भारतीय माणसे भावुक जास्त आणि विचारशील कमी असतात. हे असे भावुक असणे, हेच आपणा भारतीयांच्या विचारच न करण्याच्या अचाटपणाचे ठळक लक्षण आहे. भारतीय दर्शन परंपरा ज्या काटेकोर तार्किक रीतीने तात्त्विक विचार करण्यास शिकविते त्या रीतीने आपण विचार करीत नाही, कारण ते विचार व पद्धती आपणापर्यंत पोहोचलीच नाही.
सामान्य लोकांसाठी तत्त्वज्ञान जाणीवपूर्वक का उपलब्ध झाले पाहिजे? प्लेटोपासून विसाव्या शतकातील अनेकांच्या तत्त्वज्ञानामागील हेतू खरेच लोकाभिमुख होते का? त्यांचे लेखन खरेच लोकसुलभ होते का? हे प्रश्न केम्ब्रिजचे तत्त्ववेत्ते सायमन ब्लॅकबर्न उपस्थित करतात; आणि उत्तर देतात की, ‘तत्त्वज्ञान लोकांना उपलब्ध झाले पाहिजे, याचा अर्थ लोकांना तत्त्वज्ञानाच्या शैलीचा परिचय करून देणे म्हणजे लोकांना तत्त्वज्ञानाच्या रीतीने विचार करण्यास उत्तेजन देणे.’
ब्लॅकबर्न यांनी उपस्थित केलेला प्रश्न आणि त्याचे त्यांनी केलेले विश्लेषण आपण भारतीय विचारविश्वाला अर्थात भारतीय दर्शन परंपरेच्या संदर्भात उपस्थित केला तर काय चित्र दिसेल, त्याचा विचार आज करू. त्या प्रश्नांचे स्वरूप साधारण असे राहील : भारतीय दर्शन परंपरा सामान्य लोकांसाठी होती का? त्यांना कळेल अशा लोकसुलभ भाषेत ती मांडली गेली का? या दर्शन परंपरेच्या विचार करण्याच्या शैलीचा परिचय लोकांना करून दिला गेला का? आणि मुख्य म्हणजे लोकांना दर्शन परंपरा ज्या रीतीने विचार करते त्या रीतीने विचार करण्यास उत्तेजन दिले गेले का? याचाच अर्थ (राजकीय भाषेत) भारतीय जनता भारतीय दर्शन परंपरेत जे काही सांगितले आहे तशी जीवनशैली अंगीकारत आहे का?
या प्रश्नांच्या उत्तरासाठी आधी आपणास ‘भारतीय दर्शन परंपरा म्हणजे काय?’ हा प्रश्न उपस्थित करावा लागेल. त्यासाठी त्या परंपरेचा परिचय करून घ्यावा लागेल. बठक मारून तिचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी पसा, वेळ, श्रम, चिकाटी आणि मुख्य म्हणजे भारतीय दर्शन परंपरेविषयीचे प्रेम आपल्या अंत:करणात निर्माण करावे लागेल. समजा, या अटी पूर्ण केल्या; आता मार्ग सोपा झाला आहे. पण थांबा, हे केवळ आपले ‘वाटणे’ आहे! म्हणजे आपली भावना आहे. वास्तवात तसे नाही. ते का नाही, हेच पाहावयाचे आहे.
इथे भारतीय दर्शन परंपरेचे स्वरूप पाहण्याआधी ब्लॅकबर्न यांनी (पाश्चात्त्य तत्त्वज्ञानासंदर्भात) नोंदविलेली तीन निरीक्षणे लक्षात घेऊ. पहिले, ‘कांट, हेगेलपासूनच्या तत्त्ववेत्त्यांची पल्लेदार विधानांची मुक्त पखरण आणि व्याकरणीय नियमांची गुंतागुंत असलेली भाषाशैली’ आणि दुसरे, ‘त्या काळात इंग्लिश ही जनभाषा असताना लेखन प्रतिष्ठित व अभिजात समजल्या जाणाऱ्या जर्मन भाषेत करणे’ (ज्याचा परिणाम म्हणून तत्त्वज्ञान सामान्यांपासून दूर गेले), तिसरे निरीक्षण म्हणजे ‘हे सारे काही हेतुपूर्वक घडलेले नाही.’ (अवतरणांतील निरीक्षणे ब्लॅकबर्न यांचीच आहेत. विशेषत: इंग्रजी व जर्मनबद्दलचेही.) याचा अर्थ असा की, लोकभाषा हे व्यापक माध्यम पूर्ण ताकदीने वापरले गेले नाही; पण विविध कारणांमुळे एकोणिसाव्या शतकात इंग्लिश ही ज्ञानवहनाची आणि म्हणून ज्ञानउत्पादकांची भाषा बनली; म्हणजेच तिला विश्वभाषा हा दर्जा मिळाला तेव्हापासून ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञान सर्वसामान्य लोकांना उपलब्ध झाले. तत्त्वचिंतन सोपे करता येते, असा आशय मांडणारी भाषिक विश्लेषणाची चळवळही रुजली.
आता, प्राचीन भारतात दर्शन परंपरेची भाषा कोणती होती? दर्शन परंपरा वैदिक आणि अवैदिक अशी विभागली गेली आहे. न्याय-वैशेषिक, सांख्य-योग आणि पूर्वमीमांसा-उत्तरमीमांसा (वेदान्त) ही वैदिक आणि बौद्ध आणि जैन ही अवैदिक दर्शने मानली जातात. या सगळ्यांना विरोध करणारी चार्वाक/लोकायत विचारसरणी (आजच्या भाषेत हिंदू पण) अवैदिक मानली गेली. या सगळ्यांचा हेतू एकच आहे, तो म्हणजे दु:खमुक्ती!
प्राचीन काळापासून भारतात संस्कृत आणि इतर प्राकृत भाषा आहेत. प्राकृत भाषा बहुधा प्रादेशिक लोकभाषा आहेत. आजही अनेक लोकभाषा आहेत. संस्कृतचेही प्राचीन संस्कृत आणि अर्वाचीन संस्कृत असे प्रकार करावे लागतील.
वैदिक दर्शने मुख्यत: संस्कृतात सूत्रशैलीत मांडली गेली. प्राचीन बौद्ध दर्शन पाली भाषेत आणि प्राचीन जैन दर्शनही मूलत: अर्धमागधी भाषेत आहे. याचा अर्थ प्रारंभी वैदिक व अवैदिकांच्या ज्ञानभाषा स्वतंत्र होत्या; पण नंतर भारतीय दर्शनांचा विकास खंडनमंडन पद्धतीतून झाला. त्यातून संस्कृत ही ज्ञानभाषा बनली.
संस्कृतमुळे एकसूत्रीकरण झाले, ही एका अर्थाने विधायक गोष्ट झाली; पण त्यामागे दर्शनांच्या प्रांतात अंतर्गत विघातक राजकारण झाले. पहिले म्हणजे या तात्त्विक चर्चा प्राचीन काळी अतिशय छोटय़ा, खूपच मर्यादित संख्येच्या गटात होत राहिल्या, केल्या गेल्या किंवा झाल्या. म्हणून गुरुकुलही अतिछोटे होते. त्यात प्रवेश मिळणे अवघड होते. आत काय घडत आहे, हे बाहेर कधीच कळत नव्हते. पूर्वपक्ष हेतुत: चुकीचा मांडला गेला, अवैदिकांचे मूळ साहित्य नष्ट करण्यात आले किंवा तसे आटोकाट प्रयत्न झाले. अवैदिकांच्या विरोधात चार्वाकांना उंट म्हणूनच वैदिकांनी वापरले. त्याला बौद्ध आणि जैनांनी हरकत घेतली नाही. कारण चार्वाक त्यांचेही विरोधक होते! हा पहिला तात्त्विक बळी इहवादाचा ठरला. म्हणजे जे खऱ्या अर्थाने सामान्यजनांच्या सुखाचा, मन:शांतीचा विचार करणारे इहवादी होते, ते वैदिकांच्या वेदीवरील पहिले तात्त्विक हुतात्मा झाले. दुसरे अंतर्गत नुकसान म्हणजे वैदिकांची तांत्रिकदृष्टय़ा किचकट चर्चा पद्धतीची लागण बौद्ध व जैन दर्शनांनाही झाली. तेही पंडिती (स्कोलॅस्टिक) बनले. तिसरे कारण, हे चर्चागट मुख्यत: वर्णग्रस्त आणि पुरुषप्रधान होते. हे सारे जाणीवपूर्वक झाले, हा आक्षेप येथे येतो. इथूनच भारतीय जनतेचा तात्त्विक आत्मदुरावा सुरू झाला.
सामाजिकदृष्टय़ा भारतीय तत्त्वचिंतन संस्कृतमध्ये बंदिस्त झाल्याने ते लोकांपासून दूर गेले, हे मूलभूत कारण मानावे लागेल. वैदिक दर्शनांचे स्वरूपच असे बनले की ते सांस्कृतिक वर्चस्वाचे व धार्मिक दहशतीचे शस्त्र बनले. वर्ण-जात-लिंगभेद याचा पुरस्कार करणारे तात्त्विक साहित्य निर्माण झाले. ज्ञानबंदी हेच तत्त्वज्ञान होते. हा अडथळा स्वरूपाने धार्मिक असल्याने त्यात कुणीही हस्तक्षेप केला नाही, उलट त्या भेदाभेदाचा वापर करून घेतला गेला. बौद्ध दर्शनाचा भारताबाहेर प्रसार-विकास होण्याचे भाषिक कारण या दर्शनाने त्या त्या देशाच्या भाषा स्वीकारल्या. अशा रीतीने ही उच्च भारतीय दर्शन परंपरा स्वदेशात ‘परकी’ झाली.
आता या ज्ञानबंदीविरोधात अतिशय उच्च पातळीवर बंडखोरी केली ती चक्रधर, ज्ञानेश्वर ते तुकडोजी महाराजांपर्यंतच्या सर्व संत मंडळीनी. संत ज्ञानेश्वर हे अस्सल भाषिक देशीवाद मांडणारे पहिले विचारवंत होते. त्यांच्यापासून सर्व संतांनी तत्कालीन साध्या प्रादेशिक लोकभाषेत ओवी, अभंग इत्यादी शैलीत पारंपरिक तत्त्वज्ञान मांडण्याची परंपरा आणली. तुकोबा त्यासाठीच खडा सवाल करतात, ‘संस्कृत देवे केली अन् प्राकृत काय चोरापासून झाली?’
पण ही बंडखोरी भाषेपुरतीच मर्यादित ठरली. लोकांना तत्त्वज्ञान उपलब्ध झाले, सुलभ झाले, शैलीचा परिचय झाला; पण दर्शन परंपरा ज्या तार्किकतेचा पुरस्कार करते, त्या रीतीने तात्त्विक विचार करण्याचे शिक्षणच मिळाले नाही. भारतीय लोकशाही अशा भावुक, भाबडय़ा सामान्य जनतेच्या आधारावर विकसित होते आहे. परिणामी, दु:खमुक्ती या हेतूऐवजी ती अधिकाधिक दु:खाच्या खाईत लोटली जाते आहे.
* लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत. ई-मेल: tattvabhan@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा