गेल्या आठवडय़ात आफ्रिकन वंशाचे नोबेल पारितोषिक विजेते कादंबरीकार चिनुआ अचुबे यांचे निधन झाले, तर या आठवडय़ात चिलीचे नोबेल विजेते (१९७१) कवी पाब्लो नेरुदा यांचे शव त्यांच्या कबरीतून बाहेर काढण्यात आले.  त्यांचे निधन कॅन्सरने झाले असल्याचे जाहीर करण्यात आले होते, पण त्यांचा वाहनचालक आणि इतर संबंधितांचे असे म्हणणे आहे की, चिलीचा लष्करशहा, पिनोचे१९७३ मध्ये सत्तेवर येताच त्यांच्यावर विषप्रयोग केला गेला.
त्याविषयीची तक्रार जून २०११ मध्ये न्यायालयात करण्यात आली होती. त्याची खातरजमा करण्यासाठी  जागतिक पातळीवरील या महान कवीच्या मृत्यूचा तब्बल चार दशकानंतर पुनशरेध घेतला जाणार आहे.  त्याच्या वैद्यकीय चाचणीचे निष्कर्ष लवकरच जाहीर होतीलही. पण मृत्यूविषयी नेरुदाचीच, ‘नथिंग बट डेथ’ (मूळ स्पॅनिश : ‘सोलो ल म्यूर्ते’  : निव्वळ मृत्यूच) कविता यासंदर्भात वाचण्याजोगी आहे..  ‘भुईवरल्या सर्वानाच टिपून घेतोय मृत्यू झाडूसारखा.. फिरतच राहतो मृत्यूचा खराटा’ अशी एक प्रतिमा त्यात आहेच; पण १९२६ ते ३२ सालच्या या कवितेची सुरुवात ‘एकाकी थडग्यांमधले शब्दही न सांगाडे’ अशा प्रतिमेनं होते आणि शेवट, ‘आपल्या पलंगांवरच असेल मृत्यू.. आपल्याच काळ्या घोंगडीत.. आपल्याच गादीवर.. या पलंगांच्या होडय़ा होतील.. बंदराकडे वाहत जातील.. तिथं उभा असेल मृत्यू.. अ‍ॅडमिरलसारखा!’ असा आहे. अत्यंत योगायोगानं, चिलीच्या ज्या लष्करी उठावानंतर अवघ्या दोन आठवडय़ात नेरुदाचा मृत्यू झाला तो उठाव पिनोचे यांना नेता बनवून तत्कालीन अ‍ॅडमिरल मेरिनो यांनी घडवून आणला होता.. द्रष्टय़ा कवींच्या शब्दांमागून वास्तव जन्माला येतं, अशी एक कविकल्पनाच आहे. ती नेरुदा- चिली- अ‍ॅडमिरल मेरिनो यांच्याबद्दल खरी नसेलही; पण एक खरं की नेरुदानं म्हटल्याप्रमाणे, त्याचा सांगाडा ‘शब्दहीन’ नाही.. तो आता बोलणार आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा