राजकीय यात्रांचे महत्त्व ‘एनटीआर’ यांच्या चैतन्य रथाने सर्वच राजकीय पक्षांना पटले, पण भाजप आणि अडवाणींनी यात्रांचा मार्ग प्रशस्त केला! याच मार्गावरले यात्रेकरू आजही राजकीय ध्येयांकडे चालताहेत..
यात्रा हा प्रकार भारतीयांसाठी नवीन नाही. इथल्या धार्मिक-सांस्कृतिक परंपरेचा तो अविभाज्य भाग आहे. पूर्वीच्या काळी काशीयात्रा म्हणजे सकल यात्रांचा परमोच्च बिंदू. त्याचबरोबर, नुकतीच पार पडलेली पंढरपूरची वारी असो, गेल्या महिन्यात महाप्रलयामुळे हादरा देऊन गेलेली चारधाम यात्रा असो किंवा दहशतवाद्यांच्या दबावाला बळी न पडता सध्या चालू असलेली अमरनाथ यात्रा असो, भारतीय जनजीवनाशी त्यांचा अतूट संबंध आहे. पण राजकारणी मंडळी जेव्हा ‘यात्रे’ला निघतात तेव्हा स्वाभाविकपणे जनसामान्यांच्या भुवया उंचावतात. अर्थात याला अपवाद महात्मा गांधींच्या दांडीयात्रेचा. गांधीजींच्या कल्पक नेतृत्वातून १९३० साली निघालेल्या या प्रतीकात्मक मिठाच्या सत्याग्रहाने स्वातंत्र्याच्या आंदोलनाला निर्णायक वळण दिले. गेल्या सुमारे ३० वर्षांत मात्र निरनिराळ्या राजकीय नेत्यांनी आपले छुपे-उघड अजेंडे घेऊन वेगवेगळ्या ‘यात्रा’ काढल्या. त्यामध्ये अर्थातच भारतीय जनता पक्षाचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवाणी ‘यात्रा स्पेशालिस्ट’ ठरले आहेत. पण अन्यही काही नेत्यांनी व्यापक जनसंपर्कासाठी या माध्यमाचा आपापल्या परीने वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात अगदी ताजी म्हणजे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची सुरू झालेली ‘जनआशीर्वाद’ यात्रा आणि त्याही पुढे जाऊन भाजपने येत्या सप्टेंबरमध्ये घोषित केलेली ‘दलित उत्थान यात्रा’!
उज्जैनमधील महाकाल मंदिरापासून गेल्या २२ जुलै रोजी चौहान यांनी ही यात्रा सुरू केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील राज्यात असलेल्या सुशासनाचा प्रचार, हे यात्रेचे साधे सरळ उद्दिष्ट सांगितले जात असले तरी त्यानिमित्त राज्यात झळकत असलेल्या बॅनर आणि होर्डिग्जवर भाजपच्या तमाम नेत्यांच्या छबी झळकत असताना नेमके पंतप्रधानपदाच्या शर्यतीतले बिनीचे उमेदवार नरेंद्र मोदी मात्र वगळले जाणे, हा चर्चेचा मुख्य विषय बनला आहे. भोपाळमध्ये २५ सप्टेंबर रोजी यात्रेच्या समारोपप्रसंगी मोदी हजर राहणार असल्याचे सांगून पक्षप्रवक्त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे या मुद्दय़ावरून भाजपअंतर्गत असलेली धुसफूस लपून राहिलेली नाही. या यात्रेत राज्यातल्या सर्व (२२४) विधानसभा मतदारसंघांचा चौहान दौरा करणार असून पक्षाचे कार्यकर्ते व हितचिंतकांकडून निधी संकलनाचीही मोहीम राबवण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा