‘आपत्ती आवडे सर्वाना!’ या अग्रलेखात (२० जून) सारा दोष सरकार व अधिकाऱ्यांचा असल्याचा सूर आहे, मात्र याला यात्रेकरूही तेवढेच जबाबदार आहेत.  यंदा पावसाळा जोरदार असणार हे हवामान खात्याने मे महिन्यातच प्रसिद्ध केले होते. उत्तराखंड राज्यात पुराचे थमान प्रतिवर्षी आहे. हे यात्रेकरू कुणी झोपडीत राहणारे अशिक्षित, गोरगरीब नव्हते तर सुस्थापित, सुशिक्षित आहेत. हवामान खात्याने दिलेला इशारा त्यांनी का लक्षात घेतला नाही?  यात्रेकरू कंपन्या तर या हानीला जबाबदार आहेतच.  त्यांनी उत्तराखंड येथील हवामानाची कल्पना यात्रेकरूंना दिली होती काय? याची चौकशी व्हावी.
 देवभोळेपणा बळी घेतो हे सार्वत्रिक सत्य आहे. लाखो भाविक एकाच वेळी जमणार असतील तर त्यांचे संरक्षण देवसुद्धा करू शकणार नाही!  वसईचे काथोलिक जेरुसलेम, रोम (व्हॅटिकन) येथे जातात, याची आखणी धर्मसेवकच करतात. अशा यात्रेकरूंचे वय साठच्या वर असते. तेथले हवामान मानवत नाही. परत आल्यावर कित्येक आजारी पडतात, तर काही लवकर ‘मार्गस्थ’ होतात.  
मार्कुस डाबरे, पापडी, वसई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गंगेच्या प्रवाहाची वाट कुणी लावली?
उत्तराखंडमधील निसर्गाच्या विदारक तडाख्यानंतर काही काळ पर्यावरण संरक्षणासंबंधाने चर्चा होतील, राजकारण्यांचे दौरे होतील, मदतीचे कोटय़वधीचे आकडे जाहीर होतील आणि पुनश्च निसर्गावर अनन्वित अत्याचार करायला नि:संकोचपणे सगळे बाह्य़ा वर करून सरसावतील! निसर्ग फार समजूतदार आहे पण बेफिकीर मानवजात त्याचा अंत पाहते तेव्हा निसर्ग साहजिकपणे उफाळून रौद्र रूप धारण करतो.
 भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी पर्यावरण संरक्षणाच्या सगळ्या योजना बासनात गुंडाळून गोमुखपासून गंगासागपर्यंतच्या हजारो मलांच्या गंगेच्या प्रवाहाची अक्षरश: वाट लावली आहे. विजय मुडिशगिकर यांच्यासारखे महाराष्ट्रातले आणि बहुगुणांसारखे उत्तरेकडचे पर्यावरणप्रेमी गंगेच्या संरक्षणासाठी जिवाचे रान करत असताना स्वार्थी राजकारणी आणि ‘गंगामया’ असा टाहो फोडणारे असंख्य तथाकथित भक्त रोजच्यारोज गंगेची बिनदिक्कत मुस्कटदाबी करण्याची चढाओढ लावताना दिसतात.
 त्यामुळे अवर्षण आणि अतिवर्षांवाच्या  काळांत एरवी मातेसारखं प्रेम करणारी करणारी गंगा महिषासुरमर्दिनीसारखी मानवाला चिरडायला उद्युक्त झाल्यास नवल वाटायला नको.
राजीव मुळ्ये, दादर (मुंबई)

‘कर्मकांडा’ला सरसकट विरोध करण्याचे आवाहन, हे थोतांडच
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून सत्यशोधक ओबीसी परिषद धर्मातर करण्यासंबंधी अभियान चालवत आहे. ‘ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर’ या अभियानांतर्गत पाचवी जनजागृती परिषद येत्या २२ सप्टेंबर रोजी नाशकात होईल. पुढील ३६५ दिवस एकही धार्मिक कर्मकांड करायचे नाही, असा निर्णयही घेण्यात आला आहे. परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांच्या नेतृत्वाखाली चाललेली ही चळवळ निव्वळ थोतांड आहे, असे म्हणायला पुरेसा वाव आहे.
पहिला मुद्दा, महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक तत्त्वज्ञानानुसार निर्मिकाची संकल्पना मांडली आहे; बौद्ध धम्माची नव्हे! संघटनेच्या नावातच ‘सत्यशोधक’ हे बिरुद लावणाऱ्या संघटनेने आधीच अस्तित्वात असलेल्या एखाद्या धर्माचा स्वीकार करण्यासाठी आंदोलन करणे म्हणजे एक विनोदच होय.
दुसरा मुद्दा, कर्मकांडाला विरोध करण्याचा. तसे पाहिले तर प्रत्येक संस्कृतीने आपापल्या समाजाला शिस्त लावण्यासाठी कर्मकांडे निर्माण केल्याचे दिसते. ख्रिश्चन समाजात रविवारी मेणबत्त्या जाळाव्यात, विशिष्ट पद्धतीनेच प्रार्थना करावी, पाण्यात उलटी डुबकी मारायला लावूनच धर्मातर करवून घ्यावे, अशी शेकडो कर्मकांड आहेत. इस्लाम धर्मातील लोक विशिष्ट हालचाली करूनच नमाज (प्रार्थना) करतात. भारतीय संस्कृतीतही पूजा, आरती, गंध लावणे, अनुष्ठान, नामजप आदी कर्मकांड आहेत. बौद्ध धम्मही कर्मकांडाला अपवाद नाही. वस्तुत: गौतम बुद्धांनी मूर्तीपूजा नाकारली, परंतु त्यांच्या पश्चात अनुयायांनी त्यांच्या भव्य मूर्ती स्थापून कर्मकांड चालू केल्याचे आपण पाहतो. इतकेच काय जगातील सर्वच देशांच्या राष्ट्रीय जीवनातही कर्मकांडे पाळली जातात. विशिष्ट दिवशी राष्ट्रध्वज फडकवायचे, विशिष्ट पद्धतीनेच ध्वजवंदन करायचे आदी. असे असताना बौद्ध धम्म स्वीकारण्याच्या तयारीसाठी ओबीसी बांधवांनी कर्मकांड करू नये, असे सांगणे हास्यास्पद नाही काय?
मानवी मूल्यांना नख लावणारी, माणसाला निष्क्रिय बनवणारी कर्मकांडे त्यागली पाहिजेत याविषयी कोणाचेच दुमत नाही. मानवी मनाला सुसंस्कृत करण्यासाठी, मेंदूसोबतच हृदयाचाही विकास करण्यासाठी, समाजाचे अभिसरण करण्यासाठी काही मर्यादेपर्यंत कर्मकांडे आवश्यकच ठरतात. इमानेइतबारे विविध परिषदा आयोजित करण्याचे कर्मकांड निष्ठेने करणारे हनुमंत उपरे ही बाब समजून घेतील का, हा खरा प्रश्न आहे. ओबीसी समाजात काहीही पत नसताना ‘सत्यशोधक’ विचारांचा बुरखा पांघरून हिंदू धर्मावर सतत आघात करणे हे उपरे यांचे कर्मकांडच ठरते. तसे नसते तर त्यांच्या विविध परिषदा यशस्वी करण्यासाठी त्यांनी इस्लामी मूलतत्त्ववाद जपणाऱ्या संघटनांशी सलगी केलीच नसती. कट्टरपंथी लोकांशी हातमिळवणी करणे कोणत्या ‘सत्यशोधक’ तत्त्वात बसते?
प्रा. देवल बुक्क, सोलापूर.

या निकालाच्या चर्चेत संयम हवाच..
शरीरसंबंध आणि विवाह याबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाची चर्चा संयमानं करणारा ‘या निकालाचा आधार नको..’ हा अन्वयार्थ (२० जून) वाचला. न्यायालयाचा निर्णय हा खरे तर केव्हाही त्या-त्या प्रकरणातील बाबींचा विचार करून त्या प्रकरणापुरता दिलेला असतो. या प्रकरणात तर, तसं न्यायालयानंही स्पष्ट केलं आहे. तरीही दृक्श्राव्य माध्यमांतून या निकालाला सर्वसामान्यत्व देऊन, हीच लग्नाची व्याख्या मानण्यात काय धोके आहेत याची चविष्ट चर्चा घडवून आणली गेली, अगदी लोकांच्या प्रतिक्रिया मागवून मागवून. मग जनतेच्या कल्पनांना पंख फुटले नाहीत तरच नवल. अगदी देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया ‘पांचाली’ होणार का इथपर्यंत.
 शरीरसंबंध म्हणजे पती-पत्नी या निकालाचंही सर्वसामान्यीकरण करून विवाहसंस्था न्यायाधीशच धोक्यात आणू पाहत आहेत अशी हाकाटी पिटणाऱ्या प्रसारमाध्यमांनी याबाबतीत खूप सावधानता आणि संयम दाखवणं जरूर आहे. भारतातल्या आदर्श विवाहसंस्थेमुळेच आपलं समाजस्वास्थ्य खूप काळ टिकून आहे आणि कौटुंबिक कलह इतर देशांच्या मानानं कमी आहेत हे ध्यानात ठेवलं पाहिजे.
श्रीपाद पु. कुलकर्णी, बिबवेवाडी, पुणे.

जोकरांचाच खेळ..
‘राजकारण म्हणजे ‘ज्योक’ नव्हे!’ या ‘अन्वयार्थ’मध्ये (१९ जून) सध्याच्या पंतप्रधानांच; वर्णन करणारी ‘स्टॅच्यू’टरी अशी शब्दयोजना सार्थ व समर्पक वाटली! खुसखुशीत भाषेत विदारक सत्यकथन करणारा हा अन्वयार्थ आहे. मुळातच गंभीर प्रकृती असलेल्या माणसाला हसे होईल अशी कृत्ये करायला लावायची अन हसे झाले की त्याला रडे येईपर्यंत हसवत ठेवण्याची कामे देत बसायचे, हे या जोकरांच्या ‘श्रेष्ठीं’चे धोरण आहे. दिग्विजय सिंग हा एक जोकर जनतेचे मनोरंजन करण्यात कमी पडतोय अशी भीती वाटल्याने दुसऱ्या सिंगांची जोकरपदी नेमणूक झाली असावी, असेच पंतप्रधानांच्या ताज्या वक्तव्यावरून वाटू लागले आहे. सर्कशीचा हा खेळ निवडणुका होईपर्यंत तरी चालला पाहिजे. पुढचे पुढे!
विजय पाध्ये, पुणे

खरा केदारनाथ!
चारधाम यात्रा करून (खासगी कंपनीतर्फे) आम्ही एक दिवस अगोदर परतलो, म्हणून वाचलो.
या यात्रेचा मार्गच फार कठीण आहे. कितीही सुखसोयी झाल्या तरी निसर्गावर अवलंबून राहावे लागते, सतत हवामान बदलत असते. आता तर आणखी कठीण झाले आहे. छोटा रस्ता. खरे म्हणजे सारथी (चालकच) आपला खरा केदारनाथ आसतो. त्याचीच खरी कसोटी असते.
– महेश कुलकर्णी, डोंबिवली