्यूचा प्रश्न आणि त्याचे उत्तर महत्त्वाचे ठरत राहणार. काम्यूची जन्मशताब्दी आजच, हे त्या प्रश्न-उत्तराच्या आठवणीचे निमित्त..
महाभारतात ‘यक्ष- युधिष्ठिर संवाद’ या नावाची यक्षप्रश्नाची कथा (वनपर्व अध्याय ३१२-३१३) आहे. यक्ष युधिष्ठिरास प्रश्न विचारतो, ‘या जगातील सर्वात मोठे आश्चर्य कोणते ?’  युधिष्ठिर उत्तर देतो,  ‘दररोज कितीतरी प्राणी (लोक) यममंदिरास जातात, हे जाणूनही इतर प्राण्यांना (लोकांना) अनंत काळ जगण्याची इच्छा होते, यापेक्षा मोठे आश्चर्य ते कोणते ? (अहन्यहनि भूतानि गच्छन्ति यममन्दिरम् । शेषा जीवितुमिच्छन्ति किमाश्चर्यमत परम् ? )’
विसाव्या शतकात हाच प्रश्न नव्याने, यथार्थतेने आधुनिक परिभाषेत आल्बेर काम्यूने उपस्थित केला. काम्यूची आज जन्मशताब्दी आहे. काम्यूचा जन्म  ७ नोव्हेंबर १९१३ रोजी फ्रेंच अल्जेरियातील माँडोवी (हल्लीचे ड्रीन) येथे झाला; तर ४ जानेवारी, १९६० रोजी मोटार अपघातात त्याचे निधन झाले.
काम्यू हा पत्रकार, संपादक, नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार, लघुकथा लेखक, राजकीय निबंधकार, अस्सल कार्यकर्ता होता. ‘तत्त्वचिंतक’ हे संबोधन त्याला आवडत नव्हते खरे, पण आज अकॅडमिक क्षेत्रात तो तत्त्ववेत्ता म्हणून परिचित आहे. तो स्वतला ‘कलाकार’ म्हणवून घेतो, तत्त्ववेत्ता नाही. ‘मी शब्दानुसार विचार करतो; संकल्पनेनुसार नाही,’ असे एका मुलाखतीत तो स्पष्ट करतो.     
काम्यूने बुद्धिवादी तत्त्वज्ञानाला कडाडून विरोध केला. त्याच्या मते सर्व तत्त्वज्ञान कृत्रिम असते, ते जीवन बांधून टाकते आणि यांत्रिक करते. त्याने सारे त्याचे विचार कथा, रूपके आणि विविध उदाहरणे यांच्या माध्यमातून मांडले. मृत्यूच्या पाश्र्वभूमीवर जीवनाचा (अस्तित्वाचा) अर्थ काय ?  हा त्याच्या चिंतनाचा गाभा होता.
द स्ट्रेंजर, द प्लेग, द फॉल या कादंबऱ्या आणि ‘द मिथ ऑफ सिसिफस’ व ‘द रिबेल’ या तात्त्विक निबधांमधून त्याने ‘व्यस्ततेचे तत्त्वज्ञान’ (फिलॉसॉफी ऑफ द अ‍ॅब्सर्ड) मांडले. मानवी कल्याणाबाबत तटस्थ  असणारे ‘विश्व’ आणि ‘मानवी न्याय’ यांच्यात मानवी बुद्धी तर्कसंगततेची अपेक्षा करते. पण तशी तार्किक सुसंगती कधीही सापडत नाही. परिणामी या संघर्षांमुळे जीवनात व्यस्तता निर्माण होते, असे त्याचे म्हणणे होते. व्यस्ततेसह  जगणे हेच अस्सल जगणे असते, असे तो म्हणतो.     
मानवी जीवनाचा त्याने लावलेला अर्थ लक्षात घेऊनच १९५७ ला साहित्यातील नोबेल पुरस्काराने त्याचा बहुमान करण्यात आला.  
 काम्यूच्या मते ‘अस्तित्वाचा अर्थ काय आहे?’ हा प्रश्न प्रत्येकाने विचारलाच पाहिजे. त्यापासून कुणाचीही सुटका नसते. पण हा प्रश्न जसाच्या तसा विचारला तर अनेक संदिग्ध उत्तरे मिळू लागतात, त्यामुळे हा प्रश्न नेमकेपणे विचारला पाहिजे. तसा नेमका प्रश्न विचारणे म्हणजे ‘माझ्या अस्तित्वाचा अर्थ काय आहे?’ असे विचारणे असते. यातून जगण्यातील विरोधाभास लक्षात येतो. तो असा की, मानवी जीवनाला अर्थ काय आहे, याचे उत्तर निसर्ग, हे अखिल विश्व किंवा विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती, तत्त्वज्ञान या घटकांनी बनलेले  मानवी जगही देऊ शकत नाही. पण उत्तर तर हवेच असते. प्रश्न विचारला आहे पण उत्तर नाही, हाच विरोधाभास आहे. अशा वेळी एक रिकामपण अनुभवास येते. ते रितेपण जगणे ही जीवनातील अपरिहार्यता असते. ‘माझ्या अस्तित्वाचा अर्थ काय आहे?’ सारखे प्रश्न विचारण्याची तीव्र इच्छा आणि उत्तरे  मिळण्याची अशक्यता यांच्यात ताण निर्माण होतो, त्या ताणासह जीवन जगावे लागते, तीच जीवनातील व्यस्तता असते.   
व्यस्ततेच्या संदर्भात विवेचन करताना काम्यू आत्महत्या ही संकल्पना ज्या रीतीने स्पष्ट करतो तसे कुणीही केलेले नाही. जीवन व्यस्त असेल तर मग आपण आत्महत्या करून सुटका करावी काय ? जगावे की मरावे ? काम्यूच्या मते माणसाने ज्यावर तत्त्वचिंतन करावे, अशी आत्महत्या ही एकमेव अस्सल तात्त्विकदृष्टय़ा गंभीर समस्या आहे, बाकीचे सारे प्रश्न फिजूल आहेत.
साधारणपणे आत्महत्येमागे निराशा, भावनिक उद्रेक किंवा आíथक अडचणी अशी सामाजिक कारणे असतात. ही शारीरिक आत्महत्या असते. सामाजिक कारणामुळे होणाऱ्या शारीरिक आत्महत्या सामाजिक उपाययोजना करून, समुपदेशनाने टाळता येतात, हे आपण पाहतोच.  
पण आत्महत्येची समस्या तात्त्विक कधी बनते ?
झोपेतून उठा, बस, लोकल, इत्यादीने कामावर जा, साताठ तास मान मोडून काम करा, नंतर घरी या,खा-प्या, शरीरधर्म उरका, झोपा, मग पुन्हा उठा.. .. बस, लोकल .. मालकाची शाबासकी, पुरस्कार मिळवा, चांगले नोकर म्हणून प्रसिद्ध व्हा, हेच यांत्रिक जीवन कायमचे जगत राहा. हे माणूस करीत राहतो. तो ‘उद्याच्या आशां’वर जगत राहतो. मग एके दिवशी पस्तिशी-चाळिशीच्या दरम्यान लक्षात येते की प्रत्येक ‘उद्या’ आपणास अंतकाळाकडे नेतो आहे. अशा वेळी ‘आपण का जगात आहोत ?’ , ‘कोणते आयुष्य जगत आहोत?’ असे प्रश्न उभे राहतात. मग विचारी माणसाला आत्महत्या सुचते. याचा अर्थ जीवन ओझं झालं आहे, व्यस्त ठरते आहे, याची जाणीव झाली की  आत्महत्या करावी की नाही हा प्रश्न मात्र तात्त्विक बनतो. त्याचे उत्तर म्हणून माणूस बहुधा तात्त्विक आत्महत्या  करतो.
तात्त्विक आत्महत्या म्हणजे विचार न करता वाट्याला आलेले विषमतेने ग्रासलेले, अन्यायी, यांत्रिक जीवन मुकाटय़ाने जगणे.
या तात्त्विक आत्महत्येचे स्वरूप कसे असते ? तर धर्म, ईश्वर, मिथ्या अध्यात्मशास्त्र, मानवी आकलनाच्या पलीकडे असणारे कथाकथित सत्य, नातेसंबंध,  ईर्षां, महत्त्वाकांक्षा, प्रेम, राग, द्वेष, एखादी उदात्त भावना, श्रद्धा यांना शरण जाणे, कुठलातरी बुवा,अण्णा, अप्पा, बापू, ताई, अम्मा, यांच्या नादी लागणे, नवस इत्यादी कर्मकांडे करीत राहणे. अशा गोष्टींना काम्यू ‘श्रद्धांची झेप’ (लीप ऑफ फेथ) म्हणतो. हे मूल्य हरविलेले, तात्त्विक आत्महत्या केलेले जग बनते.
या मूल्यं हरविलेल्या, दांभिक जगात जगायचं कसं ? या यक्षप्रश्नामुळे विचारी माणसाचा  (किंवा तात्त्विक आत्महत्या न केलेल्यांचा) कोंडमारा होतो.    
अशी तात्त्विक आत्महत्या केवळ सामान्य माणसेच करतात, असे नव्हे; तर अनेक सन्मान्य विचारवंतसुद्धा अशी आत्महत्या करतात, असे काम्यू स्पष्ट करतो. पण आत्महत्या हे उत्तर असू शकत नाही. शारीरिक आत्महत्येमुळे तर व्यस्तता जास्त गुंतागुंतीची होते.  मग या व्यस्ततेविरुद्ध बंड करणे हाच उपाय असतो.  बंडखोरीचे स्वरूप काय ? तर जगण्यातील व्यस्तता स्वीकारणे आणि शारीरिक आत्महत्या न करणे आणि तात्त्विक आत्महत्याही न करणे म्हणजे व्यस्ततेविरुद्ध बंडखोरी करणे. या दोन्ही आत्महत्यांच्या जोखडातून माणूस मुक्त झाला की त्याला ‘केवळ स्वातंत्र्य’चा साक्षात्कार होतो. मग तो जगण्याला हवा तसा आकार देऊ शकतो, हवा तो अर्थ देऊ शकतो. तेच त्याचे अस्सल मुक्त जीवन असते.
आणि बंडखोरी सतत करावयाची असते; कारण यांत्रिक जीवन  तुमच्यावर सतत झडप घालून तुम्हाला कायम गुलाम बनवीत असते किंवा तात्त्विक आत्महत्येला भाग पाडीत असते. म्हणून तुम्हाला सतत बंडखोरी करावयाची असते. ‘द रिबेल’मध्ये काम्यू म्हणतो त्याप्रमाणे, ‘व्यस्तता जगणे आणि विसंगतीविरुद्ध बंड करून उठणे हेच जीवनाचे सार्थक आहे. जो नकार आणि स्वीकार दोन्ही करू शकतो, तोच खरा बंडखोर! ’  
लेखक संगमनेरच्या एस. एन. कला महाविद्यालयात तत्त्वज्ञान विभागप्रमुख आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा