दैनिकाच्या पानांवर तत्त्वज्ञान या विषयावरील सदराचे प्रयोजन काय, येथपासूनचे अनेक प्रश्न ‘तत्त्वभान’ बद्दल गेल्या वर्षभरात काहीजणांनी उपस्थित केले. मागे वळून पाहिल्यास त्यांची उत्तरे मिळतात..
जगातील वाईटपणा, दुरिते टिकून राहण्यासाठी, ती यशस्वी होण्यासाठी आणि ही सर्व प्रकारची दुरिते अधिक समृद्ध व्हावीत ; यासाठी फक्त एकाच गोष्टीची गरज असते. ती म्हणजे चांगल्या माणसांनी काहीच करावयाचे नसते!
— एडमंड बर्क (१७२९- १७९७)
माणूस आणि जग यांच्या नात्याचा शोध घेणारा अतिप्राचीन प्रयत्न म्हणजे ‘तत्त्वज्ञान’ या विषयाचा परिचय करून देणे, हा ‘तत्त्वभान’ या सदरामागील उद्देश होता. येथे ‘परिचय’ हा शब्द केवळ त्या शब्दाचा अतिपरिचय असल्यामुळे उपयोगात आणत आहे एवढेच. या सदरात जे काही अपेक्षित होते त्यासाठी वस्तुत: ‘पूर्वपीठिका’ (prolegomena) ही संज्ञा अधिक योग्य वाटते. तत्त्वज्ञानाबद्दल आदर, प्रेम, आपुलकी आणि जिज्ञासा या अभिवृत्ती व्यक्त करण्यासाठी जे काही करावयाचे आहे, त्या साऱ्या प्रयत्नांना ‘तत्त्वज्ञानाची पूर्वपीठिका’ म्हणता येईल.
तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाबाबत परिचय (introduction) व पूर्वपीठिका (prolegomena) या दोन संकल्पनांमध्ये फरक करता येईल. ‘इंट्रोडक्शन’ या संकल्पनेत अनंत विद्वतजड पंडिती गोष्टींची अपेक्षा असते. ज्यांना परिचय करून दिला जातो त्या वाचकांना-प्रेक्षकांना काहीएक पूर्वज्ञान आहे, असे गृहीत धरलेले असते. त्या गृहीतावर आधारित प्रदीर्घ युक्तिवाद मांडणे आणि निष्कर्षांप्रत येणे असे परिचय देताना घडते. ‘प्रोलेगोमिना’ या संकल्पनेत अशा तांत्रिकदृष्टय़ा किचकट गोष्टींची गरज नसते. पूर्वपीठिका ज्ञानासाठी उत्सुक असलेल्या सामान्यजनांसाठी असते. शब्दबंबाळ, बोजडपण टाळून सामान्य भाषेत ती मांडलेली असते. त्याच वेळी पुढील चच्रेची पूर्वतयारी म्हणून परिभाषेची, वादविवादाच्या उपकरणांची, काही मूलभूत सिद्धांताची ओळख पूर्वपीठिकेत करून दिली जाते.
आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ तत्त्ववेत्ता इमॅन्युएल कांटने (१७२४-१८०४) आपले प्रगल्भ तत्त्वज्ञान ‘शुद्ध बुद्धीची मीमांसा’ (क्रिटिक ऑफ प्युअर रीझन) या ग्रंथात प्रामुख्याने मांडले पण त्याला सुशिक्षित वर्गाकडून व तत्त्ववेत्त्यांकडूनही प्रतिसाद मिळेना. अखेर त्याने सर्वसामान्य वाचकांसाठी सोप्या रीतीने साध्या भाषेत ‘प्रोलेगोमिना टू एनी फ्यूचर मेटाफिजिक्स’ हा ग्रंथ लिहिला. कांटने वापरलेला ‘प्रोलेगोमिना’ हा शब्द मी त्याच अर्थाने येथे वापरात आणत आहे.
विसाव्या शतकातील प्रसिद्ध तत्त्ववेत्ते हान्स रायखेनबाख यांच्या भाषेत सांगावयाचे तर सहजबुद्धी जे शिकविते त्यापेक्षा अधिक शिकण्याची इच्छा होण्याइतपत वाचकाकडे सहजबुद्धी असेल तर या सदरातील प्रतिपादन समजण्यासाठी तेवढी तयारी पुरेशी आहे. वाचकांना तत्त्वज्ञान या विषयात रुची वाटावी, ती वाढावी तसेच विद्यमान जग, त्यातील वास्तवाचे विविध स्तर, त्यातील समस्या आणि त्यांची गुंतागुंत यांचे विश्लेषण करण्यासाठी कोणती तत्त्वज्ञानात्मक आयुधे वापरता येतील, इतपत माहिती त्यांना असावी, हा उद्देश या लेखनामागे आहे. त्याचप्रमाणे जे वाचक अधिक काही करू इच्छित आहेत, ते प्राप्त करण्यासाठी त्यांना काय करावे लागेल, त्याचे केवळ दिग्दर्शन केले आहे. त्या हेतूने नंतरच्या लेखांमध्ये विविध ग्रंथ, व्यक्ती, तत्त्ववेत्ते आणि त्यांच्या सिद्धांताचा गोषवारा देण्यावर भर दिला गेला.
केम्ब्रिजचे तत्त्ववेत्ते सायमन ब्लॅकबर्न (१९५५- विद्यमान) यांच्या मते, तत्त्वज्ञान लोकांना उपलब्ध करून देणे म्हणजे तत्त्वज्ञानाचे अर्थहीन सुलभीकरण करणे नाही. तर लोकांना तत्त्वज्ञानाच्या शैलीचा परिचय करून देणे आणि त्यांना तसा विचार करण्यास उत्तेजन देणे, असा केला पाहिजे. त्यामुळे जगाचे स्पष्टीकरण कसे करावे, ही समस्या न बनता जगाचे जे काही स्पष्टीकरण देण्यात आले आहे ते समजावून घेण्याची क्षमता विकसित होते.
हे सदर तत्त्वभान देण्याचे. ते भान पुढील प्रकारचे असू शकते. त्यात भर पडू शकते.
१) एखाद्या विषयाकडे, समस्येकडे तात्त्विक दृष्टिकोनातून पाहता येते का? तसे पाहणे म्हणजे नेमके काय करणे? त्या समस्येचे सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र विकसित करणे अपेक्षित आहे का?
२) त्या समस्येचा, त्या विषयाचा व तत्त्वज्ञान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विचारपद्धतीचा नेमका कोणता संबंध आहे? असेल तर तो तत्त्ववेत्त्यांच्या, तत्त्वज्ञानाच्या परिप्रेक्ष्यातून कसा होऊ शकेल? यासाठी तत्त्वज्ञानाची कोणती विचारपद्धती अवलंबता येईल?
३) तत्त्वज्ञ, तत्त्ववेत्ते, व्यावसायिक तत्त्ववेत्ते (तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक) सर्व विषयांत पारंगत असतील असे नाही. ते ज्यात पारंगत असतात, त्याबद्दलचे भान या निमित्ताने विकसित करणे आणि त्यांच्या पारंगततेचा उपयोग करून घेऊन इतरांनी एकूण ज्ञानरचनेचा विस्तार करावयाचा असतो.
या सदरात भान किंवा ज्ञानात्मक जाणिवेचे स्वरूप, तत्त्व म्हणजे काय, तत्त्वज्ञानाच्या परिचयाचे मार्ग, पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा भारतातील आणि महाराष्ट्रातील प्रवेश, तसेच भारतीय तत्त्वज्ञानातील खंडन-मंडन, सॉक्रेटिसचा संवाद, द्वंद्वविकास, विश्लेषण या चच्रेच्या पद्धती तसेच वैज्ञानिक पद्धती आणि सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र या तत्त्वज्ञानाच्या पाच शाखा; अशा किमान साधनसामग्रीची ओळख; ही पूर्वपीठिका निर्माण होण्यासाठी करून देण्यात आली. तत्त्वज्ञानाचा इतिहास का अभ्यासावा, तत्त्वज्ञानाचा देशाच्या चारित्र्याशी कोणता ताíकक व नतिक संबंध आहे याचाही थोडक्यात आढावा दिला.
या लेखमालेत अनेक विषय राहून गेले. धर्माचे तत्त्वज्ञान, विज्ञानाचे तत्त्वज्ञान, विज्ञानाचे नीतिशास्त्र, उपयोजित तत्त्वज्ञान (आणि त्यातील अनेक विषय), राजकीय- सामाजिक- कायद्याचे, इतिहासाचे-कलेचे- शिक्षणाचे तत्त्वज्ञान; त्याचप्रमाणे भारतीय दर्शनांची ओळख, दर्शनांना आलेली कुंठितावस्था, त्यांची विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील चिकित्सा अशा अनेक विषयांना न्याय देता आला नाही.
तत्त्वज्ञानाच्या पाच शाखांपकी ज्ञानशास्त्र व नीतिशास्त्रावर अधिक भर दिला. विशेषत: सप्टेंबरपासून उपयोजित नीतिशास्त्रातील व्यवसाय, उद्योगसमूह, माध्यमे, जागल्या, राजकीय, पर्यावरण इत्यादी नीतिशास्त्रे काहीशी विस्ताराने मांडली.
तत्त्वज्ञानाचे रूपांतर प्रत्यक्ष कृतीत झाले तर आणि तरच त्याला नतिक मूल्य लाभते, या विश्वासातून हे लेखन झाले. उदाहरणार्थ, शेती, भारतीय शेती या विषयाचा तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची वेळ तर आली आहेच. पण पुढे जाऊन भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान व नीतिशास्त्र रचले गेले तर शेतीविषयक धोरण निश्चित करता येईल, हे सुचविले आहे. म्हणूनच या विषयाला सर्वाधिक तीन लेख वाहिले.
तत्त्वज्ञान केवळ विद्यापीठीय, महाविद्यालयीन उच्च पातळीवरच अभ्यासले गेले पाहिजे, हा आग्रह पूर्ण सोडून दिला पाहिजे. पाश्चात्त्य-युरोपीय राष्ट्रांमध्ये तत्त्वज्ञान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. विविध प्रकारच्या संशोधनाला उत्तेजन देऊन संशोधनाचा उपयोग केला जातो. त्यामुळेच तेथे शेतीचे नीतिशास्त्र विकसित झाले. भारतीय समाजात विविध कारणांनी, तत्त्वज्ञान या विषयाला सरकार, धोरणकत्रे शिक्षणसंस्थाचालक, प्राचार्य यांच्या पातळीवर काहीही महत्त्व उरलेले नाही. आजची स्थिती तर फारच वाईट आहे. (त्यावर स्वतंत्र लेखमाला लिहावी लागेल) त्यामुळे तत्त्वज्ञानात रुची असणाऱ्यांनी एकत्र येऊन ही परंपरा पुढे नेली पाहिजे.
या सदराचा हेतू वाचकांमध्ये तात्त्विक विचार करण्याची तयारी केली पाहिजे, याचे केवळ भान आणणे आणि त्यानुसार कृती करणे, हा होता व आहे.
शहाणपण शिकविणे हा हेतू नसून शहाण्या माणसांमधील शहाणपणाला हाळी देणे हा आहे. इथे तत्त्वभान हे सदर ‘समाप्त’ असे लिहिले तरी तत्त्वचिंतन कधी समाप्त होत नसते, ती अखंड वैचारिक आणि निखळ व्यावहारिक प्रक्रिया आहे. मेरी वॉरनॉक (१९२४-विद्यमान ) या ब्रिटिश विदुषीच्या मते, तत्त्वज्ञान हा एक अतिशय उच्च दर्जाचा सर्वसामान्य तऱ्हेचा शोध आहे आणि असा खेळ आहे की यात कुणीही, अगणित माणसे भाग घेऊ शकतात!
*लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.
(समाप्त)