काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधली ‘मैत्रीपूर्ण’ स्पर्धा कुरघोडीच्या थराला जाते त्यामागे केवळ राज्यापुरते राजकारण नाही.. या कुरघोडय़ांच्या राजकारणाचे धागे दिल्लीपर्यंतही जातात. सहकार क्षेत्र साफ करण्यासाठी कंबर कसलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पाऊल ‘मोबाइल बँकिंग’ खेडोपाडी नेण्याचे ठरवून योग्य दिशेला पडले, परंतु नव्या सहकारी साखर कारखान्यांना परवानग्या देताना पुन्हा मागे आले, या ताज्या घडामोडींना याच राजकारणाचा संदर्भ आहे..
देशात सहकार चळवळ रुजली ती महाराष्ट्रात. या सहकार चळवळीने राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासास मोठा हातभार लावला. सुरुवातीला कृषी क्षेत्रापुरती मर्यादित असलेली सहकार चळवळ नंतर अनेक क्षेत्रांमध्ये फोफावली. आजच्या घडीला राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सहकाराशी जोडलेली आहे. राज्याच्या राजकारणावर सहकार चळवळीचा पगडा आहे. सहकार चळवळीने ग्रामीण भागातील जनतेला हात दिला. गरीब शेतकऱ्यांना मदत झाली. अलीकडे मात्र या क्षेत्रात शिरलेल्या अपप्रवृत्तींमुळे सहकार चळवळ बदनाम झाली. महाराष्ट्रात नागरी लोकसंख्या वाढली आणि शहरी भागातील जनतेत सहकार चळवळीबद्दल तिरस्कारच आढळतो. सहकार क्षेत्रात आजही अनेक चांगले उपक्रम राबविले जातात व लोकांना त्यातून मदत होते. पण राजकारण्यांनी स्वत:च्या स्वार्थाकरिता सहकार चळवळीचा पार बट्टय़ाबोळ केला. शेतकऱ्यांच्या पीक कर्जात महत्त्वाच्या भूमिका बजाविणाऱ्या सात ते आठ जिल्हा मध्यवर्ती बँका अडचणीत आहेत. नागपूर, वर्धा आणि बुलढाणा या तीन जिल्हा मध्यवर्ती बँकांचे भवितव्य अंधकारमय आहे. नाशिक बँकेवर अलीकडेच प्रशासक नेमण्यात आला. राज्याच्या सहकाराची शिखर बँक समजली जाणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गेली दोन वर्षे राजकारण्यांच्या हातात नसल्यानेच सुधारली, असे बोलले जाते. राज्यात आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पीक कर्जात सहकारी बँकांचा वाटा हा जवळपास ७० टक्क्यांच्या आसपास असायचा. आता मात्र राष्ट्रीयीकृत बँकांचा वाटा ६० टक्के, तर सहकारी बँकांकडून ४० टक्केच कर्जवाटप होणार आहे. गेल्या वर्षी प्रथमच राष्ट्रीयीकृत बँकांचा वाटा वाढला. देशातील अन्य राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही राष्ट्रीयीकृत बँकांचा कर्जवाटपातील प्रमाण वाढले पाहिजे, यावर सरकारचा भर आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा