एखादीनं किंवा एखाद्यानं दुसऱ्या कलावंताची कॉपी केली, तर तशा कृतीला हीन लेखणंच आपण योग्य मानतो. चित्रकलेत हा न्याय चालतोच असं नाही. इथं प्रत्येकाची चित्रभाषा दुसऱ्याचं- किंवा अनेकांचं- अनुकरण करणारी, अगदी उसनवारी करणारी, तरीही निराळी असू शकते. तेव्हा ‘हे ढापलंय’ असं म्हणण्यापूर्वी आपण आपल्या डोळ्यावर कसली ढापणं तर नाहीत ना, याची खात्री केलेली बरी!
अतुल दोडियांबद्दल बोलण्यासारखं खूप असताना गेल्या आठवडय़ातल्या ‘कलाभान’मध्ये कमी लिहिलं गेलं, अशी काहींची तक्रार आहे. त्यावर उत्तर म्हणजे, हे लिखाण चित्रकारांबद्दल नाहीच- ते आपल्याबद्दल- म्हणजे चित्रांच्या प्रेक्षकांबद्दल आहे. आपण कसे पाहातो हेच आपल्याला इथं पाहायचं आहे. ‘समीक्षकांवर विश्वास न ठेवता कलावंतांनीच आपापली दुकानं चालवण्याचा आजचा काळ आहे,’ असा निराशावाद न बाळगता प्रेक्षकानंच स्वसंवेद्यपणे कलाभान जपलं पाहिजे, हे कुणालाही पटेल. ती स्वसंवेद्यता टोकदार, धारदार करण्याचे मार्ग आपण दर आठवडय़ाला पाहातो आहोत. तरीदेखील, हे सदर स्वत:च्या सहभागानिशी संवादी (इंटरअॅक्टिव्ह) करणाऱ्यांच्या एका मुद्दय़ाचा मान राखला पाहिजे- तो मुद्दा आहे ‘अॅप्रोप्रिएशन’चा. अॅप्रोप्रिएशन म्हणजे काय हे अतुल दोडियांच्या संदर्भात पाहू, मग तिथूनच आजच्या विषयाकडे जाऊ. अतुल दोडियांनी आत्मचित्रात स्वत:च्या डोळ्यांवर जो गॉगलसारखा चष्मा लावलेला आहे, त्यावर डेव्हिड हॉकनी आणि भूपेन खक्कर यांची चित्रं अगदी त्यांच्या-त्यांच्या शैलीतच रंगवलेली दिसतात. याच चित्रात अन्यत्रही हॉकनीचे संदर्भ आहेत. अतुल दोडिया हे आज निर्विवादपणे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय कलावंत असून त्यांच्या चित्रांमध्ये त्यांनी अनेक चित्रकारांच्या चित्रांचे संदर्भ त्या-त्या चित्रकाराच्या शैलीवैशिष्टय़ांसकट आणलेले आहेत. ‘विविध चित्रकारांनी घडवलेला कलेतिहास’ म्हणजे काय, हे अतुल दोडियांच्या चित्रांमधून पाहायला मिळतं. पिएरो दे ला फ्रान्चेस्का हा मध्ययुगाच्या अस्तकाळातला (पंधरावं शतक) इटालियन चित्रकार, त्याच्या पन्नास वर्षे पुढला आल्ब्रेश्त डय़ूरर हा जर्मन अभ्यासक-चित्रकार, ‘सुप्रेमॅटिझम’ या कलाशुद्धतावादी तत्त्वविचाराचा जाहीरनामा लिहिणारा आधुनिक- अमूर्तवादी कासिमिर मेलविच, शांतिनिकेतनात हयात घालवलेले बिनोदबिहारी मुखर्जी, आधुनिक चित्रकलेचं प्रतीक म्हणवला जाणारा आणि आधुनिक शैलीतूनही आदिम भावनाच कशा दिसतात याचा साक्षात्कार घडवणारा पिकासो, हिंदुस्थानी अध्यात्माची जपमाळ फ्रान्समध्ये राहून ओढत बडीबडी चित्रं सादर करणारे एके काळचे ‘प्रोग्रेसिव्ह’ चित्रकार सय्यद हैदर रझा, अशा एक ना अनेक चित्रकारांची चित्रं किंवा त्या चित्रांचे अगदी ओळखू येण्याजोगे भाग- अतुल दोडियांच्या चित्रांत यापूर्वी दिसले आहेत. ही यादी बरीच लांबेल, पण इथं थोडी नावं आहेत. मुद्दा असा की, दोडिया या सर्वाचं ऋ ण मान्य करतात, पण मी याला माझ्या कल्पनेनुसार आणि माझ्या काळानुसारच वापरतोय म्हणतात.
हे अॅप्रोप्रिएशन आहे. इतिहास असेल मोठा, पण स्वत:च्या चित्रात कलेच्या इतिहासातले आणि कलेतिहासाच्या खिजगणतीत नसलेल्या जनपरिचित प्रतिमांचे (म्हणजे साइनबोर्ड, फिल्म पोस्टर, शालेय पुस्तकांतली चित्रं आदींचे) काही पैलू दोडियांनी ‘सुयोजित’ केले आहेत. दोडियांच्या ‘दुर्गा’ या चित्रात दुर्गादेवी नाही की कुणीच मानवाकृती नाही. हल्ली मॉल/ रेस्तराँ/ ऑफिसं/ रेल्वेस्थानकं आदी सर्वच ठिकाणी दिसणारे ‘वॉक थ्रू मेटल डिटेक्टर’ प्रकारचे दरवाजे १९८० चं दशक संपता-संपता जेव्हा नव्यानंच काही ठिकाणी दिसू लागले होते, तेव्हाचं हे चित्र आहे आणि त्यातली मुख्य प्रतिमा त्या दरवाजाचीच आहे.. पण त्याच ‘दुर्गा’ चित्रात, मरणभय सूचित करण्यासाठी दोडियांनी आधार घेतला होता तो पिकासोच्या ‘गर्निका’ या चित्रातल्या आक्रंदन करणाऱ्या मानवी चेहऱ्याचा. या ‘दुर्गा’ चित्राबद्दल नुसतं शब्दांत सांगूनही त्या चित्राचं इंगित ‘वाचकां’ना कदाचित कळू शकतंय, पण नंतरच्या काळातली दोडियांची चित्रं अशी फक्त सांगून समजतील अशा प्रकारची राहिली नाहीत. त्यांनी पुढे काचेच्या कपाटांमध्ये मांडणशिल्पं घडवली, ती मांडणशिल्पं म्हणजे ‘अॅप्रोप्रिएशन’च्या दोडिया-शैलीचा अद्वितीय आविष्कार आहेत. त्याबद्दल येत्या जुलैनंतर विषय निघाल्यास बोलूच, पण आता अॅप्रोप्रिएशन- कॉपी- नक्कल- ढापाढापी यांच्या छटांबद्दल अधिक विचार करू.
त्यासाठी अर्पणा कौर या दिल्लीवासी चित्रकर्तीचं चित्र आपल्या दिमतीला घेतलंय- अर्पणा कौर या समाजभावी म्हणाव्यात अशा चित्रकार.. अल्प उत्पन्न गटांतल्या मुलींना त्या स्वखर्चानं विविध कलाकुसरींचं शिक्षण देतात. या मुली स्वावलंबी बनाव्यात अशी अर्पणा यांची इच्छा असते. अर्पणा यांची स्वत:ची चित्रं कुणाला ‘साधारण’ वाटतील, कारण माणसाचा विचार ‘मानव’ म्हणून करण्यासाठी, माणसासारखा माणूस काढायचा नाहीच- मानवी अवयव, मानवी देह आणि मानवी चेहरा काढण्यासाठी कुठलेही काटेकोर नियम लावायचेच नाहीत असा खाक्या या चित्रांमध्ये आहे. हा विचार या चित्रकर्तीनं आधीपासून आणि सातत्यानं केलेला असल्यानं तो तिच्या ‘शैली’चा भाग ठरतो, त्यामुळे अगदी आत्ता आपल्यासमोर असणाऱ्या चित्रातसुद्धा त्या दोन स्त्रियांचे हात प्रमाणाबाहेर लांब आहेत, हे ‘दोषदिग्दर्शन’ केल्याच्या थाटात सांगणं म्हणजे तमीळ भाषेला ‘आंडुगुंडू’ म्हणण्याइतकंच असंस्कृत ठरतं. त्यामुळे या चित्रातले आकार, रेखनाचं कौशल्य आणि प्रमाणबद्धता या दृष्टीनं पाहायचेच नाहीत, हा मार्ग बरा. चित्रातल्या प्रतिमा ‘कशा आहेत’ यापेक्षा ‘त्या काय सांगताहेत’ हे महत्त्वाचं मानणाऱ्यांपैकी अर्पणा आहेत.
या चित्रात वारली चित्रकलेचा सरळसरळ वापर अर्पणा यांनी केलेला दिसतोय. अर्पणा कौर व त्यांची आई यांनी मिळून भारतीय लोककलांचा मोठा संग्रह केलेला आहे आणि कदाचित, इथं या चित्रात वारली कलेचे जे अंश दिसतात, ते मूळ वारली चित्र अर्पणा कौर यांनी विकतही घेतलेलं असू शकतं, पण म्हणून काय झालं? चित्र विकत घेतलंत म्हणून चित्रकाराचं स्वत्व, त्याची संस्कृती, त्या संस्कृतीतून आलेल्या जाणिवा.. असा सगळा गठ्ठाच लाटता येईल काय? हा दुखरा प्रश्न अर्पणा यांना माहीत आहे. ‘ती त्यांची धरोहर, मी माझीही मानते’ अशा विनम्रभावानं आणि ‘त्यांची चित्रं त्यांच्या सांस्कृतिक अवकाशातून आलीत, माझी माझ्या’ अशा समतावादी वृत्तीनं अर्पणा कौर यांनी स्वत:च्या चित्रांत लोककलेचा वापर सुरू केला. मिथिला भागातल्या आणि ‘मधुबनी’ म्हणून अधिक परिचित असलेल्या मिथिला लोकचित्रशैलीची चित्रं काढणाऱ्या स्त्रियांची चित्रं रीतसर विकत घेऊन, त्यावर स्वनिर्मित एखादी प्रतिमा रंगवण्याचा प्रकारही अर्पणा यांनी केला! हे चूक आहे, असं समीक्षकांचं मत होतं (ते मत आजही आहे आणि त्याला कारणं आहेत- इतिहासापेक्षा लोकसंस्कृतीशी वागताना तुम्ही अधिक सजग असलं पाहिजे, या सूत्रात ती कारणं बसवता येतात.) आणि अर्पणा यांनीही अशी चित्रं करणं पुढं थांबवलंच. पण मग, आणखी काही निराळ्या प्रकारानं लोककलेतल्या जाणिवांशी आपला असलेला संबंध जोखून पाहाता येईल काय, अशा विचारातून निराळी चित्रं घडली.
हेही अॅप्रोप्रिएशनच, पण ‘सुयोजना’पेक्षा निराळं. ‘आत्मीकरण’ म्हणता येईल असं! त्यानंतरच्या आत्मीकरणाचा ध्यास असलेल्या चित्रांमधलं ‘हार्वेस्ट’ हे चित्र आपल्यासोबत आज आहे. त्यातली सुगीची दृश्यं मूळ वारली चित्रामधली आहेत आणि मुळात चौकोनी असलेले वारली चित्र जणू उसवून, या चित्रातल्या एका स्त्रीच्या हाती असलेल्या दोऱ्यासरसं झालेलं इथं दिसतंय. तो सुगीचा दोरा जणू अनादी-अनंत आहे.. हिरवी साडी नेसलेली स्त्री तो दोरा हाताळतेय- या हातातून त्या हातात.. पुढे, पुढे सरकवतेय.. पण तिच्यामागं आता निळ्या साडीतली स्त्री कात्रीच घेऊन बसलीय आणि सुगीच्या अनंत-सूत्राला आता कात्री लागणार की काय, अशी स्थिती (वारली समाजाच्या वास्तवात जशी आहे तशीच) या चित्रात आहे.
बरं, आपल्या रोजच्या टीव्ही सीरियलमध्ये जसं एक बाई चांगली आणि दुसरी वाईट असं असतं तसंही या चित्रातल्या दोघींचं दिसत नाहीये. ‘आई, तू नको गं करूस चपात्या, मी बाहेर जेवते आज,’ असं म्हणणाऱ्या मुलीला जशी आईची काळजीच असते तसं, हिरव्या (जरा वयस्कर) स्त्रीचे डोळे अगदी अलगद बंद करून, तिला त्रास होऊ नये नि धक्काही बसू नये अशा खुबीनं निळी स्त्री तो दोरा कापते आहे. या चित्रात हे जे काही दिसतंय, त्यातनं परंपरा आणि नवता यांचं अद्वैत असतं म्हणतात ते कसं, याची एक शक्यताच साकार होते आहे.
अर्पणा किंवा अतुल यांनी कॉपी केली, असं म्हणायचा मूर्खपणा कुणीही करत नाहीच. उलट, या दोघांनी किंवा आणखीही अनेकांनी इतरांच्या कलाकृतींना स्वत:च्या अवकाशात घेऊन जे नवसर्जन केलंय, त्यामुळे पाश्चात्त्य ‘पोस्टमॉडर्न’ संकल्पनाव्यूहातल्या ‘अॅप्रोप्रिएशन’ला भारतीय आणि वसाहतोत्तर प्रश्नांची धार मिळालेली असल्याचा अभिप्राय अभ्यासकांना द्यावा लागणार असतो. आपण अभ्यासक नसू, ‘फक्त रसिकच’ असू, तर अशा चित्रांकडे पाहण्यासाठी आपले डोळे साफही असले पाहिजेत आणि तयारही. साफ डोळे तयार होणारेत चित्रं पाहून पाहून, पण त्याआधीची एक अट- पूर्वअटच- अशी की, या डोळ्यांवर कोणतीही ढापणं नकोत.
चित्र-ढापणे
एखादीनं किंवा एखाद्यानं दुसऱ्या कलावंताची कॉपी केली, तर तशा कृतीला हीन लेखणंच आपण योग्य मानतो. चित्रकलेत हा न्याय चालतोच असं नाही. इथं प्रत्येकाची चित्रभाषा दुसऱ्याचं- किंवा अनेकांचं- अनुकरण करणारी, अगदी उसनवारी करणारी, तरीही निराळी असू शकते.
First published on: 11-03-2013 at 12:44 IST
मराठीतील सर्व कलाभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Picture supress copy