मनसेच्या मदतीशिवाय सत्तेचा सोपान गाठणे अशक्य असल्याची खूणगाठ भाजपने यापूर्वीच बांधली आहे. शिवसेनेची सर्व सूत्रे हाती घेईपर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपला प्रतिसाद मि़ळत नव्हता. आता उद्धव यांनी टाळीसाठी मनसेपुढे हात केला आहे, तर राज यांनी त्याबाबत कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिवाय, या दोघांना एकत्र बसवणार कोण, हा प्रश्न कायमच आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय सारिपाटावर लोकसभा-विधानसभा निवडणुकीनिमित्त ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघत आहे. पाण्यासाठी आत्तापासून वणवण सुरू आहे. एप्रिल-मेमध्ये काय परिस्थिती उद्भवू शकते याचे चित्र मराठवाडय़ासह राज्याच्या वेगवेगळ्या भागांत आत्ताच दिसत असले, तरी गेली वीस वर्षे राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला त्याची फिकीर दिसत नाही. आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या बाता मारण्यातच या दोन्ही पक्षांचे नेते मश्गूल आहेत. दुष्काळ असो की भ्रष्टाचाराचा मुद्दा असो सेना-भाजपकडून कोणताही धोका नसल्याची जणू काही या दोन्ही पक्षांना ठाम खात्री दिसत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांतील आबा, दादा आणि बाबा हे एकमेकांची उणीदुणी काढून महाराष्ट्रातील जनतेचे मनोरंजन करून त्यांच्या दु:खावर ‘फुंकर’ घालण्याचे काम करीत असले तरी राज्यातील आजच्या परिस्थितीचा विचार करता युतीची सत्ता पुन्हा येऊ शकते, असा विश्वास युतीच्या नेत्यांना वाटत आहे. यासाठी ‘राज’कीय जुळवाजुळव करणे क्रमप्राप्त असल्याची जाणीव आता महायुतीच्या नेत्यांना अधिक प्रकर्षांने होऊ लागली आहे.
हिंदुत्वाच्या झांजा वाजविल्या किंवा मराठीची तुतारी फुंकली असली तरीही आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मनसेच्या मदतीशिवाय सत्तेचा सोपान गाठणे अशक्य असल्याची खूणगाठ महायुतीचे शिल्पकार भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी यापूर्वीच बांधली होती. भाजपचे नेते गेले वर्षभर ‘दार उघड बया दार उघड’चा गजर मनसेकडे लावून बसले आहेत. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेला मिळालेली मते व जागांचे गणित याला कारणीभूत आहे. मात्र तेव्हा कार्याध्यक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपला कोणतीच दाद लागत नव्हती. त्यातच महायुतीत सामील झालेल्या रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्या मनसेला महायुतीत घेण्यास उघड विरोध केला होता. शिवसेनेच्या दृष्टीने तेव्हा मुंबई व ठाणे महापालिकेचा गड राखण्याचे आव्हान होते. रिपाइंच्या मदतीने मुंबई व ठाण्यात सहज सत्ता मिळेल असे सेनेच्या चाणक्यांना वाटत होते. प्रत्यक्ष निकाल लागला त्या वेळी ठाण्याची सत्ता दूर जाण्याची परिस्थिती निर्माण झाली, तर मुंबईत सत्ता मिळाली तरी मनसेच्या नगरसेवकांच्या जागा सातवरून सत्तावीस एवढय़ा वाढल्या. याशिवाय मनसेला मिळालेली मते ही आगामी काळासाठी चिंता निर्माण करणारी असल्याचे स्पष्ट दिसून आले. ठाणे महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांना थेट राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वर जाऊन मनधरणी करावी लागली होती. तेव्हा कोणतीही अट न घालता राज यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. मात्र त्यानंतर नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने मनसेचा महापौर पाडण्याचाच प्रयत्न केला एवढेच नव्हे तर स्थायी समिती मनसेला मिळणार नाही याचीच काळजी घेतली. बाळासाहेबांसाठी मी शंभर पावले पुढे येईन, अशी भूमिका त्या वेळी राज यांनी घेतली होती. ठाण्यात टाळी देऊन नाशिक महापालिकेसाठी टाळी मिळेल अशी न्याय्य अपेक्षा ते बाळगून होते. प्रत्यक्षात टाळी देण्याऐवजी त्यांना ‘टाळण्यात’ आले. सेनेच्या चाणक्यांनी दिलेली ती जखम मनसेच्या मनात आजही कायम आहे. महापालिका निवडणूक आणि पुढे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रिपाइंचा फायदा होईल हे गणित मुंबई महापालिका निवडणुकीतच फुसके निघाले. रामदास आठवले यांची ताकद महापालिका निवडणुकीत दिसून आल्यानंतर राज्यातील चित्र फारसे वेगळे नसेल हेही स्पष्ट झाले. मुळातच रामदास आठवले यांना शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीने गंडवल्यामुळेच ते युतीत सामील झाले होते. त्यांचा फारसा उपयोग होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या वेळी आठवले यांनी आदळआपटही केली.
दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे यांचे आजारपण, त्यांच्यावरील अँजिओप्लास्टीच्या वेळी राज यांची उपस्थिती यातून दोघे भाऊ पुन्हा एकत्र येऊ शकतील, अशी अशा अनेकांच्या मनात जागी झाली. राज यांनी तेव्हाही राजकारण वेगळे आणि नातेसंबंध वेगळे असे स्पष्ट करीत नात्याची जपणूक केली आणि उद्धव यांनीही राज यांच्या भूमिकेचा सन्मान केला. पुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेत एक प्रचंड पोकळी निर्माण झाली. बाळासाहेबांचा करिश्मा, त्यांना जमणारी गर्दी, त्यांचा दरारा, सर्व क्षेत्रांतील त्यांचे संबंध, राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व पक्षांमध्ये असलेली त्यांची नाती या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसेनेचा पसारा सक्षमपणे सांभाळतील का, असा प्रश्न उपस्थित होत होता. उद्धव यांची नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर सेनेच्या मुखपत्रातून त्यांची प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध झाली. मराठीचा व हिंदुत्वाचा मुद्दा, शिवसेनेची वाटचाल आदी अनेक प्रश्नांचा परामर्श घेतानाच बाळासाहेबांनी जी शिवसेना उभी केली त्याच्या एक पाऊल आपण ती पुढे नेऊ, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. या मुलाखतीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सेना-मनसे एकत्र येणार का हा होता. भाजपने उद्धव यांच्या भूमिकेचे स्वागत करून सेना-मनसे एकत्र यायला हवे, असे मत मांडले, तर रामदास आठवले यांनी मनसे सेनेत विसर्जित झाल्यासच आपण मनसेचे स्वागत करू, अशी भूमिका मांडली. मुळातच रामदास आठवले हे आता युतीसाठी अवघड जागेचे दुखणे झाले असावे असे दिसते. त्यामुळेच आठवले यांच्या मताला कोणतीही किंमत न देता सेना-भाजपचे नेते महायुतीत मनसेने यावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसतात. राज ठाकरे यांनी ‘दादू’ (उद्धव यांचे टोपणनाव)च्या मुद्दय़ावर योग्य वेळी बोलू एवढीच प्रतिक्रिया दिली, तर आठवले यांचे महायुतीतील स्थान केवळ ‘स्वागताध्यक्षपदा’पुरतेच राहिल्याची टीका मनसेच्या नेत्यांनी केली. आम्हाला दोघांना एकत्र बसवून सेना-मनसे आगामी काळात एकत्र येणार का, हा प्रश्न विचारा असे उद्धव यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे टाळी एका हाताने वाजत नाही असे सांगतानाच मी बाळासाहेबांशी एकनिष्ठ राहिल्यामुळे खलनायक कसा ठरतो, असा सवालही केला. प्रश्न असा आहे की दोघांना एकत्र बसवणार कोण? बाळासाहेब आज हयात नाहीत. त्यांच्या हयातीमध्येही हे शक्य झाले नव्हते. मुळातच उद्धव यांना खरोखरच एकत्र येण्यात रस आहे का, असा सवाल मनसेच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. सेना-भाजपची ही खेळी असून मनसेच्या मतांवर डोळा ठेवूनच राज यांना साद घालण्याचे काम सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या वेळी अशी साद का घातली नाही, असाही एक प्रश्न आहे. विधानसभेत आज भाजपचे ४७ तर सेनेचे ४५ आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेमुळे सेना-भाजपला ५० जागांवर फटका बसल्याचे भाजप नेते जाहीरपणे सांगतात. लोकसभा निवडणुकीतही मनसेचा एकही खासदार निवडून आला नसला तरी मुंबईत युतीला एकही जागा जिंकता आली नाही. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये आमदार व सातही नगरसेवक मनसेचे निवडून आल्यामुळे मराठी मते फोडल्याचा सेनेचा आरोपही पोकळ ठरतो. राज्यात सत्तेचे समीकरण जुळण्यासाठी मनसेशिवाय पर्याय नाही, हे भाजपचे मत आहे तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘नाराजां’चा ‘राज’मार्ग रोखणे व त्यासाठी संभ्रमावस्था निर्माण करण्याचे काम उद्धव यांच्या मुलाखतीमुळे झाल्याचे राजकीय निरीक्षकांना वाटते. महत्त्वाचे म्हणजे उद्धव यांनी हात पुढे केला परंतु राज यांनी साथ दिली नाही, असेही मराठी मनावर बिंबवता येईल, असा राजकीय होरा यामागे असल्याचे मनसेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. राज ठाकरे यांनी मात्र, या राजकारणाची पावले जणू अगोदरच ओळखून असल्यासारखा शहाणपणा दाखविला आहे. गेल्या निवडणुकांमधील सेना-भाजप युतीच्या राजकारणाची चाल ओळखल्यामुळेच सुरुवातीपासूनच ‘एकला चलो रे’ धोरण त्यांनी अवलंबिलेले दिसते. कारण, ‘टाळी’चे राजकारण ते ओळखून आहेत!
टाळीमागचे ‘राज’कारण!
मनसेच्या मदतीशिवाय सत्तेचा सोपान गाठणे अशक्य असल्याची खूणगाठ भाजपने यापूर्वीच बांधली आहे. शिवसेनेची सर्व सूत्रे हाती घेईपर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपला प्रतिसाद मि़ळत नव्हता. आता उद्धव यांनी टाळीसाठी मनसेपुढे हात केला आहे, तर राज यांनी त्याबाबत कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिवाय, या दोघांना एकत्र बसवणार कोण, हा प्रश्न कायमच आहे.
First published on: 05-02-2013 at 12:46 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics behind the clap