रेनेसान्स (सांस्कृतिक नवजीवन), रेफम्रेशन (धर्मसुधारणा) आणि एनलायटनमेन्ट (प्रबोधन- वैचारिक व वैज्ञानिक मोहीम) अशा तीन टप्प्यांत युरोपीय प्रबोधन घडले. या तीन चळवळी मिळून जे काही होईल त्यास प्रबोधन म्हटले पाहिजे. भारतात यापैकी नेमके काय घडले, ते शोधावे लागेल..  
फिलॉसॉफी म्हणजे तत्त्वज्ञान या अर्थाने महाराष्ट्रात तत्त्वज्ञान या विषयाचा श्रीगणेशा एकोणिसाव्या शतकाच्या मध्यंतरी झाला. प्रबोधनाचा अटळ भाग म्हणून उपयुक्ततावादी नीतीविचार आधी विविध चळवळीत आणि नंतर शिक्षण क्षेत्रात एक विषय म्हणून तो अभ्यासक्रमात समाविष्ट झाला.
येथे एक बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. ‘फिलॉसॉफी’ हा शब्द पाश्चात्त्य विचारविश्वात आधी भौतिकशास्त्र (फिजिक्स)साठी वापरला जात होता. फिजिक्सचे मूळ नाव ‘नॅचरल फिलॉसॉफी’ असे होते. न्यूटनच्या प्रसिद्ध ग्रंथाचे नाव ‘निसर्गविषयक तत्त्वज्ञानाची गणिती तत्त्वे’ (मॅथॅमॅटिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी) असे होते. साहजिकच विसाव्या शतकाच्या दोन-तीन दशकांपर्यंत भौतिकशास्त्र विभागाला डिपार्टमेन्ट ऑफ नॅचरल फिलॉसॉफी असे नाव होते आणि प्राध्यापकांना प्रोफेसर ऑफ नॅचरल फिलॉसॉफी म्हटले जाई. खूप उशिरा फिजिक्स आणि फिलॉसॉफी ही स्पष्ट विभागणी झाली.
महाराष्ट्रातील पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा परिचय करून देणारे एकमेव पुस्तक म्हणजे फादर मॅथ्यू लेदल्रे (१९२६-१९८६) फिलॉसॉफिकल ट्रेंड्स इन मॉडर्न महाराष्ट्रा. हा लेदल्रे यांचा पीएच.डी.चा प्रबंध आहे. दुसरे म्हणजे या विषयावरील एकमेव लेख म्हणजे डॉ. सदानंद मोरे यांचा ‘स्वातंत्र्यपूर्व महाराष्ट्रातील पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास’ (परामर्श नोव्हेंबर १९८८). हा शोधनिबंध मराठीप्रमाणे इंग्रजीत उपलब्ध आहे. मराठीतील लेख महाजालावर उपलब्ध आहे.
लेदल्रे यांच्या संशोधनानुसार अभ्यासक्रमात पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा प्रवेश झालाच, पण त्या आधी ख्रिश्चन मिशनरी मंडळींनीही नव्या विद्य्ोचा प्रारंभ केला. ईस्ट इंडिया कंपनीला मिशनरी मंडळींचा हा उपद्व्याप बिलकूल मान्य नव्हता. ब्रिटिशांनी मिशनरी मंडळींना आमंत्रण तर दिले नव्हतेच, पण मिशनरी मंडळींचे येणे हे ब्रिटिशांना लाजिरवाणे वाटत होते. लेदल्रे यांच्या मते, भारतात आलेला विल्यम कॅरे हा पहिला ख्रिस्ती मिशनरी. राजा राममोहन रॉयनंतर सतीप्रथेचे खरे स्वरूप यानेच लोकांना समजावून दिले. त्याने सेरामपूर येथे खास नेटिव्ह जनतेला ‘पौर्वात्य साहित्य आणि पाश्चात्त्य विज्ञान’ शिकविण्यासाठी कॉलेज सुरू केले. त्यात पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा, मुख्यत: ख्रिस्ती तत्त्वज्ञानाचा अभ्यासक्रम समाविष्ट होता.
 डॉ. मोरे यांच्या निबंधात तीन मुद्दे आहेत. पहिला, पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा, विशेषत: स्पेन्सर, मिल, बेंथम, ऑगस्ट कोम्ट यांचा लोकहितवादी, टिळक, न्या. रानडे, रामकृष्ण भांडारकर, तसेच प्रार्थना सामाजिस्ट, सुधारणावादी आणि आगरकर संप्रदाय या भारतीय सुधारकांवरील प्रभावाचे स्वरूप स्पष्ट करणे व यातील निवडक विचारवंतांवर पडलेल्या प्रभावाची समीक्षा करणे आणि तिसरा मुद्दा, तत्त्वज्ञानविषयक मराठीतील त्या काळात महाराष्ट्रात आणि बडोदा येथे निर्माण झालेल्या साहित्याची नोंद घेणे. उलटय़ा क्रमाने जाता डॉ. मोरे यांच्या मते, मराठीतील महाराष्ट्रातील पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा ओनामा म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकर (१८२४-१८७८) यांनी लिहिलेले सॉक्रेटिसचे चरित्र (१८५२). सॉक्रेटिसने महाराष्ट्रात बरेच मूळ धरल्याचे ते स्पष्ट करतात. सॉक्रेटिसचे आणखी काही लेखन झाले. प्रा. प्र. ब. कुलकर्णी यांनी ‘सॉक्रेटिसीय संवाद’ (आजचा सुधारक सप्टेंबर व ऑक्टोबर, १९९०) हे उत्कृष्ट अनुवाद सिद्ध केले आहेत.     
डॉ. मोरे यांच्या मांडणीतील कळीचा मुद्दा म्हणजे स्पेन्सर, मिल इत्यादींचा लो. टिळकांच्या ‘गीतारहस्य’वरील प्रभाव. मोरेंच्या मते, ‘गीतारहस्य’मुळे काही फायदे झाले खरे; पण तोटाही झाला. तो असा की त्या काळी येऊ घातलेल्या पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांच्या विचारांचे आव्हान स्वीकारून टिळकांनी ‘गीतारहस्य’चे लेखन करताना तौलनिक तत्त्वज्ञानपद्धतीचा मोठय़ा खुबीने उपयोग केला. पण त्यामुळे आधुनिक विद्वानांवर पाश्चात्त्य तत्त्वज्ञान व विज्ञानाचा जो परिणाम झाला होता, तो नाहीसा झाला. मुळात भारतीय तत्त्वज्ञानात जगातील सर्वच प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आहेत, असा समज होता, तो तौलनिक तत्त्वज्ञानपद्धतीने अधिक घट्ट झाला आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याची भारतीयांमधील लाट ओसरली.       
महाराष्ट्रात विद्यापीठ व महाविद्यालय पातळीवर पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास प्रथम (१८८५) नागपूरच्या तत्कालीन मॉरीस आणि आजच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात सुरू झाला. तत्कालीन मध्यप्रांत आणि बेरार या महसूल विभागाचा कमिशनर सर जॉन हेन्री मॉरीस हा एल्फिन्स्टनसारखाच मवाळ, उदारमतवादी होता. त्याच्या आदरार्थ तत्त्वज्ञान विभाग सुरू झाला आणि खुद्द मॉरीसने पुढाकार घेतला. सुज्ञ ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पाश्चात्त्य तत्त्वज्ञान विद्यापीठीय व महाविद्यालयीन पातळीवर सुरू करण्यात घेतलेल्या पुढाकारामागे आणखी काही करणे होती. उदाहरणार्थ- लॉर्ड मेकॉले(१८०० -१८५९)च्या मते ‘सुशिक्षित नेटिव्ह इंडियन’ म्हणजे ज्याला मिल्टनचे काव्य, जॉन लॉकचे तत्त्वज्ञान आणि न्यूटनचे भौतिकशास्त्र यांचा परिचय आहे तो! पुढे जाऊन ज्या भारतीयाला एकूणच ब्रिटिश तत्त्वज्ञान, विज्ञान आणि साहित्य यांची उत्तम जाण आहे तोच खरा ‘सुशिक्षित नेटिव्ह इंडियन.’ मेकॉलेने जॉन लॉकचे तत्त्वज्ञान निवडण्यामागे एक निश्चित कारण होते.  युरोपातील प्रबोधनकाळास ‘प्रबोधन’ म्हणण्याचे कारणच हे होते की लॉर्ड हर्बर्ट ऑफ चेरबरी (१५८३-१६४८) व जॉन लॉक (१६३२-१७०४) तत्त्ववेत्त्यांनी मुख्यत्वे चर्चची भयावह जोखड व विविध कर्मकांडग्रस्त अंधश्रद्धा यातून युरोपीय जनतेच्या बुद्धीला मुक्ती दिली व सार्वजनिक जीवनात सहिष्णुतेला अवकाश दिला. विशेषत: लॉकने ‘अॅन  एसे कन्सìनग ह्य़ुमन अंडरस्टँिडग’ या युगप्रवर्तक ग्रंथात ‘कुणालाही काहीही तत्त्वज्ञान सांगण्यापूर्वी आपल्या बुद्धीला कशाचे ज्ञान होणे आवश्यक आहे’, हा विचार केला पाहिजे, या भूमिकेची मानसशास्त्रीय आणि समीक्षक बाजू मांडली. लॉकचा अनुभववाद हा नंतर विज्ञानाचा पाया ठरला.  या तत्त्वज्ञानाचा प्रभाव मेकॉलेवर असावा. ब्रिटिश तत्त्वज्ञान व विज्ञान तत्कालीन एनलायटनमेन्टच्या तत्त्वज्ञानात होते. ते सद्धांतिक स्वरूपात ‘फिलॉसॉफी’ या नावाने भारतीयांना शिकविणे गरजेचे होते. म्हणून ते अॅकेडेमिक बनवले गेले. अर्थात मेकॉले जहाल होता तर एलफिन्स्टन मवाळ होता, असे म्हणता येते. कारण भारतीयांना जी इंग्रजी विद्या प्रदान करण्यात आली, त्यामागे इंग्रजी जाणणारा नोकरवर्ग निर्माण करणे, हा व्यावहारिक हेतू होताच; पण एक तात्त्विक पातळीवरील विचार एलफिन्स्टन (१७७९-१८५९) सारख्या सुज्ञ प्रशासकाच्या मनात होता. आज ना उद्या हा देश सोडून जावे लागेल. चुकीच्या लोकांच्या हातात राज्य गेले तर येथील गरिबांचे खरे नाही, अशी भीती आणि शंका त्याला तीव्रतेने वाटत होती. त्यामुळे विशाल दृष्टिकोन आणि स्वत: निवडलेली तत्त्वे यानुसार जगणारा भारतीय माणूस घडविणे, हे एलफिन्स्टनला अपेक्षित होते. त्याला अपेक्षित भारतीय नागरिक व नेते आज आहेत, हे म्हणणे धाडसाचे आहे, हे उघड गुपित आहे.
*लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा